१३ वर्षांपूर्वी पाहताच क्षणी प्रेमात पडलो मी तिच्या. तेव्हा ‘RHTDM’ हा चित्रपट फारच गाजला होता. याची जादू इतकी झाली की चित्रपटातील हिरोसारखे आपल्या सोबतही कोणी असावी, अशी स्वप्न पडू लागली. स्वप्नात ती दिसायची, रस्तात तिच्यासारखी कोणी दिसली की मी थांबून तिच्याकडे बराच काळ पाहत राहायचो. पहिल्या प्रेमाची जादू काय असते हे तेव्हा जाणवत होते.

तिची माझी भेट माझ्या वाढदिवसाला १३ वर्षांपूर्वी झाली.  त्यावेळी अगदी हळुवारपणे तिने हातात हात दिला आणि आणि तिची साथ कधीच सोडणार नाही असे मनाशी पक्के केले. सुरुवातीच्या काळात खूप अवघडल्यासारखे व्हायचे… कालांतराने एकमेकांवर इतका विश्वास बसला की ती माझ्या आणि मी तिच्या मनातील न बोलताच ओळखू लागलो. जेव्हा तिच्यासोबत फिरायला जायचो त्यावेळी लोक वळूनवळून पाहायचे… हे पाहून एखाद्या हिरोसारखे वाटायचे. फिरण्यासाठी ठिकाण नाही तर तिची सोबत महत्त्वाची होती. इतक्या वर्षांत चांगल्या वाईट प्रसंगात तिनं माझी नेहमीच साथ दिली आहे. माझ्यासोबत अनेक आघात तिने झेलले पण कधीच कुरकुर नाही केली. दिवसभर तिच्यासोबत फिरून आलो तरी तिला खिडकीतून तिच्या पाहताना वाटायचे तिच्यासोबत परत कुठे तरी जावे… सतत तिचे सोबत असणे आवडायचे. असे असूनही आज मात्र ती माझ्यासोबत नाही….

आयुष्यात कुणी नवीन  येणार म्हणून इतक्या वर्षीची साथ कुणी सोडते का? हा सतत प्रश्न पडत राहतो.

का तिचे आज पूर्वीसारखे रूप नाही म्हणून ती माझी नावडती झाली? का नवीन कुणी आले आणि त्यामुळे होणारी तिची परवड नाही पाहू शकत म्हणून मी तिच्यापासून दूर होण्याचा निर्णय घेतला असेल मी… इतक्या वर्षांत कुणालाही तिच्या आजूबाजूलाही फिरकू न देणारा मी आज तिचा हात दुसऱ्या कुणाच्या हातात देण्याइतका कठोर कसा झालो? म्हणून की काय याचे प्रायश्चित मी सध्या आयुष्यात एकटा राहण्याचा निर्णय घेतला आहे….असं म्हणावं लागेल… काही ही असलं तरी पण खरंच तिला मी विसरू शकेन का???