नाशिक मधील त्रंबकेश्वर परिसर म्हंटला तर आम्हा प्रस्तरारोह्कांसाठी पर्वणी. इथल्या प्रत्येक डोंगर माथ्यावर दगडी साज चढवला आहे. त्यातील एक आव्हान म्हणजे सनडे वन सुळका पण संडे वन असे याचे नामकरण का झाले असावे याचा काही मागमूस लागत नाही बहुतेक एखाद्या रविवारी ह्या सुळक्याच्या माथ्याला मानवी स्पर्श झाला असावा म्हणून… इथले गावकरी मात्र या सुळक्याच्या कळपाला गणेश बारी अशीच हाक मारतात. हा परिसर तसा धार्मिक पर्यटनामुळे बराच सुधारला आहे पण इतके असूनही सुळक्याच्या पायथ्याला असलेल्या ठाकूरवाडी मध्ये विजेची मुलभूत सुविधा देखील पोहोचली नाही हेच कटू सत्य.

शुक्रवारी काम आटपून निघायला उशीर झाला आणि या गडबडीत जेवण मागेच पडले. त्यात रात्री लक्ष्मण एकटाच आसनगावला उभा असणार त्यामुळे गाडी दामटून थेट कसारा घाटा जवळ पेटपूजा आटोपली. त्यानंतर कुठेही न थाबता थेट पेहेणे गावात सकाळी चार वाजता दाखल झालो. एका हॉटेलच्या ओसरीत पथाडी पसरली. फुलमून नावाची पोर्णिमा नुकतीच ओसरली होती त्यामुळे लक्ख चंद्र प्रकाश होता ह्या चांदण्यात दिसणारे पहिणे नवरा, नवरी, सासरा पलीकडे संडे वन आणि  संडे दोनची सुळके मालिका या दोघांच्या कुशीत कधी झोप लागली कळलेच नाही. सकाळी दुचाकी वर पाव पोहचवायला आलेल्या लोकांनी झोप मोड केली. मग काय लगेच रस्ताची चौकशी केली आणि गावकडे मोर्चा वळवला. मात्र सुळक्याचा पायथा गाठायला पलीकडून म्हणजे त्रंबकच्या बाजूने गाडी रस्ता आहे असे गावात कळाले आणि आम्हाला रस्ता दाखवायला थेट एक गावकरी त्याची दुचाकी घेऊन निघाला. मी , केदार , विश्राम, लक्ष्मण आणि नाशिक मधील डांग्या सुळक्याच्या पायथ्याला किरण असा आमचा पाच जणांचा चमू. काही वेळात किरणही गावात पोहोचला. जवळच्या एक हॉटेल मध्ये नाश्ता केला आणि एका कच्चा रस्तावर गाडी घातली. वाटेल असणाऱ्या आश्रमा पर्यंत गाडी रस्ता चांगला होता त्या नन्तर मात्र रस्ताची चाळण झाली होती म्हणून गाडी आश्रमात ठेऊन पायी जाण्यातच योग्यता मानली.

वरची ठाकरवाडी हे सुळक्याच्या पायथ्याचे गाव दहा बारा घरांचे असेल जेमतेम पण शहरीकरणा पासून दूर असल्याने अजूनही माणुसकी टिकून असल्याचे जाणवले. गावाटून सोप्पा वाटेने सुळक्याचा पायथ्याला दहा मिनिटच दाखल झालो.

सुल्क्याची आजूबाजूला फिरून पाहणी करण्यात आली. डाव्याबाजूला वर दोन मधमाश्यांची पोळी लटकत होती. पण चढाईची मार्ग उजवीकडून असल्यामुळे धोका थोडा कमी होता. पुण्याच्या स्की (SCI) नामक संस्थेने या सुळक्याला खिळे लाऊन सुरक्षित केले असले तरी प्रस्तरारोहणाचे आव्हान अजिबात कमी होणार नाही याची मात्र काळजी घेतली आहे.

या वेळी पहिल्यांदा चढाईचे नेतृत्व विशार्म करणात होता. गेली २ वर्ष प्रस्तरारोहणाचा अनुभव आणि हंगामाच्या सुरवातीला कसून केलेला सराव यामुळे हा हंगामाच्या पहिल्या सुळक्याचा श्री गणेशा विशार्म ने ने करावा हा निर्णय बाण कडून घेण्यात आला होता.  पहिल्यांदा नेतृत्व चढाई असल्यामुळे दडपण हि होते पण विश्रामचा आत्मविश्वास पाहता तो हे शिवधनुष्य लीलया पेलेल अशी खात्री देखील होती. त्याची सुरक्षा दोरी माझा हाती होती. लक्ष्मन विश्राम तयार होत असताना बारकाईने पाहणी करत होता. गणेशाला वंदन करून विशार्म सुळक्याला भिडला.

पहिली वीस फुटाची सोप्पी सरळ चढून तो उजवी कडे वळला आणि पहिला चाळीस फुटाचा टप्प काही मिनिटातच पार करून पहिला कंगोर तयार केला. आणि मला वर येण्याचे फर्मान सोडले. मी कान्गोर्या पाशी पोहचून लक्ष्मण आणि किरणसाठी दोर लावला.

