सह्याद्रीच्या कडेकपारीत फिरत असताना हिमालय सतत साद घालत होताच. त्याच्या हाकेला प्रतिसाद देणं शक्य होत नव्हतं. मात्र यंदाच्या मोसमात कसंही करून हिमालयात जायचं असा आमचा  निश्चय होता. त्यानुसार आम्ही सर्वांनी ऑफिसमधील सुट्टीच्या तरतुदी करत लेहमधील २० हजार फुटांवरील ‘स्टोक कांगरी’ची मोहीम आखली. वास्तविक आम्ही ज्या मोसमात जाण्याचं ठरवलं तो कालावधी थंडीचा होता. त्यामुळे अनेकांनी आम्हाला तसं न करण्याचा सल्ला दिला होता… मात्र आमचा निश्चय पक्का असल्यानं संतोष देवलेकर, लक्ष्मण होळकर, केदार बनसोडे, किरण शेडगे आणि मी, असे आम्ही ‘बाण’चे शिलेदार लेहमध्ये येऊन दाखल झालो. लेहमध्ये आल्यानंतर निसर्गाची मनोहारी रूपं आम्ही पाहत होतो आणि अनुभवत होतो. तेव्हा नेहरू माउंटेनिअरिंग इन्स्टिट्यूट अर्थात ‘निम’मध्ये प्रशिक्षण घेताना सरांनी सांगितलेली एक गोष्ट प्रकर्षानं आठवली ती म्हणजे ‘मुंबईची फॅशन आणि हिमालयातील वातावरण कधीही बदलू शकतं…’ याचं प्रत्यंतर लेहमध्ये पुढच्या काही दिवसांत आम्हाला आलंच… 


सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस आम्ही लेहमध्ये आलो तेव्हा सर्वत्र ‘लेह महोत्सवा’चा माहोल होता. या महोत्सवाबद्दल खूप ऐकून असल्यानं हा महोत्सव पाहण्याची प्रचंड उत्सुकता होती. त्यामुळे हॉटेलवर जाऊन फ्रेश होऊन विमानतळावर मिळालेला महोत्सवाची माहिती देणारा कागद घेऊन आम्ही तडक तिथलं पोलो मैदान गाठलं. लेहच्या संस्कृतीमधील प्रेमळ आदरातिथ्याचा अनुभव तिथंही आला. लेहचा पोशाख, नृत्य आणि संगीतामध्ये तिबेट आणि चीन या दोन्ही देशांच्या संस्कृतीची झलक जाणवत होती. बौद्ध धर्माचे लेहमधील अस्तित्व अगदी प्राचीन युगापासून असल्याची जाणीव महोत्सवातील विविध सांस्कृतिक कार्यक्रम पाहताना झाली. तो महोत्सव डोळ्यांत आणि मनात साठवून हॉटेलवर परतलो.  दरम्यान, ओरिसामध्ये आलेलं वादळ लेहच्या दिशेनं फिरलं आणि निसर्गाचं रूप क्षणार्धात पाटलून गेलं. बर्फाची अतिवृष्टी झाल्यानं पहिल्या दिवशी खिडकीतून दिसणारे उघडे डोंगर बर्फाचं शुभ्र पांघरूण लेऊन उभे होते. या बर्फवृष्टीमुळे आमच्या संपूर्ण मोहिमेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झालं होतं…. मोहिमेला प्रारंभ होण्यास दोन दिवसांचा अवधी असल्यामुळे वातावरणबदलाची मनात अपेक्षा होती. त्यामुळे बर्फात घालायचे बूट, थंडीचे जाड कपडे आणि पाठीवर सामानाच्या जड सॅक घेऊन आम्ही सराव सुरूच ठेवला होता. विरळ हवामानात असं ओझं पाठीवर घेऊन चालणं मानसिक क्षमतेचा कस पाहणारं होतं…या दोन दिवसांत पावसाची रिमझिम सातत्यानं सुरूच होती. त्यामुळे बरेचसे रस्ते बंद होते. तरीदेखील आमची भटकंती सुरू होती. (लेह फिरण्यासाठी रीतसर परवानगी घेणं गरजेचं असतं. मुळात आपल्याच देशात फिरायला पैसे का मोजावे आणि परवानगी तरी का, असा प्रश्न कायम मनात आहेच.)  आमीर खानच्या ‘थ्री इडियट्स’मुळे प्रसिद्ध झालेला पेंगगोंग तलाव आणि सोनम वायचुंक यांची स्टुंडंट्स एज्युकेशनल अँड कल्चरल मूव्हमेंट ऑफ लडाख शाळा, शे पॅलेस, आलची आणि हिमीस मठ आणि इतर काही महत्त्वाची ठिकाणं पाहिली. 


