नवरा , नवरी , करवली, शेंडी, टोक आणि त्यांचा सोबत जोडलेले तिथले ठिकाण अशी बरीच नावे सुळक्यांच्या बाबतीत परिचयाची आहेत. पण फंट्यां हे नाव का असा प्रश्न मला आजही सतावत आहे. नावातच फन असेलला हा सुळका चढाईत किती मजा आणतो याचे आम्हाला वेध लागले होते. “नावात काय आहे” असे म्हणणारया शेक्स्यपियरला नतमस्तक होऊनच आम्ही आमचा फंट्यांच्या मोहिमेला निघालो.      

माळशेज घाट म्हणजे शिवछत्रपतीच्या पावन स्पर्शाने पवित्र झालेली भूमी आणि सुळके बहादुरांसाठीची हि जणू पंढरीच अनेक बेलांग कडे, सुळके या घाटाचा वास्तव्याला आहेत. याच घाटाच्या मध्याला एक सुळका नेहमीच प्रस्तरारोहाकाना खुणावत आला आहे. तो म्हणजे फंट्यां  कारण या एकाच रसायनात प्रस्तरारोहाणाचे बरेच प्रकार अनुभवयाला मिळतात.  सुरवातील असणारी चिमणी मग सरळसोट प्रस्तरभिंत, हाताची बोटे मावतील अशी अरुंद भेग आणि पुढे मुरमाची माती यामुळे या सुळक्यावर प्रस्तारोहाणाचा रोमांच पुरेपूर घेता येतो.  त्यात घाट रस्तापासून हाकेच्या अंतरावर त्यामुळे पायथा गाठण्यासाठी मोठा पल्ला नाही हि जमेची बाजू.

या सगळ्या अनुकूल परीस्तीतीचा फायदा घेण्याचा दृष्टीने बाण हायकर्सने फंट्यांच्या आरोहणाची मोहीम  निश्चित केली. या मोहिमेसाठी सहा जणांचा आमचा चमू माळशेज साठी रात्री रवाना झाला. मध्यरात्री तीन वाजता आम्ही माळशेज गाठले रस्त्याच्या कडेला गाडी लाऊन आम्ही आमची पथाडी पसरली. घाटात सुटलेला वारा आणि रात्रीची मोठ्या गाड्यांची होणारी वाहतूक त्यामुळे झोपेचे मात्र बारा वाजले. सकाळी सूर्यदेवाचे दर्शन होताच खुबी गाठले कारण सकाळचं उरकणी आणि गरम वडे मिळण्याची एकमेव जागा म्हणजे खुबी फाटा.

बरीच लोक माळशेज लिंगी आणि फंट्यां यात गफलत करतात. तसे दोन्ही सुळकेच पण वेगळे. माळशेज लिंगी अगदी बोगद्याला लागुनच उभी आहे तर फंट्यांपुढे अलीकडे एका वळणावर आपली वाट पाहत आहे. यावेळी माझा नेहमीचा सोबती लक्ष्मन या मोहिमेला न्हवता त्यामुळे माझी सुरक्षा दोरी संतोषच्या हाती होती. त्यामुळे संतोष आणि माझ्यावर ताणही तितकाच होता.

फंट्यांचा चढाईची मार्ग सुळका आणि त्याचा बाजूच्या डोंगर मधून आहे त्यामुळे सुरवातीला चिमणी पद्धतीने म्हणजेच दोन प्रस्तरामध्ये असणारया रुंद भेगेत आपले पूर्ण शरीर सामावून आणि आपले हात आणि पायांनी एकमेकाच्या विरुद्ध बल लाऊन पाठीचा आधार घेत वर सरकत जावून आरोहाण करावे लागणार होते. अंगा खांद्यावर प्रस्तारोहांची अवधाने घेतली संतोषला आलिंगन दिले आणि दगडाला हात घातला. पहिली १० फुट चिमणी पद्धतिने आरोहण करून थेट नंतर समोरच्या भिंतीवर आरूढ झालो आणि एका कपारीत असलेल्या दगडाला टेप बांधून त्यात ओऊन स्वताला सुरक्षित करून पुढे चढाईस सुरवात केली. या पुढील टप्प्यात अंगावर येणारा दगड आ वाचून उभा होता तो पार करत असताना लक्षात आले हि या दगडाच्या वरच्या बाजूस घसरडी माती आहे त्यामुळे हाताला आधार म्हणून काहीच नाही त्या नंतर एक पाउल मागे येत उजवी कडून वळसा घेत पहिला कंगोरा गाठला. इथे दोर सुरक्षित करून संतोषला वर घेतले आणि पुढच्या टप्प्याच्या आरोहाणाला सुरवात झाली. वाटेत आधीच्या मोहिमान मधून मारलेले दोन प्रस्राणात्मक खिळे होते त्याची  निट तपासणी करून मग त्यात दोर ओऊन पुढे निघालो. तीस फुटाचे आरोहण झाल्यावर हाताची बोटेच जातील अशी भेग समोर होती. या भेगेत हाताची बोटे फसवून हा टप्पा पार केला. पुढे दहा फुट मुरमाची माती आणि सुळक्याचा माथा गाठला. जेमतेम २ माणसे उभी राहतील असा हा माथा यावर आधीच दोन मेखा होत्या त्या निट तपासून त्यात स्वताला सुरक्षित केले. मागून संतोष हि माथ्यावर पोहोचला. माथा अगदीच छोटा असल्याने एका बाजूला इतर सोबती (ललित, विश्राम, मुनीश, कमलेश) चढाई करत होते तर दुसर्या बाजूने पलीकडे उतरणे सुरु होते.

फंट्यांच्या माथ्यावरून माळशेजचा परिसर पाहणे म्हणजे एक पर्वणीच म्हणावी लागेल. माळशेज घाटाचा नागमोडी वळणाचा रस्ता तर उजवीकडे गिर्यारोहकांची आवडते ठिकाण म्हणजे हरिचंद्र गडाचा परिसर आणि समोर दिसणारे थीटबीचे सुळके या सगळ्याच्या अनुभव एकाच नजरेत सामाउन घेण्याचे सुख हाच खरा या चढाईची मतितार्थ म्हणता येईल.