सह्याद्रीच्या कुशीत वसलेले नावाप्रमाणेच गोड गाव. एकाबाजूला खेतोबा डोंगराची अफाट कातळ भिंत तर दुसऱ्या बाजूला दऱ्या घाटाची खोल दरी आणि सोबतीला मिरवणारे गोरखगडसिद्धगड,मच्छिंद्रगडासारखे युग पुरुष. गावात वीज नाही की रस्ता नाहीतरीही भरभरून दिलेल्या या निसर्गाच्याकृपेने अनेक पिढ्या इथं वाढल्या. आज मात्र इथे आहे ती भयाणताशेवटची काही घटका मोजणारी घरं… ज्यात साम्राज्य आहे गुरांचे. काही वर्षांपूर्वी ज्याजमिनीवर रांगोळ्या उमटायच्या तिथे आज माती आणि शेणाने थर साचू लागले आहेत. पण आजही त्या घराच्या भिंतीवरील ओळ तशीच आहे या चहा घ्या आणि थोडा आराम करा”.  वास्तुचे पवित्र्य इतके की शेवटच्या क्षणापर्यंत घरअसल्याचे कर्तव्य ते निभावत आहे. २०११ मध्ये माळी दुर्घटनेनंतर सरकारकडून गाव सोडण्याची चिठ्ठी आली आणि गाव ओसाड झाले. गावकरी मुरबाड जवळ छोट्याचा खोल्यांच्या आश्रयाला गेले. आजही अनेक घरांत मोडक्या चुलीधान्याचे जोतेभांडी मालकांच्या प्रतिक्षेत आहेत.  आज मात्र यांना सोबत आहे ते आहुपे गावकऱ्यांनी मोकळे सोडलेल्या गुरांची. अशा या गावात काढलेली एक रात्र बराच काही शिकवून गेली

आहुपे घाट चढून आहुपे गावातून सिद्धगड दर्याघाट मार्गे उतरण्याचा आमचा विचार होता. यावेळी नेहमीचे वाटसरू म्हणजे केदारविश्राम सोबतीला होतेच पण दोन नवीन मंडळी उमेश कैलास या वारी सहभागी झाली होती. आहुपे घाट तसा बराच वेळ काढू. त्यामुळे रात्रीच जाऊन गावात थांबावे म्हणजे सकाळीच लवकर आहुपे घाट चढता येईल असा बेत होता. त्यासाठी शुक्रवारीनिघणार होतो. परंतु ऑफिसची कामे लांबली आणि शुक्रवारी निघण्याचा बेतबारगळला. त्यामुळे शनिवारी  सकाळी कल्याण गाठून आपले डोनटसोबत सांबर आणि चटणी (डोनट म्हणजे मेदूवडा बरं का!!!) खाऊन हक्काच्या लालपरी म्हणजे एसटीमध्ये जाऊन बसलो. कल्याणमुरबाडला जाण्यासाठी दर दहा मिनीटाला बस असते. मात्र मुरबाडवरून थेखोपिवलीला जाणारी बस चुकली. पर्याय म्हणून नारीवलीला जाणारी गाडी पकडून आम्ही तिथे गेलो. नारिवली ते खोपिवली अंतर तेरा किलोमीटरचे होते. त्यामुळे तिथं जे वाहन मिळेल ते पकडून पुढे जाता येणे शक्य होते. त्याप्रमाणे नारिवलीला पोहोचलो. तिथे  काही वेळातच एक जीप आली. त्यात आधीच माणसं बसली असल्यानं आम्ही आणि आमचे सामान त्यात मावणं शक्य नव्हतं. त्यामुळे मीविश्राम आणि आमच्या भल्या-थोरल्या बॅगा घेऊन जीपच्या डोक्यावर बसून प्रवास केला.

खोपिवली गावात वेळ न दवडता शेतातून वाट काढत ओढा गाठला. वाटेल येणारा एक मोठा ओढा पार केला आणि अहुपेची वाट धरली. पाऊस नाहीर्द्रतेचे उद्रेक आणि डासांच्या हल्ल्यामुळे आमचा वेग मात्र मंदावला होता.

