नाणेघाट हा सगळ्यांसाठी एक सुखद अनुभव असतो. लांबवर पसरलेले पठार. बाजूच्या डोंगराचा मुठीसारखा दिसणारा आकार, त्याच मुठीतून अवकाशाला गवसणी घालायला सरसावलेला नानाचा अंगठा. पलीकडे जीवधन किल्ला आणि त्यालाच बिलगून असणारा वानरलिंग सुळका. प्रत्येक वेळी नाणेघाटात न चुकता भेटणारा चापडा म्हणजेच बांबू पिटवाइपर जातीचा साप हे सगळेच विलक्षण अनुभव.

त्यामुळे गेली अनेक वर्षे न चुकता पावसात इथे भेट देणे हा एक आयुष्याचा अविभाज्य भागाच बनला आहे. आत्ता मात्र तिकडे सगळेच बदलले आहे. वर होणार्या रिसोर्ट सोबतच कल्याण पासून दळणवळण साधनाची मुबलकता. काही वर्ष पूर्वी नाणेघाट उतरून घरी जाताना बऱ्याच वेळा टोकावडे पर्यंत पायपीट ठरलेली असायची कारण आपले एसटी महामंडळ कधीच नाणेघाटात थांबले नाही. कदाचित आज पण थांबणार नाही पण आज खूप सोप्पे झाले आहे. गाडीवाल्याला एक फोन केले कि तो हजर होतो .

काही वर्षा पूर्वी असेच एकदा नाणेघाट ट्रेक नंतर परतीचा मार्गाला लागलो होतो. तब्बल ३० जणांची आमची टोळकी ट्रेक करून घराकडे निघाली होती. प्रत्येकाचा चालण्याचा वेग सारखा नाही त्यामुळे खाली जाऊन जे काही मिळेल त्याने टोकावडे गाठायचे असे ठरले होते. आमच्या सोबतची २०जण लवकर पोहोचली त्यातल्या एका ने सरळ रस्तात मध्ये राहून एसटी थांबवली. टोकावडे पर्यंत एसटी होती म्हणून तो हि थांबला. आम्हाला मात्र अवकाश होता. आम्ही ६ जन आणि सोबत ४ मुली असे कासवाच्या वेगात खाली उतरत होतो. पाऊस नाही त्यामुळे आधीच दमट वातावरणाने जीव मेटाकुटीला आला होता. त्यात जंगलातून जाणारी वाट त्यामुळे कधी एकदा रस्ताकडे पोहोचतो असे झाले होते. आम्ही रस्तावर पोहोचलो त्यामुळे जरा उसंत घेऊया म्हणून त्यातले काही जन पसरले मी आणि ललित दोघेही टोकावडे पर्यंत सोडणारे वाहन मिळते का ते पाहण्यासाठी रस्ताच्या कडेहून हात दाखवू लागलो.

तितक्यात एक जीप येऊन थाबली. त्या भागात निवडणुकीचे वारे वाहत होते. त्यासाठी कि काय जीपला राजकीय झेंडा लावला होता. त्याने १० लोकांचे पैसे सांगितले आणि आम्ही देखील गाडीत जाऊन बसलो. तितक्यात अजून एक गाडी बाजूला आली त्याला त्याच राजकीय पक्षाचा झेंडा होता. त्याला बाजूला घेऊन तो त्यांच्या सोबत गप्पा मारू लागला. साधारण १० मिनिटानंतर मी जाऊन विचारले “अरे निघूया ना?, कि आम्ही चालत जाऊ”. मागून आलेली व्यक्ती मला समजवू लागली थांबा दोन मिनटे काही लोक येत आहे दोन मिनिटात पोहोचतील तुम्ही बसा काळजी नका करू आम्ही सोडू तुम्हाला. थोड्याच वेळात अजून दोन गाड्या तिकडे आल्या. त्यातून उतरणारी माणसे अगदीच भयानक दिसत होती. त्यांचाकडे पाहून गावगुंड हा अगदी योग्य शब्द जुळेल. दाढी वाढलेली, सफेद कपडे, गळ्यात सोन्याचा माळा. त्या सगळ्या लोकांनी आम्हा गाडीच्या चालकाला मारायला सुरवात केली. बेदम मारणे सुरु होती. मागे उभी असेलली माणसे हातात हत्यार घेऊन सज्ज होते, आज खूप काही वाईट घडणार हे लक्षात आले. आमची मात्र हे पाहून बोबडीच वळली होती. सगळे स्तब्ध होऊन हे पाहत होतो. एकमेकान बिलगून बसलो होतो सोबतच्या एक मुलीने तर हे सगळे पाहून भीतीने रडायला देखील सुरु केले होते. चालकाला अर्धमेला करून एका गाडीत कोंबले आणि मोर्चा आत्ता आमच्याकडे वळला. आम्हा सगळ्यांना गाडीतून उतरवण्यात आले. बाकी सगळे स्तब्ध होते मी त्याला समजवत होते आम्ही ट्रेकसाठी आलो आहोत आम्हाला टोकावडेला जायचे आहे. पण शिव्यांच्या लाखोळ्या सोडले तर काहीच ती लोक बोलत न्हवती. राजकीय प्रचारसाठी भाड्याने घेतलेल्या गाडीचा वापर लोकांना घेऊन जाण्यासाठी केला म्हुणुन ते संतापेले होते. मी बोलत असताना अजून एका आमच्यातल्या मुलाने मध्येच बोलण्याचा पर्यंत केला त्यावेळी एक कानशिलात लागून त्याला तो बोलत आहे ना असे बोलून गप्प करण्यात आले. आम्ही हे पाहून चांगलेच बिथरलो होतो कारण सोबत मुली देखील होत्या.

आमचे नशीब चांगले म्हणून तिकडे अजून काही  जीप आल्या त्यात गावातली माणसे होती. त्या हा गोंधळ पाहून थांबल्या त्यामुळे हे गुंड देखील नरमले. त्यांनी आम्हाला जीप मध्ये बसवले आणि जीप टोकावडेच्या दिशेने निघाली. तितक्यात माझा बाजूला असणारा एका गुंड बोलून गेला. तुम्हाला मी पुढे बघतो. त्यामुळे अजून काय पुढे वाढले आहे याची कल्पना येत न्हवती,  पण सोबत गावातली माणसे होते त्यामुळे थोडा धीर येत होता. टोकावडेला जाऊन एसटी मध्ये बसलो तेव्हा थोडे जीवात जीव आला पण कल्याण येई पर्यंत मागून कोणी येत नाही ना याच्याकडे सगळ्यांची नजर होती. त्या घाटात आम्हाला त्या गुंडांनी त्यांचाकडील हत्याराने मारून जरी टाकले असते तरी कोणाला थांगपत्ता लागला नसता. आजही ते आठवले तरी अंगावर काटा उभा राहतो…