निम (Nehru Institute of Mountaineering)  वरून येताना प्रस्तरारोहणाचा किडा डोक्यात घेऊनच मंबई मध्ये आलो होतो. त्यामुळे सुरवातील झेपेल असे प्रस्तरारोहण कुठे करणार तर तैलबैला हा पर्याय लक्षात आला. या गोष्टीला आत्ता चार वर्ष झाली असतील त्यावेळी पाहिलेले तैलबैलाची गावकडची बाजू म्हणजे आमच्यासाठी नाही हेच मनात आले होते एखाद्या कातळभिंतीला सुरीने अलगद कापावे अशीही बाजू पाहताक्षणी मनात धडकी भरवणारी. पुण्याच्या (SCI) स्की नामक संस्थेने खिळे लावून हि बाजू सुरक्षित केली आहे हि जमेची बाजू.  मधल्या काळात बाण हायकर्सच्या लक्ष्मण आणि विश्राम या आरोहाकांनी ह्या बाजूवर चढाई केली होती मात्र त्या मोहिमेला मला जाता आले नाही याची खंत मात्र नक्की होती.

यावेळी योग जुळून आला कारण आमच्या सौ. ना प्रस्तरारोहण जवळून पहायचे होते आणि त्यासाठी तैलबैला पेक्षा उत्तम जागा कोणतीच नाही. असेच काहीसे दादासोचे सुद्धा होते. त्यामुळे माझ्या सोबत देवश्री आणि दादासो सोबत ज्योती आणि विश्राम असे आम्ही या वेळी तैलबैला मोहिमेला निघालो. शुक्रवारी रात्री निघून शनिवारी एकदम डावीकडची आणि रविवारी एकदम उजवीकडची बाजू सर कराव्या असा आमचा बेत.

एरवी तैलबैलाच्या पायथ्याला प्रस्तरारोहक सोडले तर तशी लोकांची वर्दळ कमीच. कारण लोणावळा फिरायला येणारी लोक (Amby Vally ) पासूनच माघारी परततात. यावेळी मात्र जत्रे सदृश्य परस्थिती होती कारण गावातून एका म्यारेथोनचा मार्ग जात होता त्यामुळे मोठ्या मोठ्या लाईट, उभारलेले तंबू, डजनवारी गाड्या मोठाला थाट मांडला होता. या सगळ्यात आमची घराच्या अंगणात झोपायचे स्वप्न हिरावून घेतले होते. रात्री गाडी शेजारीच पथाडी मारून उजाडण्याची वाट पाहू लागलो.

सकाळी नास्था करून गावातून काढता पाय घेतला आणि मंदिर गाठले. आमच्या आधी काही प्रस्तरारोहकांचा चमू तिकडे आला त्यामुळे त्यांचीही लगबग होती. जास्त वेळ न दवडता तयारी करून पहिली भिंत म्हणजे डाव्याकडच्या बाजूच्या पायथ्याला निघालो. शक्यतो या बाजूला कोणी फिरकत नाही कारण प्रस्तर कमी आणि मातीमिश्रीत चढाई जास्त आहे. अशा पद्धतीचे आरोहण सोप्पे जरी वाटले तरी कधी पायाखालची जमीन निसटून अपघात होईल किंवा आरोहाकाच्या पायामुळे निखळलेला दगड खाली उभ्या असणार्यचे कपाळ मोक्ष करेल सांगता यायचे नाही.

यावेळी नेतृत्वाची जबाबदारी माझ्या वर होती त्यामुळे विश्रामच्या  हाती माझी सुरक्षा दोरी सोपुवून चढाईला सुरवात झाली. साधारण ५० फुटी उभे आरोहण करून पहिला कंगोरा गाठला. या नंतर थोडे डावीकडे वळून वर सरकत एका काळात भेगेपाशी येऊन थबकलो. भिंत जरी गुळगुळीत असली तरी भेग आणि झाडाची मुळी याचा आधार घेत करता येतो. मधेच असणारी झाडाची मोठी फांदी मात्र त्रास देत राहते. त्यामुळे सावधतेने हा टप्पा पार केला. वर मात्र वानवा होती कारण माती आणि सुटावलेले दगड. त्यात जो चढाई मार्ग होता त्या वर बरीच पडझड झालेली. माथा प्रशस्त आहे हे जाणून होतो कारण देवाळावरील भिंतच्या आरोहणाच्या वेळी आधीच माथा फिरलो होतो. परतीसाठी मात्र देवाळाकडून उतरायचे निर्णय घेतले कारण एकतर थेट देवळाकडे उतरण्याची मुभा आणि माती मिश्रित बाजूवर उतरून दगड पडण्याचा धोका नाही.