काही तरी हुरूप वाढवणारे हवे होते. आणि ते गवसले वाटेत छोट्या ओढ्यात संथ वाहणारे थंड पाण्यात चांगलेच डुंबलो. यात वेळ जरी गेला तरी हुरूप मात्र वाढला. अहुपेचा घाट नाकासमोर दिसत असला तरी वाट मात्र वळसा घेत वर जाते. मोठीमोठी झाडेहिरवळ पांघरलेले दगडहळूच एखाद्या कोनाड्यात पाण्याची संथधार आणि वाटेल एक छोटेसे लागणारे पाण्याचे टाके हे सारे न्याहाळत आम्ही अहुपे घाटाच्या माथ्यावर पोहोचलो.

आहुपे गाव बराच मोठे आणि समृद्ध आहे. गावात दुमजली आश्रम शाळाडांबराचे रस्ते… हे प्रगतीच्या खुणा होत्या. निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी सरकारने ठिकठिकाणीलोखंडी कुंपण घातले होते. ते कुंपण पाहून या ठिकाणी बरेच पर्यटक येत असतील हे जाणवत होतं. आम्ही मात्र मूळ गावात न जाता दर्याघाटाच्या तोंडावर घेऊन जाण्यासाठी कोणी सोबतीला मिळते का ते शोधत होतो. तेव्हा समोरून येणारे काका दिसले. त्यांना सोबत येण्याची गळ घातली. तेही तयार झाले. त्यांचाच घरात दुपारच्या जेवणाचे डबे उघडले. चपाती भाजी आणि शेवटी शेव बुंदीची गोडी जिभेवर रेंगाळतच आम्ही पुढल्या प्रवासाला गोपाकाकांबरोबर निघालो.घडाळ्याचा काटा चारवर आला होता. दाट जंगल आणि छोटे मोठे डोंगर टप्पे ओलांडत खेतोबाच्या मंदिरापाशी पोहोचलो.

खेतोबा इथे का वसला असेल हे इथे आल्यावरच कळते. कोकणकड्याप्रमाणे अजस्त्र कडा मंदिराच्या बाजूला ढगांना रोखून उभा होता. त्यामुळे तिथून दिशेचा अंदाज लावणे शक्य नव्हते.गोपाळकाकांनी दर्याघाटाच्या तोंडावर आणून सोडले आणि त्यांनी घराकडची वाट धरली.

इथून पुढे दर्याघाट म्हणजे दगडी खाच खळग्यातून उतरणीची वाट. मुळात पाण्याखालची वाट म्हणजे शेवाळली होती. त्यामुळे कुठेही पाय ठेवला तरी तो स्थिर राहत नव्हता. जर त्यावरून पाय घसरला तर आजूबाजूच्या दगडांवर आपटले जाण्याची भिती असल्याने प्रत्येक पाल अगदी सावकाश टाकत वाटचाल सुरू होती. काकांनी सांगितल्याप्रमाणे साधारण तासभर चालेल की डावीकडे जाणारी वाट घेत पलीकडे असलेल्या डोंगरवर जायचे आणि मग इथून सिद्धगड माची अजून तासभर अंतरावर होती. त्याप्रमाणे आमचे मार्गक्रमण सुरू होते. वेळ कमी होता त्यामुळे दगडी वाट संपली आणि वेग वाढवला. पण डावीकडे जाणारी वाट मात्र कुठेच दिसत नव्हती. आजूबाजूला असणारे घनदाट जंगल त्यात सूर्याला मावतीकडे झुकू लागल्याने हळूहळू अंधाराचे साम्राज्य पसरू लागले होते.घडाळ्याचा काटा एव्हाना साडे सहावर येऊन थबकला होता. वरून कोसळणारा पाऊस आणि सूर्याचा परतीचा प्रवास सारेच आमची परीक्षा घेत होते. डावीकडे जाणारी वाट सापडत नव्हती आणि सापडलीच तर तिथून पुढे सिद्धगड माचीला पोहोचायला अजून एका तास लागणार होता. काळोखात हे सगळे पार करणे योग्य आहे का असा मनात विचार येत होते. मग रात्र कुठे काढायची हा ही प्रश्न होता.पावसाळ्याचे दिवस असल्याने रात्र काढण्यासाठी डोक्यावर छप्पर हवेच. समोर जाणारी वाट मळलेली होती. नुकतीच गुरे या वाटने गेल्याची चिन्हही दिसत होती. इतकी सगळी गुरे आहे म्हणून गावात नक्की कोणी तरी असले हा विचार करून साखरमाचीकडे जाणारी वाट धरलीआजची रात्र इथे काढू आणि सकाळी सिद्धगडकडे जाणारी वाट विचारून निघू हे ठरवले. दिवसभर पावसात भिजल्याने कधी एकदा गावात जाऊन घर गाठतो आहे असे झाले होते. अजून वीस मिनीटे चालत होतो आणि पहिले घर दिसले.

