कडक उन्हामुळे अंगाची काहिली होत होती… नजरेच्या टप्प्यात लक्ष्य दिसत होते… ते गाठण्याची जबर इच्छाशक्ती असल्यामुळे उन्हाची पर्वा न करता लक्ष्याच्या दिशेने वाटचाल सुरू होती… आमची ही जिद्द पाहून सूर्य डोक्यावर येऊन स्तब्ध झाला होता. कदाचित त्यालाही आमचं यश पहायचं होतं म्हणून की काय तो ही ताटकळत थांबला होता. कंबरभर गवताने भरलेला डोंगरमाथा मी गाठला. माझ्या पाठोपाठ विश्रामदेखील पोहोचला. गडगडा किल्ल्याचा माथा गाठल्यावर आम्ही दोघांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली… जणू काही आम्ही चंद्रावरच पाऊल ठेवले… असा आनंद आम्ही साजरा करत होतो…खरं हा माथा या आधी कितीदा गाठला होता. परंतु यावेळेची बातच काही और होती. या पूर्वी कधीच मानवी स्पर्श या कातळ भेगेला झाला नव्हता. या भेगेवरून किल्ल्यावर चढाई करण्याचे स्वप्न गडगडा किल्ले भ्रमंतीच्या वेळी पहिले होते आणि आज ते प्रत्यक्षात पूर्ण झाले होते…

मुंबई पासून साधारण १४५ किलोमीटर तर नाशिक पासून अवघ्या १८ किलोमीटर असूनही गडगडा किल्ला तसा फारसा प्रकाश झोतात आला नाही. कारण एक तर किल्लावर पाण्याची टाकी वगळता विशेष काही पाहण्यासारखे नाही. त्यात माथा गाठण्यासाठी प्रस्तारोहाणाचे कसब गरजेचे असल्याने या किल्ल्याच्या वाटेला सहसा कोणी जात नाही. आम्ही जायच्या महिन्याभर आधी या किल्ल्यावर मुंबईच्या एका गिर्यारोहकाला आपला जीव गमवावा लागला होता. ही बातमी मोहिमेला खीळ घालेल, अशी अपेक्षा होती पण तसे न होता ही मोहीम अधिकच सुरक्षीत कशी करता येईल या बाजूने झाला. मुळात प्रस्तारोहणात खिळे ठोकणे हे माझ्याकडून फार कमी होते. परंतु अशा ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने जर खिळे मारावेच लागले, तर त्याचीही तयारी आम्ही केली.
मोहिमेसाठी शुक्रवारी रात्रीच मुंबईहून नाशिकच्या दिशेने निघालो. मध्यरात्री भेगे शेजारचे मंदिर गाठले. मोहिमेत नेहमीचे सवंगडी म्हणजे लक्ष्मण, विश्राम आणि केदार होतेच. शुक्रवारी कामाचा थकवा आणि मग प्रवासात झोपेचे झालेलं खोबरं यामुळे सकाळी थोडे उशीराच डोळे उघडले. सर्व आवरून आम्ही दहा वाजता भेगेच्या पायथ्याची पोहोचलो. भेगेची सुरुवात साधारण १५० फुटांवरून होणार होती. पण तिथपर्यंत पोहचणे मोठे दिव्य होते. कारण हवेमुळे कातळ भिंतीचा खालचा भाग बराच आत गेल्याने एखाद्या छताप्रमाणे त्याची रचना झाली होती. भेगेच्या सुरुवातीला असलेलं एक झाड हाच काय तो भक्कम आधार दिसत होता.

बाकी ९० अंशातील उभी कातळ भिंत. झाडापर्यंत पोहोचलो की अर्धी लढाई जिंकली म्हणून समजा… सरळ चढाई करून झाड गाठणे म्हणजे वाटेत बरेच खिळे मारावे लागणार होते. जास्त खिळे मारणे टाळता यावे, या उद्देशाने वळसा मारून जाण्याचा पर्याय निवडला. पहिल्या टप्पात पिटोन ठोकून पहिले दहा फूट गाठले. पुढला मार्ग निवडुंगाच्या मधून जाणारा होता. त्यामुळे पुढे जाण्यापूर्वी स्वताःला सुरक्षित करून घेणे महत्त्वाचे होते. कारण चढाई जरी १५ फूटच झाली असली तरी खालच्या बाजूला तब्बल ३०० फुटांची खोल दरी ‘आ वासून’ उभी होती.

म्हणून इथे पहिला खिळा ठोकला. पुढे अजून २० फूट मुक्तचढाई करून नीट उभे राहता येईल अशा ठिकाणी अजून एक खिळा ठोकला कारण पुढे भेगेपर्यंत पोहोचण्यासाठी २० फूट आडवे जावे लागणार होते. परंतु बाहेर आलेला दगड वाट अडवून उभा होते. यावेळी लक्ष्मणने आपले कसब दाखवले. आडव्या आलेल्या दगडाला वळसा घालणे शक्य नव्हते म्हणून चार फूट खाली उतरून बाजूला सरकत सरकत पुन्हा वरच्या दिशेने चढाई केली. २५ फुटांवर असलेल्या झाडाकडे पोहोचून त्याने स्वतःला सुरक्षित करून घेतले आणि आमच्यासाठी दोर बांधून मार्ग तयार केला.

त्याचा पुढचा टप्पा झाडाच्या वरच्या बाजूला २० फुटांची उभी चढाईची होता. तिथून डाव्या बाजूला भेगेमधून चढाईची सुरुवात. भेगेच्या सुरुवातीला असलेल दगड निखळून हातात येऊ लागले होते.. त्यामुळे स्वतःला सुरक्षीत करता येत नव्हतं… त्यातच झाडाजवळ उभा असलेल्या सुरक्षादोरी हाताळत असणाऱ्या विश्रामला मी दिसत नव्हतो. त्यामुळे स्वत:ला सुरक्षीत करण्यासाठी खिळा ठोकण्याशिवाय पर्याय नव्हता. आता पुढे अजून १५० फुटांची उभी भेग स्पष्ट दिसत होती. भेगेच्या आरोहाणात स्वत:ला सुरक्षीत ठेवायचे असेल तर भेगेच्या जितके जवळ जाऊन आरोहण करू तेवढी पुढची चढाई अंगावर येणारी ठरते हे लक्षात ठेवणे गरजेचे होते. त्यात विश्रामला मी दिसत नसल्याने त्याला माझ्या हालचालींची माहिती सतत देत राहणे गरजेचे होते. कधी उजव्या भिंतीला तर कधी डाव्या बाजूला वळून आरोहण सुरू होते.

SLDC स्प्रिंग लोडेड कॅमिंग डिवाईसचा वापर
भेगेचा वापर (SLDC स्प्रिंग लोडेड कॅमिंग डिवाईस) वापरून स्वत:ला सुरक्षीत करण्यासाठी उत्तम होत होता. परंतु सह्याद्रीताला दगड मुळातच ठिसूळ त्यामुळे पूर्णपणे विसंबून न राहता येत नव्हतं… तरी ही मजल दरमजल करत हा टप्पा करत माथ्यावर पाऊल टाकलं… या मोसमातील श्रीगणेशा एका अजिंक्य भेगेच्या मोहिमेने झाल्याचा आनंद शब्दातीत आहे….


khoop chhan. aani sarvanche abhinandan.
मस्त दिवा!! Keep it up