ट्रेकिंगचे भूत माझ्या मानेवरअगदी लहानपणीच बसले. पण ट्रेकिंगला माझ्या मानेवर भूत बसले असे कधी वाटलेच न्हवते. “महाड” कोकण पट्ट्याच्या नकाशावरील एक ठळक नाव. महाड पासून साधारण ३० किलोमीटर वर असणार्या “तलाये” नावाच्या गावातून ते थेट उंबर्डी पर्यंतची  वाघाजी घाटातून जाणारी वाट ते शिवथळघळी असा मोठा पल्ला करायचे योजले होते.  यासाठी प्रवासाचा मोठा पल्ला पार करणे गरजेचे होते म्हणून  रात्रीच ६ जण मुंबईहून महाड कडे निघालो. या वेळी आमचा सोबत तब्बल ६.५ फुट उंचीचा एक कोलंबिया गावचा परेदेशी पाहुणा देखील ट्रेकसाठी आला होता. आम्ही मात्र किल्ले आणि सुळक्याचे दावेदार त्यामुळे घाटवाट तसा न पचनी पडणारा विषय पण प्रीती सोबत ट्रेकला जाणे हि वेगळीच मजा असते. निसर्गाचा एक वेगळाच पैलू ती दाखवते. म्हणून काही तरी नवीन करूयासाठी विश्रामला हि सोबत घेतले.

शनिवारी रात्री निघून रविवारी परत येण्याचा हा बेत होता. रात्री तीनच्या सुमारास गाडी महाडला पोहोचली. चालकाला झोप येऊ नये म्हणून महाडला एक टपरीवर गाडी लावली. सगळेच झोपले होते. त्यामुळे चालक, मी आणि विश्राम चहासाठी उतरलो. परत गाडीत बसणार तर परदेशी पाहुणा मधल्या जागेवर आडवा पसरला होता. एरवी “लाडात आलास का रे” बोलून उठवणारे आम्ही त्याला न उठवण्याचा निर्णय घेतला. कारण अमिर खान इतके ओरडून सांगत असतो अथिथि देवो भव त्याचा मान राखला. मग मी आणि विश्राम मागच्या जागेवर जाऊन बसलो.साधारण ३० किलोमीटर गावातल्या रस्तात फिरून देखील  गाव नक्की कुठे आहे याचा अंदाज येत न्हवता. त्यात रात्रीचे तीन वाजले होते. त्यामुळे रात्री रस्ता विचारण्यास कोणीच नाही. एका गावात आराम करू आणि सकाळी उजाडले कि बघता येईल यासाठी एका वाटेवरच्या गावात गाडी लावली. सगळे आधीच झोपले होतो. आम्हाला मात्र मागल्या बाकावर अंग चोरून काही झोप लागणार नाही हे माहित होते. त्यामुळे आपण आपले कुठे तरी बाहेर पसरु या विचाराने गाडी बाहेर पडलो.

थोड्या वेळात एक हिरवा प्रकाश चमकताना दिसला तो होता एका शाळेच्यावर असणार्या विद्युत मीटरचा. शाळेच्या वरांड्यात चागली जागा होती. तसेही गावातील शाळा, मंदिरे ही झोपण्याची ट्रेकरची हक्काची जागा असते. विश्रामने महाडला जायचे त्यामुळे झोपयला काही मिळणार नाही म्हणून काहीच सोबत आणले न्हवते त्यामुळे माझाकडे असणार्र्या स्लेपिंग ब्यागची मी चादर केली होती. एरवी शाळा म्हटले कि प्रसन्न वाटणारी हि जागा काही तरी विचित्र आणि भयाण वाटू लागली होती. डोक्यावर असणरा तो हिरवा दिवा त्रासदायक वाटू लागला होता. झोपल्या नन्तर मनाता विचारांचे काहूर माजले होते. डोळ्यासमोर चित्रविचित्र आकृती फिरत होत्या काही तरी वाईट घडत आहे असे सतत जाणवत होते. कोणी तरी आजूबाजूला असल्याचा भास जाणवत होता. ब्यागच्या नेहीमीच्या ठिकाणी असलेल मी चाकू काढला पण मनावर स्वतःचा ताबा नाही त्यामुळे उगाच काही तरी विपरीत घडेल या भीतीने पुन्हा आत ठेवला. म्हणजे मी झोपेत नक्कीच नाही आणि स्वप्नात तर मुळीच नाही हे खर होते. थोड्याच वेळात एक भयाण घडले कोणी तरी छातीवर बसून मला गळा घोटत आहे असे वाटू लागेल. श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. आत्ता मात्र खूप झाले म्हणून मी विश्रामला आवाज देण्यास सुरवात केली. अंगाला अंग लाऊन झोपलेलो आम्ही पण इतका जोरात आवाज देऊन सुद्धा त्याने अजिबात ऐकले नाही. हे सगळे साधारण तासभर सुरु होते आणि सकाळी ५ च्या सुमारास मला झोप लागली.

रात्री झालेल्या प्रकारामुळे सकाळी आजूबाजूला पहिले. शाळेभोवती गवत माजले होते. कित्तेक वर्ष ही शाळा बहुदा बंदच असावी याचा अंदाज आला. तोपर्यंत बाकीची मंडळी आम्ही कुठे झोपले याचा शोध घेत शाळेजवळ आली होती. काळाचा प्रकार मी विश्रामच्या कानावर घातला आणि इतका आवाज देऊन सुद्धा विश्राम का उठला नाहीस रे असे विचारले असता त्याचा उत्तराने मी सुन्न पडलो होतो. कारण जे काही रात्री माझा सोबत घडले होते से तसेच्या तसे त्याचा सोबतही घडले होते. तो हि पोटतिडकीने मला आवाज देत होता आणि मला ते जाणवलेच नाही…