कौलारू घर पाहून आम्हा सर्वांचेच चेहेरे खुलले. काही सेकंदातच डोळ्यासमोर गरम चहाकोरडे कपडे आलेपण हे क्षणिकच ठरले… कारण त्या घराची अवस्था फारच वाईट होती. त्या घरात माती आणि शेणाचे ढीग होते. इथे राहणे तर दूर पण आत उभे राहणेही शक्य नव्हते. पुढे अजून एक घर दिसले त्याचीही अवस्था अशीच होती. आपण पुरते अडकतो आहोत हे एव्हाना कळून चुकले होते. केदार आणि अजून दोघांना तिथे थांबवून मी आणि विश्राम अजून पुढे काही मिळते का ते पाहण्यासाठी गेलो. पुढे अजून दोन घरे दिसली तीही अशीच होती. गावात देऊळ आहे का याचा अंदाज घेण्यासाठी अजून पुढे गेलो पण समोर मोकळे रान आणि पठारावर शेकडो मोकळी गुरे. पठाराच्या पलीकडे खोल दरी आणि पाठीमागे खेतोबाचा डोंगर. इथून दिसणारे गोरखगडाचे रूप मन मोहून टाकणारे होते. पण या मोहापायी वेळ वाया जाऊन नये म्हणून काढता पाय घेतला. एखादे घर साफ करता येईल का हा विचार मनात आला पण इतक्या वर्षांची घाण अशी साफ होणे शक्य नव्हते. तेवढ्यात घराच्या एका दरवाजाला कडी लावलेली दिसली. ती उघडून पाहिले तर आतील अवस्था इतर घरापेक्षा बरी होती. उत्तम म्हणजे शेण नव्हते.सुरुवातीची खोली त्यात थोडी बरी होती आणि आमच्यासाठी तेवढी पुरेशी होती. ती राहण्यासाठी बनवणे हे आमचे पुढचे काम  होते. कामाची विभागणी केली. विश्राम आणि कैलाश कोयता घेऊन सुकी लाकड जमवू लागला. छोटी खुरटी झाडांच्या मदतीने झाडू तयार झाली मग उमेशने जागा झाडून घेतली. घराच्या जमिनीलाअनेक ठिकाणी खड्डे होते यातून सापविंचू असे प्राणी सहज आत येऊ शकतातअसल्याने ते खड्डे केदार दगड आणि मातीने भरू लागला. मी घराची पाहणी करून घरात जनावर नाही ना याचा शोध घेऊ लागलो. छोट्या दोरीच्या मदतीने विजेरी वर लटकवली.  आता ते घर राहण्यायोग्य झाले होते. आता खरी गरज होती ती अग्नीची. त्यामुळेच घरातली कीडे आणि अंधार दूर होणार होता. बाहेर जोरात पाऊस पडत असल्याने सुकी लाकडे मिळणे कठीणच होते. परंतु विश्रामने पडीक घरात फिरून फिरून सुकी लाकडे आणि सुकलेल शेण गोळा केले. त्याच्या मदतीने शेकोटी पेटवली आणि घरात उजेड पडला…

