ही भटकंती आहे २०१४ सालची…

देहेणे गावातून दिसणारा “आजापर्वत”

मुंबईपासून साधारण १३० किलोमीटवर शहापूरनजीक आजोबा किल्ला वसला आहे. घनदाट जंगलला सोबत सापांचा वावर हे याचे खास विशेष. याच गडावर बसून वाल्मिकी ऋषींनी ‘रामायण’ हा धर्मग्रंथ लिहिला. सीतामाईने लव आणि कुश यांना जन्म दिला. लव आणि कुश वाल्मिकी ऋषींना ‘आजोबा’ म्हणत असत, म्हणूनच या गडाचे नाव आजोबाचा गड पडले. अशी आख्यायिका आहे. गडावर वाल्मिकी ऋषींचा आश्रम व त्यांची समाधीसुद्धा आहे.

गडावरील वाल्मिकी ऋषींचा आश्रम

आश्रमाजवळून पुढे धबधब्याच्या वाटेने चढत गेल्यास सुमारे एक ते दीड तासानंतर वर एक गुहा लागते. इथं लव-कुशाच्या पादुका खडकात कोरलेल्या आहेत.

लव-कुशच्या पादुका

आणि एक पाळणासुद्धा आहे. स्थानिक लोकं याला सीतेचा पाळणा असं म्हणतात.

सीतेचा पाळणा

इथून पुढे गेल्यावर डावीकडे एक पाण्याचं टाकं आहे. तिथून पुढं सुळक्याकडे मार्ग जातो. या गुहेपर्यंत जाण्यासाठी लोखंडी शिड्या लावल्या होत्या. कालांतराने त्या मोडकळीस निघाल्या आणि आता एका लाकडी ओंडक्यांच्या मदतीने तिथपर्यंत पोहोचता येते.

मोडकळीस आलेली लोखंडी शिडीचे अवशेष आणि त्या जागी पर्यायी लाकडी ओंडका

‘आजा पर्वता’शी माझी ओळख तशी फारच जुनी आहे. ट्रेकचा श्रीगणेशा याच ‘आजा पर्वता’च्या साक्षीनं काकाचं बोट पकडून पाचव्यावर्षी केला होता. त्यानंतर बऱ्याच वेळा ‘आजा पर्वता’ची वाऱ्या झाल्या. परंतु तेव्हा माझी मजल सीतेच्या पाळण्यापर्यंतच म्हणजे गुहेपर्यंत होती.  तेव्हा सुळके चढाईचा विचारही मनात कुठंही नव्हता. परंतु ‘बाण हायकर्स’च्या संपर्कात आलो आणि सुळके चढाईचं जणू वेड लागलं. तब्बल दोन वर्षांत प्रस्तारोहणच्या अनेक यशस्वी मोहिमा ‘बाण’च्या माध्यमातून करता आल्या. सुळके चढाईत प्रस्तारोहणात कुशल असणं गरजेचं आहेच पण त्याबरोबरच मोहिमा यशस्वी करण्यासाठी सोबतचे सहकारी, साधने, पाणी याचं योग्य नियोजन करणं ही देखील मोठी जबाबदारी असते.

सह्याद्रीत पावसामुळे थांबलेले प्रस्तारोहण दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर करून हंगामाची सुरुवात केली जाते. यासाठी कोणते सुळके सर करता येतील याची संभाव्य यादी तयार होते. काही मोहिमा अपुरी सहकारी संख्या, साधनाची कमतरतेमुळे फसल्या जातात. कारण सुळके चढाई म्हणजे सोपं काम नसतं. त्यासाठी सराव महत्त्वाचा असतो. त्यामुळे चढाईचा हंगाम सुरू होण्याआधी आणि त्यानंतरही सरावाला नेहमीच प्राधान्य दिलं जातं. त्यामुळे मोहिमेच्या आधी होणाऱ्या सरावाला जे येत नाही त्यांना मोहिमेत सहभागी करून घेतले जात नाही, हा ‘बाण’चा अलिखीत नियम आहे. त्यामुळे संस्थेतील बरेचजण सरावाला येतातच…