सकाळी लवकर उठून गावाकडची म्हणजे एकदम उजवीकडच्या बाजूवर प्रस्तरारोहण करयचे होते. पण सकाळी चहा नास्था आणि खर सांगू तर उठायचा कंटाळा यामुळे थोडा उशीरच झाला. त्यामुळे चढाईला सुरवात आठ ऐवजी दहाला झाली त्यामुळे उन्हाचे चटके चांगलेच लागणार होते. एरवी प्रस्तरारोहणाच्या वेळी आम्हाला पाहायला चीट पाखरुही नसते. यावेळी बरीच लोक होती. दुसर्या चमूची बरीचसी लोक हि चढाई पाहायला खाली येईन बसली होती. त्यामुळे थोडे दडपणही आले होते.

याआधी विश्रामने या बाजूची चढाई केली असल्याने तो खालून मार्गदर्शन करणार होता आणि सोबत सुरक्षा दोरीची जबादारी देखील त्याने घेतली होती.

 

पहिली ३० उंची चढाई अगदी सोप्पी वाटली पण  ते करत असताना काही ओळखीच्या पाहुण्याचे आगमन झाले ते म्हणजे मधमाश्या तसे प्रस्तरारोहकांसाठी हे पाहुणे ओळखीचे अनेकदा सह्याद्रीमध्ये आरोहण करताना याचा सामना करावा लागतो. यामुळे सावध पवित्रा घेऊन थोडे वर स्वताला सुरक्षित करून घेतले. आणि विश्रामने सुरक्षा दोरी आवळून तिथून काढता पाय घेतला. तब्बल पावूण तासाच्या प्रतीक्षे नंतर त्यांचे घोंघावणे बंद झाले. त्या नंतर पुढील आरोहणाला सुरवात झाली. पुढील टप्पा अंगावर येणार तसेच उजवीकडून डावीकडे वळणारा होता. तोच या चढाईची कठीण टप्पा म्हणून ओळखला जातो. टप्प्यावर संतुलन फार महत्वाचे असते. या वेळी अपघात झाला तर सरळ खाली न घडयाळाच्या लोलका प्रमाणे कातळ भीतीवर आदळू शकतो. हा टप्पा पार करून मी पहिल्या कांगोर्यापर्यंत पोहोचलो मागाहून विश्राम आणि दादा देखील तिकडे दाखल झाले. तिथून पुढे डावीकडे १५ फुट वळसा घेऊन वीस फुट उभे आरोहण येणारा टप्पा मग दुसरा कंगोरा. हा कंगोरा प्रशस्त आहे.

या पुढील टप्प उजवीकडे वळणारा आणि ९० अंशाच्या कोनातला होता. पहीला दहा फुटाचा कातळ ओलांडला कि शेवटच्या कांगोर्या पर्यंत सहज जाता येते. या नन्तर थेट माथा आहे असे विश्रामने सांगितले. पण ह्या पुढील चढाईत आव्हान होते ते एका वळश्याचे आणि माथ्याच्या खाली असणाऱ्या मातीचे. हा टप्पा सहज पार झाला आणि माथ्याला स्पर्श झाला. माथा तसा लहानच आहे कारण भिंत जरी मोठी असली तरी डावीकडील भिंती प्रशस्त माथ्यची नाही. आम्ही सगळे माथ्यावर पोहोचताच खालून होणार टाळ्यांचा आवाज हुरूप वाढवणारा ठरतो. उन्ह चांगले चढले होते त्यामुळे जास्त वेळ न दवडता दोन टप्पामध्ये परतीचा प्रवास करून पायथा गाठला.