घराचा दरवाजा आतूनही नीट लागत होता. जमीन स्वच्छ झाली होती. चूल तयार होती. पायातले ओले बूट काढून ठेवले…  ओले कपडेही दोरीवर गेले… संततधार कोसळणाऱ्या पावसाचे थेंब तुटलेल्या छतामधून अंगावर येत होते. बाहेर कोसळणाऱ्या आणि धडकी भरवणाऱ्या पावसापेक्षा हे कैकपटीने बरे होते…बरोबर आणलेले खाण्याचे पदार्थ संपवून तिथेच आडवे झालो. आगीमुळे घरात प्रकाश आणि ही आली होती. पेटोबा शांत झाल्याने आता माझ्या काल्पनिक भूतांच्या कथांना सुरुवात झाली होती. त्या ऐकल्यानंतर ‘कडेला झोपणार नाही,’ असा हट्टविश्रामने सुरू केला होता. मधूनच अंगावर मातीबरोबर गांडूळही पडत असल्यानेरात्रीतून तो घाबरून उठत होता. त्यामुळे आमचे मनोरंजन होत होते… अशातचआम्हांला कधी झोप लागली कळलेच नाही.

रात्री दोनच्या सुमारास बाहेर गुरांचे मोठ्याने ओरडणे सुरु झाले आणि सगळे दचकून उठलो. जनावर आले असा अंदाज होता. घरातील शेकोटी विली होती.ती परत प्रज्वलीत केली आणि पुन्हा सगळे झोपी गेलो. जाग आली ती थेट सकाळीच. कालचा शिण या विश्रांतीमुळे विरला होता. नव्या दमाने पुढल्या प्रवासाला जायला आम्ही सर्व तयार होते. तेवढ्यात घराच्या भितींवर लिहिलेले वाक्य पहिले. “ या चहा घ्या आणि थोडा आराम करा”.  …

सगळे आवरून आम्ही सिद्धगड माचीची वाट शोधण्यासाठी काल आलेल्या वाटेवर निघालो. थोडे चढून वर गेलो तर दोन गावकरी भेटले त्यांना वाट विचारली तेव्हा लक्षात आले. आहुपे गावातील गावकरी आपली गुरे साखमाचीवर सोडतात आणि ती डोंगर पार करून जाऊ नये म्हणून त्यांनी सिद्धगडावर जाणारी वाट मोठाली झाडे तोडून बंद केली आहे. त्यामुळेच काल आम्हाला पलीकडे जायची वाट गवसली नाही. किंबहुना ही वाट असू शकते याचा अंदाज आला नाही. गावकऱ्यांनी वाट दाखवली आणि तासाभरात गडाचा दरवाजामंदीर सारे कॅमेरात बंदिस्त करत आम्ही सिद्धगड माचीवर पोहोचलो.

गावात एका घरात आम्ही बरोबर आणलेला शिधा दिला आणि जेवण बनवण्यास सांगितले. थोडा वेळ लागणआर असल्याने पारावर बसलेल्या गावकऱ्यांसोबत गप्पांचा फड मांडला. कालची रात्र आम्ही साखरमाचीवर काढली हे एकून त्यांनाही आश्चर्यचा धक्का बसला होता. पण सिद्धगड माचीचीसुद्धा आत्ता वेगळी अवस्था नाही, असं त्यांनी सांगितलं. या माचीवर सातआठ घरांचाच संसार असला तरी संसाराचा गाढा ओढण्यासाठी लागणाऱ्या वस्तू आणण्यासाठी आजही त्यांनातासाभराची पायपीट करावीच लागते. माचीवर लाईट आले असले तरी पावसाचे चार महिने ते नसतातच. आणि हे चार महिने हे गावकरी अंधारातच काढतात. पिढ्यान पिढ्या ज्या माचीवर गेल्या त्या गावाला भीमशंकर दोन या अभयारण्यात स्थान देऊन अचानक एका रात्री घुसखोर म्हणून सरकारी फर्मान येते त्यावेळी त्यांच्या  वेदना गावातील मंडळींच्या बोलण्यातून जाणवत होत्या. जंगलाचे संवर्धन व्हावे म्हणून जरी हे पाल असेल तरी ज्यांचा पिढ्यांनी ही जंगले जपली आणि वाढवली त्यांना कसा न्याय मिळणार. हेच प्रश्न मनात घेऊन आम्ही सिद्धगडमाची सोडली. काल दिवस भर बरसणाऱ्या पावसाने आज दडी मारली होती. आणि उतरणीची वाटसुद्धा नकोशी झाली होती. नारीवली की उचले अशा विचारात उचले गावाची वाट धरली… परंतु आजही या गावांच्या वेदना अस्वस्थ करतात…