पावसाळी गिर्यारोहणाची भुरळ कोणालाच चुकलेली नाही. हिरवागार झालेला निसर्ग नेहमीच पावसाळी ट्रेकिंगला साजेसा वाटतो आणि मग पावसाळी मोहिमांना उधाण येते.  पावसात मात्र ‘आ बैल मुझे मार’ अशी स्थिती तयार होते.  निसर्गात फिरताना अवकाळी येणारे धोके कमी नाहीत. त्यातही वीज पडण्याचा धोका जास्त गांभीर्याने घेताना सहसा कोणी दिसत नाही.

मुळात ट्रेकिंगदरम्यान वीज पडू नये म्हणून शंभर टक्के सुरक्षित होऊ असे काहीच नाही. कारण विजेला आकर्षित करणारी कारणेही बरीच आहेत. त्यामुळे काही गोष्टींचा आपण गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. आजकाल अनेक मोबाइल अॅप्लिकेशन वातावरणाचे अंदाज देत असतात. गुगलबाबाला आवाज दिला की तो सहज वातावरणातील बदल उलगडून देतो. त्यामुळे सहज अंदाज बांधले जाऊ शकतात. वादळसदृश परिस्थिती, जोरदार पाऊस, विजांचा कडकडाट दुपारी जास्त होतो. त्यामुळे ट्रेकची सुरुवात सकाळी लवकर करावी आणि दुपारच्या जेवणानंतर लवकरात लवकर परतीच्या मार्गाला लागावे.

दर पंधरा मिनिटांनी ढगांचा अंदाज घ्यावा कारण बऱ्याच वेळा जोरात असणारा वारा, बाजूला वाहत असणाऱ्या पाण्याचा आवाज यामुळे ढगांचा गडगडाट आपल्याला ऐकू येत नाही. अंतराचा अंदाज घेण्यासाठी ३०/३०चा फॉर्म्युला वापरल्यास फायदा होईल. प्रकाशाचा वेग हा आवाजाच्या वेगापेक्षा जास्त असतो हे आपण शाळेत शिकलो आहोतच. त्याच उक्तीप्रमाणे वीज चमकल्यापासून गडगडाटापर्यंत मनात ३० अंक मोजावे (३० सेकंद) जर तीस मोजायच्या आत गडगडले तर तुम्हाला आडोशाला असणे फार गरजेचे आहे. कारण तुम्ही धोक्यात आहात हे लक्षात ठेवा. वादळापासून सहा मैलांहून अधिक अंतरावर वीज पडल्याची उदाहरणे आहेत. त्याचप्रमाणे गडगडणे थांबल्यापासून ३० मिनिटांनंतर सुरक्षित ठिकाण सोडणे उत्तम.

सुरक्षित ठिकाणे कोणती असू शकतात, तर १०० टक्के कोणतीच नाहीत. कारण वीज कशावरही पडू शकते. घर, गाडी, झाड, प्राणी, माणसे अगदी कशावरही. त्यामुळे खबरदारी गरजेची. सगळ्यात आधी सोबतचे धातूचे सामान स्वतःपासून १०० फुटांच्या अंतरावर ठेवावे. यात तुमचा मोबाइल फोन, ट्रेकिंगसाठी वापरावयची काठी. हल्ली ट्रेक-बॅगला पाठीला आधार मिळावा म्हणून घातूची पट्टी वापरली जाते. त्यामुळे बॅगसुद्धा आपल्यापासून १०० फूट लांब ठेवा. यात कॅमेरासुद्धा आला.
सर्वांनी एकाच ठिकाणी न थांबता एकमेकांपासून साधारण १०० फूट अंतरावर जावे. जेणेकरून विजेचा आघात झालाच, तर एकाच वेळी सगळे जखमी होणार नाहीत. (दोनदोनच्या जोडीने गेल्यास उत्तम, कारण त्यामुळे तणाव आणि भीती या दोन्ही गोष्टी वाढणार नाहीत) तंबू, एकटेच उभे असलेले झाड ,गाडी अशा ठिकाणी थांबणे टाळावे. पाण्यापासून दूर राहणे चांगले कारण पाण्यातून वीज प्रवाहित होते.  उंच ठिकाणी असलात तर लवकरात लवकर खाली जाणे योग्य. खाली जाताना घाईगडबड करून अपघाताला निमंत्रण मात्र देऊ नये. पाण्याच्या वाटेने खाली उतरत असाल, तर अचानक आलेला पाण्याचा लोंढा घातक ठरू शकतो. छोट्या झाडांच्या आधाराने तुम्ही स्वतःला सुरक्षित करू शकता. रेनकोट अंगावर घालणे उत्तम. कारण जोरात हवा असल्याने थंडीपासून बचाव होईल.  लपण्यासाठी कोणताच आधार मिळाला नाही तर तुम्हालाच छोटे व्हावे लागेल. म्हणजे नक्की काय करायचे ?


