लेह लडाख प्रत्येकाच्या आयुष्यातील ड्रीम ठिकाण. बुलेट घ्यावी आणि लडाखवारी करून घावी हे जणू समीकरण झाले आहे. पण आमची भटकंतीची व्याख्या थोडी वेगळीच.डोंगरदऱ्यात भटकण्यासाठीच आमचा जन्म असे म्हणणे वावगे ठरणार नाही. अगदी लहान वयातच काकामुळे हिमालयाची तोंडओळख झाली. पुढे अनेकदा हिमालयात ट्रेक करता आले. विशेष सांगायचेच झाले तर अंध गिर्यारोहकांना घेऊन हिमालयाची म्हणजे ‘काला टॉप’ची सफर केल्याचा अनुभव… पण हे सगळे किमान अंतरावच. पण खरी आयुष्याला कलाटणी मिळाली ती नेहरू इन्स्टिट्यूटमध्ये गिर्यारोहणाचे प्राथमिक शिक्षण घेतेवेळी. २००८ साली प्रशिक्षण पूर्ण केले आणि इतके वर्ष गडकिल्लावर रमणारा मी कातळ भिंती आणि सुळके यांच्या प्रेमात पडलो होतो. त्यामुळे हिमालय मात्र मागे पडला. पण ‘बाण हायकर्स’मध्ये लक्ष्मण,संतोष, किरण यांनी खऱ्या अर्थाने हिमालय जागता ठेवला. प्राथमिक, प्रगत , बचाव , आणि MOI सगळीच प्रमाणपत्र पाच वर्षांत नावावर केली.

इतका उत्तम संघ असताना हिमलयात का जात नाही, हि सल मनात होतीच त्यामुळे यावेळी संतोषने हिमालयन मोहीम मनात पक्की करूनच मुंबईमध्ये दाखल झाला. लक्ष्मण, किरण हे तर त्यांचे हक्कांचे गडी होतेच. मी २००८ नंतर हिमालयात पाऊल ठेवले नव्हते. मधल्या काळात सह्याद्रीत जरी बऱ्याच वाटा तुडवल्या असल्या तरी हिमालय हे वेगळेच विश्व होते. पण संतोषला माझ्यावर असलेल्या विश्वासामुळे मोहिमेतमला सामावून घेतले.

एरवी जून- जुलै हा हिमालयन मोहिमांचा हक्काचा हंगाम. त्या नंतर थंडीचे काहूर माजायला सुरुवात होते. इतक्या दिवसाच्या सुट्टीची आणि आर्थिक गणित सोडवण्याची. ऑफिसात या मोहिमची माहिती दिली आणि सुट्टीची काळजी नको तिकडूनही शाबासकी मिळाली आणि अर्धी मोहीम तर इथेच जिंकल्यासारखे वाटले. मोहिमेसाठी तयारी म्हणून सह्याद्रीत अनेक आठवडे सराव चालू होता. तसेही प्रस्तरारोहण मोहिमांमुळे पावसात ट्रेक जास्त होतातच. सोबत घेऊन जायच्या सामानाची जबाबदारी केदारकडे सोपवली गेली होती. त्यानेही ही ती उत्तम पेलली. जसंजसे दिवस जवळ येत होते तसे दडपण वाढत होते. इतक्या वर्षांनंतर हिमालय आपलेसे करेल की नाही याची  मनात सतत घालमेल होती. २२ सप्टेंबरला लेहसाठी उड्डाण घेणार होतो. रस्ते बंद आणि गाडीप्रवासातील थकवा नको म्हणून उड्डाण असे जरी म्हटले असले तर कमी दिवसाची सुट्टी ही खरी मेख त्यामागे होती. सकाळी ४ वाजता उड्डाण करणार होतो. त्यासाठी रात्रीच विमानतळ गाठले. विश्राम काही काम असल्याने मोहिमेला येत नव्हता. मात्र आम्हांला विमानतळावर मात्र सोडायला तो आवर्जून आला होता.

विमानही ठरल्या वेळेत उडाले आणि आम्ही समुद्रसपाटीपासून थेट ११००० फुटाची उंची अवघा दोन तासांत गाठली. सकाळी उजाडले तसे खिडकीची जागा का मिळवली याचे गमक कळले. विमानातून दिसणारे लेह पाहणे म्हणजे स्वर्ग पाहण्यासारखे आहे. डोंगराची टोक अवकाशकडे झेपवलेली, दगडी काळ्या माथ्यावर आईस्क्रिमप्रमाणे बर्फाची चादर. अजून थंडीला अवकाश होता त्यामुळे बर्फाची चादर विरळ झालेलं पण त्यामुळे होणारी नक्षीकाम मात्र आकाशातून पाहताना मंत्रमुग्ध करणारे . फोटो नक्की कुठून आणि कसा काढायचा याचे भान राहिले न्हवते. शेवटी कॅमेरा बाजूला ठेवून नुसत्या डोळ्यांनी पाहण्याची माजा लुटायचे ठरले. विमान उतरवण्यासाठी पायलटला लेहला पूर्ण वळसा घालावा लागतो त्यामुळे त्यावेळी लेहचे चहुबाजूने दर्शन घेता आले.