त्यांची वर यायची वात न पाहता. विश्रामने पुढच्या चढाईला सुरवात केली. विश्राम पप्रत्येक पाउल अलगद टाकत होता, वाढलेले गावात याची मोठी अडचण होती होती, गवतामुळे हाच खळगे सापडत न्हवते. आणि गवत साफ करताना विशेष काळजी घ्यावी लागत होती. काही वेळा आवघड स्थितीमध्ये उभे राहून गवत साफ करणे म्हणजे मोठे जिकरीचे काम होते.  पुढे एक अंगावर येणारा टप्पा त्याने उत्तम रित्या पार केला.   अंगावर येणाऱ्या टप्पामुळे विश्राम आत्ता मात्र नजरे आड झाला होता. आत्ता विश्राम दिसत नसल्यामुळे मला सुरक्षादोरी हाताळण्यात अडचण येणार होती. कारण सैल सोडली तरी आणि विश्राम चा तोल गेल तर मोठा अपघात आणि घट्ट पकडली तर ओढला जाऊन अपघात म्हणून विश्रामने पुढे अवघ्या वीस फुटावरच दुसरा कंगोरा बनवाचे निच्चीत केले.  जेमतेम दोन जण उभी राहतील अशी हि जागा त्यामुळे लक्ष्मन आणि किरणला पहिल्या कांगोर्या पाशी थांबायला सांगून विश्राम पुढे चढाईला निघाला.  पुढे अडचण होती ती वाटेत असणार्या निवडुंगाची. निवडूंगा मध्ये दोर अडकू शकतो म्हणून विश्राम ने एक खिळा न घेण्याचा निर्णय घेतला पण यामुळे अपघाताची तीव्रता वाढणार होती. अशा निर्णयासाठी खूप जास्त मानसिक धैर्य असावे लागते कारण पाठीमागे काही हजार फुटाची दरी आ वाचून उभी होतीच. त्यामुळे अश्या मुक्त चढाईचे रोमांच होता पण धोकादेखील होता.  हे सगळे सुरु असताना पलीकडून मधमाशांची फौज येताना दिसली आणि सगळे तिकडेच स्तब्ध झाले. साधारण दहा मिनिटाच्या मरण शांतते नंतर त्या गेल्याची खात्री केली आणि पुढल्या चढाईला सुरवात झाली. पुढे विश्रामने कंगोरा बनवला आणि  मी हि तिथे पोहोचलो.   इथे मात्र लक्ष्मण आणि किरणची परीक्षा होती कारण त्यांचा दोर थेट निवडूंगा मधून होता. त्यामुळे लक्ष्मन आणि किरणला अंग चोरत आणि स्वताला सावरत चढाई करावी लागली.

उघड्या पुस्तक रचणे प्रमाणे पुढचा टप्पा होता. त्यात असणारी कापर इतकी मोठी होती कि त्याचा मधून पलीकडचे दिसत होते. त्यात अडकले दगडाचा आधार घेत चढाई करावी लागणार होती. यासाठी शरीराचे उत्तम संतोलन असणे फार गरजेचे असते. विश्रामने टप्पा मात्र सहज पार केला. या पुढे मात्र गोम होती कारण चढाईची मार्ग कळत न्हवता त्या वेळी लक्षात आले सुळक्याला असणार्या नेढ्या मधून पलीकडे जाऊन पुढचा मार्ग होता. यासाठी शरीर लाचिक करून अलगद पलीकडील बाजूला जावे लागणार होते कारण पलीकडे थेट दरी होती. या पुढचा पंधरा फुटी टप्प विश्राम ने सहज पार करून माथ्यावर पाय ठेवला.

१२ नोव्हेंबर २०१६ रोजी दुपारी ११.३० वाजता सुरु केलेली हि मोहीम संध्याकाळी ४.३० वाजता विश्राम माथ्यावर पोहोचल्याने यशस्वी झाली होती. मागाहून मी आणि किरण माथ्यावर पोहोचलो. लक्ष्मन वर येत असताना नेढ्या मधील एक दगड त्याचा पायावर आला त्याने त्याला बगल देत बाजूला झाला पण तो दगड दोनशे फुटावरून खाली पडल्याने खूप मोठा आवाज झाला. आम्ही माथ्यावर असल्याने लक्ष्मन आमच्या नजरे आड होता. या आवाजाने काळजात धस्स झाले. श्राणार्धात वाईट विचारांचे काहूर माजले. पण लक्ष्मणने सुरक्षित असल्याची आरोळी दिली आणि जीव भांड्यात पडला. पायावर आलेला दगड त्याने खाली लोटून दिला होता.

(माथ्यावरचा सुरक्षित सेल्फी)

थंडीच्या काळात सूर्य लवकर मावळतीला जातो म्हणून माथ्यावर जास्त वेळ दवडणे शक्य न्हवते. वरून दिसणारा परिसर अगदी शांत वाटत होता. आजू बाजूला नजर फिरवली तर अनेक सुळके जणू आमची वेळ कधी अशाच नजरने पाहत आहेत असे वाटत होते. माथ्यावर थोडे सेल्फीचे सोपस्कार आटपून परतीची तयारी सुरु केली. कारण मोहीम तेव्हाच पूर्ण होते जेव्हा सगळे सुखरूप पुन्हा पायथ्याला पोहोचतात. लक्ष्मन आणि किरण थेट राप्पालिंग करून पायथ्याला पोहोचले. मी आणि विश्राम रोप परतीच्या शास्त्राने खाली येणार होतो त्यामुळे माथ्यावरून एका कांगोर्यावर थांबून पुन्हा नव्याने राय्प्ल्लिंग करून खाली जावे लाणार होते. सगळे खाली आल्यवर मोहीमेच्या या यशाचा आनंद सगळ्यांचा चेहेर्यावर दिसत होता.

या मोहिमेत काही अडचणी नक्की आल्या त्या म्हणजे रात्र भर प्रवास केल्यामुळे सकाळी मोहीम उशिरा सुरु झाली त्यात प्रस्तरारोहणाचा संपूर्ण मार्ग उन्हाचा दिशेने असल्याने शरीरातले किंबहुना सोबतचे पाणी अपुरे पडले. पण या सगळ्या पलीकडे विश्रामने केलेल्या नेतुर्त्व चढाईचा आनंदच अधिक होता.