पावसाळी वातावरण निवळू लागल्यानं आणि अधूनमधून सूर्याचं दर्शन होऊ लागल्यानं मोहीम सुरळीत होण्याच्या आशा पल्लवीत होऊन मन स्टोक कांगरीकडे होतं. आमच्या मोहिमेचा नेता संतोषनं स्थानिक शेर्पांशी चर्चा करून दुसऱ्या दिवशी सकाळी मोहिमेला सुरुवात करत असल्याचं जाहीर केलं. अर्थात आधी आखलेल्या वेळापत्रकात थोडा बदल केला आणि पहिला पडाव चांग्मा इथं न ठेवता थेट मनकोरमाला जायचं ठरलं. कारण त्यामुळे एक दिवस वाचणार होता आणि हा दिवस शिखरचढाई वेळी जर वातावरण बिघडलंच तर उपयोगात आणता येणार होता. यामुळे पुढच्या दोन दिवसांत अकरा हजार फुटांवरून थेट सोळा हजार फुटांवर म्हणजे थेट बेस कॅम्पपर्यंत मजल मारावी लागणार होती. विरळ हवेचा त्रास होण्याची शक्यता होती. अर्थात हे सहन करण्यासाठी लेहमध्ये केलेला सराव कामी येईल, यावर हा निर्णय आम्ही सर्वांनी मिळून घेतला.

बदललेल्या वेळापत्रकानुसार आम्ही वाटचालीला सुरुवात केली आणि पहिल्या रात्रीचा मुक्काम मनकोरमामध्ये केला. तिथं आम्हाला स्टोक कांगरीवरून परत येणारा एक संघ भेटला. त्यांचाकडून पुढच्या वातावरणाचा अंदाज घेतला खरा पण तो फार सकारात्मक नव्हता.  त्यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या आठवडाभरापासून कोणत्याही टीमला स्टोक कांगरी समिट करता आलं नव्हतं. बेसकॅम्पला साधारण एक फूट बर्फ होतं. तिथं ऊन येत नसल्यानं तो बर्फ वितळणं शक्य नसल्यानं त्यांनीही परतीची वाट पकडली होती. हे ऐकल्यानंतरही आमच्या मनात कुठेतरी वातावरण सुधारेल अशी अपेक्षा होती. प्रयत्न न करता परत फिरणं आम्हाला कुणालाच मान्य नव्हतं. यश मिळो अथवा न मिळो किमान प्रयत्न तरी करायचा हे आम्ही मनाशी ठरवलं होतं. (कारण अशाच अनुभवांतून आपण अनेक गोष्टी शिकत जातो… अर्थात जीव धोक्यात न घालता हे तर नक्कीच…)


पुढल्या दिवशी डोळ्यांत, उरात स्टोक कांगरी समिट करण्याची स्वप्नं घेऊन बेस कॅम्पच्या दिशेनं वाटचाल सुरू केली. मजल-दरमजल करत आमची वाटचाल सुरू होती. बेस कॅम्पला पोहोचल्यावर परिस्थिती अधिकच बिकट झाली होती. एक ते दीड फुटाची बर्फाची चादर पसरलेला बेस कॅम्प आमची वाट पाहत होता. धापा टाकत टाकत आम्ही बेस कॅम्पला पोहोचलो.