या हंगामाच्या सुरुवातीलाच आम्ही नाशिकच्या अंजनेरी किल्ल्याला खेटून उभे असलेले नवरा, नवरी आणि घोड्याचा कडा असे तीन सुळके एका दिवसात सर केले होते. यानंतर लगेचच कैरा सुळक्याचा माथा गाठल्यामुळे हा हंगामाचा श्रीगणेशा तर चांगला झाला होता. त्यानंतर पुन्हा आजा पर्वतावर जाण्याचा बेत होता. परंतु प्रत्येकवेळी काही ना काही अडचणी येत असल्यानं मोहिमेचा बेत यशस्वी होत नव्हता. परंतु त्यानंतर काहीही झालं तरी  जायचंच असा निर्धार आम्ही सगळ्यांनी केला. मोहिमेला जाणार त्याच दिवशी विश्रामला ऑफिसमधून निघायला उशीरा होणार होता. त्यामुळे मोहिम पुन्हा रद्द होणार का, अशी शंका मनात आली. परंतु काही झालं तरी आपण जायचंच असं विश्रामनं सांगितलं होतं. तरी ही मनात धाकधुकच होती. पण हा पठ्ठा रात्री दोन वाजता मला ठाण्यात येऊन भेटला. त्यानंतर आम्ही लक्ष्मणला आसनगावला रात्री तीन वाजता पिकअप केले आणि आमच्या त्रिकूटाने ‘आजा पर्वता’च्या दिशेने कूच केले…. रात्रभर गाडी चालून पहाटे पाच वाजता डेहणे गाव गाठले. रात्रीच्या प्रवासाचा थकवा आता जाणवायला लागला होता. त्यामुळे गावच्या देवळातच पथारी पसरली. दोन तासांनी लक्ष्मणनं “ चला उठा चला उठा उन्ह वाढेल मग त्रास होईल,” अशी भुणभुण करायला सुरुवात केली.  रात्री निघायच्या गोंधळात खाण्याचं काहीच सामान सोबत घेता आलं नव्हतं. त्यामुळे सकाळी उठल्यावर गावातलं दुकान गाठलं आणि मोहिमेसाठी लागणारं खादाडीचं सामान खरेदी केलं. त्यानंतर दुकानदारासोबत चहाची मैफिलही जमवली. सगळ्या सामानची बांधाबांध करून मोहिमेला सुरुवात केली. खूप वर्षानं ‘आजोबा पर्वता’कडे मोर्चा वळला होता त्यामुळे तिथले बदल जाणवत होते. लोकांची फार्म हाउस थेट आश्रमच्या पायथ्यापर्यंत पोहोचली होती. आकाशात झालेली काळ्या ढगांची दाटी, वातावरणातील गारवा यावरून पावसाची लक्षणं दिसू लागली होती. त्यामुळे मोहिमेची चिंता वाटत होती. त्यामुळे आश्रमात वेळ न दवडता थेट सुळका गाठायचं ठरलं. नाकासमोर वर जाणाऱ्या वाटनं चांगलाच दम काढला होता. त्यात हाताचा आधार घ्यावा तर ‘आजा पर्वता’वरील सापांची भिती होती.  आतापर्यंत चा सापांनी दर्शन दिले होते, त्यामुळे सावधगिरी बाळगत आमची आगेकूच सुरू होती.

बांबू पिट वायपर म्हणजेच चापडा हा विषारी जातीतील साप 

सीतेच्या पाळणा असलेल्या  गुहेकडे आम्ही पोहोचलो होतो. साधारण आरोहणाच्या एक वर्ष आधीच पुण्यातील एका मुलीचा याच ठिकाणी दरीत पडून मृत्यू झाला होता. त्या बचावकार्याची चित्रफित पाहिली होती. त्यामुळे त्या अपघाताची तीव्रता मला माहिती होती. त्यामुळे इथं काळजीपूर्वकच वावरायला हवे हे मनात पक्कं केलं होतं.

सुरक्षा दोर माझ्या हाती

सूर्य अगदी डोक्यावर यायच्या तयारीत असल्याने वेळ न दवडता आरोहणला सुरुवात केली. सुळक्याची उंची जरी १३० फूट असली तरी आरोहणाचा मार्ग १५० फुटांचा होता. या मोहिमचे नेतृत्व लक्ष्मण करणार होता. त्यामुळे त्याने सुरक्षा दोर मी हाती घेतला. त्यानंतर लक्ष्मणने पहिला १५ फुटांचा उभा कातळ सहजणं पार केला.

लक्ष्मण आरोहण करतानाचे क्षण

आता पुढचे आव्हान होते ते निसरड्या मातीचं. त्यावरून पाय कधी घसरले याची शाश्वती नसल्यानं अतिशय काळजीपूर्वक हा पट्टा ओलांडला. याआधीच्या मोहिमेत वापरलेला  पीटॉनला (Piton) नीट तपासून लक्ष्मणनं स्वत:ला सुरक्षित करत आम्हांला वर येण्यास सांगितलं. मग मी आणि विश्राम पहिल्या टप्प्यावर पोहोचलो. इथे लावलेला पिटॉन म्हणजे जुन्या प्रस्तारोहकांची केलेली किमया होती. पिटॉन म्हणून थेट गाडीचा पाटाच वापरला होता. पुढे उजवीकडे वळसा घेऊन पुढचा मार्ग होता. लक्ष्मणनं अगदी सहज हा मार्ग पार केला.  इथून पुढं लक्ष्मण नजरेआड गेल्यानं सुरक्षा दोरावर नियंत्रण ठेवणं कठीण जाणार होते.

त्यामुळे विश्रामच्या सांगण्यानुसार अजून एक टप्पा तयार केला. आता समोर होती २० फूट उभी भिंत… उघड्या पुस्तकाप्रमाणे त्याची रचना होती.  यातून लक्ष्मणने कौशल्य दाखवतं काही मिनिटांतच पुढचा माती मिश्रित ६० फुटांचा टप्पा पार करून माथा गाठला. वर मेख ठोकून स्वत:ला सुरक्षित करून घेतेले आणि आम्ही देखील दोराच्या मदतीने माथ्यावर पोहोचलो…

माथ्यावर विश्राम, मी आणि लक्ष्मण

आमचा हा आनंद पाहायला मात्र समोर रतनगड, हरिश्चंद्रगड आणि बाजूंला पसरलेला आजा पर्वताचा कातळकडा याखेरीच कोणीच नव्हतं. माथ्यावर जास्त वेळ न दवडता. परतीसाठी दोर खाली सोडला. सुखरूप खाली उतरलो.  त्यानंतर धुँवाधार पाऊस कोसळू लागला… जणू काही आमची मोहिम फत्ते होईपर्यंत त्यांनी स्वत:ला रोखून ठेवलं होतं…. धुँवाधार कोसळणाऱ्या  पावसाच्या सरींसोबत आम्ही आनंद व्यक्त करत होतो…