चिखलदरा भटकंती दरम्यान गाविलगड पाहण्याची संधी मिळाली. १२ व्या / १३ व्या शतकात गवळ्यांनी बांधलेला हा किल्ला नंतर बलाढ्य गोंडांनी घेतला. बहमनी सुलतानाच्या काळात सातपुड्याच्या संरक्षणासाठी शहाबुदीन अहमदशहाने हा बलदंड किल्ला बांधून उत्तरेकडून होणाऱ्या आक्रमणाला पायबंद घालण्याचा प्रयत्न केला. पुढे हा किल्ला औरंगजेबाकडे आला. नंतरच्या काळात हा भोसल्यांच्या ताब्यात असताना यावर बेणीसिंह नावाचा किल्लेदार होता. त्यावेळी झालेल्या इंग्रजांबरोबरच्या युद्धात बेणीसिंहाने अतुलनीय पराक्रम केला. त्याच्या या पराक्रमाची प्रशंसा जनरल सर जेस्पर निकोल्स यांनी आपल्या नोंदवहीत करून ठेवली आहे. अशा या पराक्रमांनी समृद्ध आणि वैभवशाली बांधकाम असलेला किल्ला गाविलगड म्हणजे विदर्भाचे भूषण आहे. त्यामुळे त्या परिसरात जाऊनही किल्ला न बघण्याचा वेडेपणा करायचा नव्हताच. त्यामुळे वेळात वेळ काढून किल्लाकडे रवाना झालो…

सध्या या गडावर भारतीय पुरातत्व विभागातर्फे डागडुजीचे काम सुरू आहे. त्यामुळे आतमध्ये येणाऱ्या जाणाऱ्यांची नोंद प्रवेशद्वारावरील केंद्रात असलेल्या नोंदणीकेंद्रात सुरू असल्याचे पाहून बरं वाटलं. ते पाहून “देश बदल राहा है’ असा विचार मनात नक्कीच आला… भारतीय पुरातत्व विभाग करत असलेल्या गडाच्या डागडुजीचे काम आणि त्यांच्या कामाचा आवाका खरोखरच थक्क करणारा आहे. गडाच्या प्रवेशद्वारापर्यंत चांगला रस्ता असल्याने गाडी थेटपर्यंत जाऊ शकत असल्याने जाणे येणे तुलनेने सोपे आहे. त्यामुळेच काही लोकांच्या अज्ञानामुळे इथंही काही चुकीचे पायंडे पडू लागल्याचे यावेळी प्रकर्षानं जाणवलं…

शौर्य स्मारक म्हणून आपण गड-किल्ल्यांचे महत्त्व अबाधित राखण्यासाठी धडपडतो… स्वराज्य स्थापनेपासून ते राखण्यासाठी या मातीत शूर योद्ध्यांनी आपलं रक्त सांडलं आहे… ती माती आपण भाळी लावून या युगपुरुषांचे स्मरण करतो… या गडकिल्ल्यांच्या भिंती आजही पराक्रमी इतिहासाची साक्ष देत उभ्या आहेत… हा सारा विचार करत गडात प्रवेश केला तोच डोक्यात तिडीक जाईल असं दृश्य समोर दिसलं… प्री वेडिंगचं वावटळं या गडकिल्ल्यावरही येऊन धडकलेलं दिसलं.. ते पाहून संताप झाला… प्रेम करायला कोणाचा विरोध नाही पण ते कुठे करावे याला मात्र मर्यादा असायला हव्यात. गडकोट जपण्यासाठी दुर्गवीर, सह्याद्री प्रतिष्ठान सारख्या अनेक संस्थेचे मावळे अहोरात्र झटत आहेत…त्याच गडांवर असे प्रकार घडावेत? त्यांच्या श्रमाचा मोबदला असा मिळावा?

अनेकांच्या मते याने किल्लाचे काय नुकसान होणार आहे? बाकी किल्लाचा उपयोग काय तो काय असे म्हणणाऱ्या लोकांना इतकेच सांगणे आहे की गडकोट म्हणजे आमची मंदिरे आहेत. त्यामुळेच त्यांचे पवित्र्य जपले जायलाच हवे. त्यामुळे गडाच्या चौकीत कामावर असलेल्या व्यक्तीला याचा जाब विचारत तिथं सुरू असलेला प्रकार थांबवला. इतकंच नाही तर ज्या मुलीचं (जी माजी खासदाराची मुलगी आहे) लग्न आहे तिला आणि तिच्या होणाऱ्या नवऱ्याचेही कान उपटले… अर्थात हे करून अशा गोष्टींना भविष्यात किती आळा बसेल हे माहीत नाही. परंतु यासाठी स्थानिकांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. त्यासाठी त्यांच्यात जनजागृती करण्याची गरज आहे.

गडकोटचे ही आमच्यासाठी जरी मंदिरे असली तरी कायद्याच्या दृष्टीने राष्ट्रीय स्मारक आहेत त्यामुळे पवित्र जपले गेलंच पाहिजे. हे आपल्यासारख्या नागरिकांचे कर्तव्य आहे. अन्यथा पुढल्या काळात दिवसाढवळ्या गडावर पोरी नासवल्या जातील आणि महाराष्ट्रात माणसासोबत गडकोटही आत्महत्या करतील.