आमच्या मदतनीस जेवणासाठी आणि प्रातर्विधीसाठीचे तंबू उभारणीच्या कामाला लागेल. आम्ही आमच्या तंबूसाठी बर्फ साफ करून जागा करू लागलो. विरळ वातावरणामुळे फावड्यानं बर्फ बाजूला करताना चांगलीच दमछाक होत होती. तंबू लागल्यानंतर जेवण करून झोपण्याची तयारी केली होती.

मात्र आम्ही सर्वजण जागेच होतो. बेस कॅम्पला आमच्या आधी आलेली एक टीम रात्री स्टोक कांगरीसाठी निघणार होती. बर्फवृष्टीनंतर कुणालाही समिट करता आला नसल्यानं नव्यानं मार्ग बनवण्याचं मोठं आव्हान या संघापुढे होतं. त्या टीममध्ये लेहमधील एक मुलगी आणि एव्हरेस्टच्या चढाईचा अनुभव असलेले दोन जण होते. त्यांचा अनुभवाचा वापर करून  त्यांनी मार्ग मोकळा केला तर त्यांच्याबरोबर आमचंही समिटचं स्वप्न पूर्ण होऊ शकणार होतं. त्या संघाला शुभेच्छा देण्यासाठी रात्री उणे २१ असं तापमान असूनही आम्ही सर्वजण तंबूबाहेर होतो. त्यांना शुभेच्छा दिल्यानंतर ते मार्गस्थ झाले…आणि आम्हीही झोपेच्या अधीन झालो, तरी मनात ते कुठपर्यंत पोहोचले असतील,मार्ग काढता आला असेल का त्यांना, समिट झालं असेल का…अशा एक ना अनेक प्रश्नांचं काहूर मनात होतं. त्यातच कधीतरी डोळा लागला. 


दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता नाश्ता आटोपून आम्ही आम्ही आवराआवर करत होतो. तरी सर्व लक्ष काल रात्री स्टोक कांगरीच्या समिटसाठी गेलेल्या टीमकडे होतं. साधारण नऊच्या सुमारास त्यातील काही मंडळी दिसायला लागली. त्यांना परत यायला इतका उशीर झाला म्हणजे नक्कीच शिखर सर झालं असणार असा विश्वास आम्हाला वाटत होता. ते बेस कॅम्पला आले, पण त्यांचं समिट झालंच नाही… साधारण १७ हजार ८०० फुटांवर असणाऱ्या बर्फानं त्यांची वाट अडवली होती. चार फुटांच्या बर्फातून एक-एक पाऊल टाकण्यासाठी बरीच ऊर्जा खर्च करावी लागली… त्यांचे अनुभव ऐकून आमचं शिखर गाठण्याचं स्वप्न पूर्ण होणार नाही, हा विचार मनात रुजू लागला होता. काय करायचं यावर विचार झाला तेव्हा स्टोक कांगरीला जायचं जरी समिट झालं नाही तरी हरकत नाही, किमान प्रयत्न तरी करू असं सर्वानुमते ठरलं. हा अनुभवही आपल्याला खूप काही शिकवून जाईल, याची जाणीव सर्वांनाच होती. समिट करण्यापेक्षा तिथल्या अडचणीच खूप काही शिकवून जातात आणि त्याचा भविष्यात नक्कीच उपयोग भविष्यातील मोहिमांसाठी होतो हे माहीत होतं. त्यामुळे त्या दिवशी रात्री आम्ही शिखराच्या दिशेनं निघालो. आदल्या दिवशीची टीम ज्या ठिकाणी येऊन अडली त्या १७ हजार ८०० फुटांवर आम्हालाही थांबावं लागलं…

अर्थात हे अपेक्षितच होतं… त्या हिमशिखरासमोर आम्ही नतमस्तक झालो… आणि पुढच्या वेळी समिट करण्यासाठी तू नक्कीच साथ देशील, असं मनापासून साकडं घालून परतीची वाट धरली… मनात समिट न झाल्याचं शल्य होतं, पण तरी भविष्यात हे समिट करण्याचं स्वप्न आमच्या सर्वांच्या डोळ्यांत आहे… बघू कधी योग येतो ते…