स्वतःला गोलाकार स्थितीत आणायचे. गुडघे वाकवून पायाच्या पुढल्या भागाच्या आधारावर खाली बसायचे. आपले डोके गुडघ्यांसोबत घेऊन, हात कानावर ठेवून, डोळे बंद करून स्वतःला गोलाकार करायचे. या स्थितीत वीज पडलीच तरी नुकसान कमी होते. कारण वीज पाठीमागे आघात करते आणि महत्त्वाचे अवयव वाचतात. जितके आपण कमीत कमी जमिनीच्या संपर्कात असू तितके नुकसान कमी करता येईल. (डोळे आणि कान बंद केल्यास जोरात होणारा आवाज आणि विजेच्या प्रकाशापासून सुरक्षित होता येते.)

प्रथमोपचार

  • वीज पडणे म्हणजे अत्युुच्य विजेचा धक्का. त्यामुळे भाजणे आणि हृदय बंद पडणे यासारख्या गोष्टीवर उपाय  करावा लागतो. वीज पडलीच तर नेत्याने ओरडून सगळे सुस्थितीत आहे, याची खातरजमा करावी. जर कोणाचे उत्तर येत नसेल तर एकानेच तिकडे जावे. कारण सगळे एकत्र गेल्यास आणि त्याच वेळी पुन्हा विजेचा आघात झाल्यास अनेकजण एकाच वेळी जखमी होऊन परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते.
  • विजेच्या धक्क्यानंतर आपण अपघातग्रस्ताला हात लावू शकतो. त्याच्या अंगात विजेचा प्रवाह असतो अशी धारणा चुकीची आहे. जर कोणाचा श्वास बंद असेल तर त्याला प्रथम CPR  देऊन वाचवता येऊ शकेल.
  • भाजले असल्यास त्यावर उपाय करावा. दागिने अथवा तत्सम वस्तू असतील, तर त्या भागाची नीट पाहणी करावी. पायांची नीट पाहणी करावी, कारण अशा ठिकाणी परिणाम जास्त होऊ शकतो.
  • अशा आघाताचा अनेक वेळा धसका घेतला जातो. त्यामुळे वातावरणातील तणाव दूर करण्याचा प्रयत्न करून परिस्थिती नियंत्रणात आणून एकमेकांना आधार द्यावा.

पावसात नागफणी, कळसूबाई किंवा लोखंडी शिड्या, आधार लावलेत, अशा ठिकाणी जाणे शक्यतो टाळावे. नेरळमार्गे पेब किंवा नाणेघाट अशा ठिकाणी वाटेत उच्च विद्युतप्रवाहाच्या वाहिन्या आहेत. त्यामुळे तेथे धोका अधिक असतो, हे ध्यानात असू द्या.

झी दिशा
१४ जुलै २०१८

http://www.zeemarathidisha.news/details?newsid=5168578002088290411&title=vij%20chamakali%20chakchakchak%C2%A7ionid=5371213378259184451%C2%A7ionname=%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7