सकाळी सात वाजता आम्ही लेहमध्ये दाखल झालो अचानक वाढलेलं गारवा जाणवू लागला होता. ३४ अंशाच्या वातावरणातून थेट ७ अंशाची मजल होती ती. विमानतळावर खांद्यावर पांढरे कापड घालून आमचे पारंपरिक पद्धतीने स्वागत झाले. आम्ही ज्या दिवशी पोहोचलो त्या दिवसापासून लेह महोत्सवाला सुरुवात होणार असल्याने आम्हांला हा पाहुणचार मिळाला होता. लेहमधील ऑक्सिजन विरळ असल्यामुळे त्रास होऊ शकतो. त्यामुळे भरपूर पाणी प्या आणि आजचा दिवस आराम करा, असे आम्हांला सांगण्यात आले. आमची तशीही रात्रभर झोप झालीनसल्याने आराम करण्याचा निर्णय घेतला. संतोष अकरा वाजता लेह मध्ये दाखल होणार होता. मोहीमच नेता सोबत नाही म्हणून थेट हॉटेलमध्ये जाऊन झोपण्याचे ठरवले. तासाभराच्या झोपेनंतर शांत झोप काही लागत नव्हती. मनात लेह महोत्सव पाहण्याचे वेध लागले होते. त्यामुळे विमानतळावर दिलेला लेह महोत्सवाचा कागद काढला आणि पोलो मैदान गाठले.

मैदानात बरीच माणसे जमली होती. अगदी उत्तम व्यवस्था केली होती. एकबाजूला पाहुणे आणि चारीबाजूला प्रेक्षक बसू शकतील याची चोख व्यवस्था. लेहच्या संस्कृती मध्ये मुळातच पाहुणचार भरलेला सतत जाणवत होता. जुल्ले म्हणजे नमस्कार हे विमानतळावरच कळले. लेहच्या पोशाख, नृत्य आणि गायन यात तिबेट आणि चीन या दोन्ही देशांचे संस्कृतीची झलक जाणवत होती. बौद्धधर्माचे लेहमधील अस्तित्व अगदी प्राचीन युगापासून होते. हे महोत्सव पाहताना पदोपदी होत होता. लेह त्यांचा प्रथा आणि परंपरा नृत्य नाटक माहिती स्वरूपात दाखवले जात होते. पुढील चार दिवसांत अनेक पद्धतीने हे सगळे मांडले जाणार होते. मुख्य बाजारात लेहचा पक्षांच्या छायाचित्रणाचे प्रदर्शन भरवले होते. भौगोलिकदृष्ट्या वेगळी ओळख असलेल्या या वातावरणातील वन्यजीवन या छायाचित्र प्रदर्शामुळे जवळून पाहता आले. त्याचसोबत निरनिराळ्या चवीच्या पदार्थांची दुकाने होतीच. यामुळे पहिला दिवस सहज निघून गेला.

आम्ही ठिकाणी राहत होतो ते एक घर होते. त्या घरात वावरताना अगदी छोट्या छोट्या गोष्टीमध्ये तिथल्या संकृती जपण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. दरवाजे खिडक्या यांचा वर लाकडात केलेले कोरीव काम ते जेवायला बसण्याचा बैठकीपर्यंत अगदी पारंपारिक पद्धतीने नटलेल. मोहिमेला जाण्याआधी तीन दिवसांचा वेळ आमच्याकडे होता. याकाळात नुब्रा ,पयांगों तलाव हे सगळे पहायचे आणि शेवटचा दिवस मोहिमच्या तयारीसाठी राखून ठेवायचे ठरवले. खर तर पहिले चार दिवस म्हणजे मोहिमेला जाण्यापूर्वी शरीर वातावरणाशी सरमिसळ व्हावे यासाठीची ही तजवीज म्हणता येईल.

पण पहिल्याच रात्रीत वातावरणातील बदलाने या सगळ्यावर पाणी पडणार याचा अंदाज आला. ओरिसामध्ये आलेलं वादळ  लेहच्या दिशेने फिरले आणि सगळीच गणिते बिघडली. रात्रभर अतिबर्फवृष्टी झाली आणि उजाडताच खिडकीतून दिसणारे उघडे डोंगर बर्फाची पांढरी पांघरून आम्हांला आव्हान देण्यास तयार झाले. विमानतळावर सगळी उड्डाणे रद्द झाली. नुब्रा आणि पंगँग सारखी ठिकाणचे रस्ते बंद झाले होते. यामुळे आमच्या संपूर्ण मोहिमेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले….

क्रमश:..