सह्याद्रीची उत्तर दक्षिण रांग म्हणजे थेट इगतपुरी पासून ते थळघाटाच्या पूर्वेकडील परिसर जाते. याच रांगेत महाराष्ट्राचे एव्हरेस्ट समजले जाणारे कळसुबाई शिखर समस्त गिरीप्रेमींना कायमच खुणावत असते. पुढे याचे दोन भाग होतात एका भागात अलंग, मदन, कुलंगसारखे गिर्यारोहकांना आकर्षित करणारे किल्ले तर दुसरीकडे अगदीच दुर्लक्षित अनवट वाटेवरचे औंढा, पट्टा, बितनगड, आडसारखे किल्ले. एखादी सुट्टी पहावी आणि या किल्ल्याची सफर करावी असा मोह प्रत्येक गिर्यारोहकाला होतो… आम्ही तरी याला अपवाद कसे असणार…

१६ आणि १७ ऑगस्ट २०१४ रोजी दोन दिवसांत चार किल्ले भटकायचे या हेतूने तयारी सुरू केली. यातील औंढा किल्ला वगळता सगळे किल्ले पायवाटने पोखरलेले. पण औंढ किल्ल्याचं तसं नाही… १८१८ मध्ये बरेच किल्ले इंग्रजी राजवटीने उद्ध्वस्त केले. त्याची झळ या किल्लाला बसली.  बहुदा त्या काळात  सुबक असणाऱ्या पायऱ्या आज एका कातळ  भिंतीच्या रुपात दिसतात. सुरुंग लावून केलेले आघात आजही किल्ल्यावर भटकंतीवेळी दिसून येतात आणि ते त्या किल्ल्याची व्यथा मूकपणे मांडत आहेत. किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत पवनचक्क्या आल्या आहेत. त्यामुळे गड्याच्या पायथ्यापर्यंत गाड्या जातात.(पायथ्याशी असलेल्या पवनचक्क्या इतक्या उंच आहेत की त्याचे पंखे किल्ल्याच्या मध्यापर्यंत जातात. त्यामुळे पनवचक्कीच्या एखाद्या पात्यावर आरुढ होऊन थेट किल्ल्यावरही जाता येईल का, असा एक गंमतीचा विचारही मनात आला…)

किल्ल्यावर कातळ भिंत असल्यानं पावसाळ्यात तो सर करावा की नाही अशी साशंकता मनात होती. परंतु माझ्यासोबत लक्ष्मण, विश्रामसारखे अनुभवी प्रस्तरारोहक असल्यामुळे भीतीचंही कारण नव्हतं. किल्ल्यापासून काही अंतरावर गाडी लावून दहा मिनिटाच्या पायपिटीनंतर आम्ही किल्ल्याच्या पायथ्याशी आलो. आणखी पुढे काही अंतरावर पंधरा फुटी कातळ भिंत होती. एरवी सोपी वाटले अशी चढाई आज मात्र धडकी भरवणारी होती. कारण मागे ‘आ’ वासलेली खोल दरी होती. पावसाळ्याचे दिवस असल्याने ही दरी धुक्याने पूर्ण भरून गेल्याने तिचा अंदाज येणं कठीण होतं. त्यामुळे अतिशय सावधपणं आम्ही वावरत होतो. संपूर्ण कातळ शेवाळ्यानं भरलेलं होते. त्यावरून चढणं म्हणजे आमची सत्वपरीक्षा होती…

इथं एकच आधार होता तो म्हणजे सुरुंग लावलेली भोकं. ज्यांच्या आधारावर हा टप्पा पार करायचा होता. इथंच सगळा कस लागणार होता. दोर होते, हार्नेस होते पण बांधायला कुठेच वाव नव्हता. शेवटी लक्ष्मणनं एका ठिकाणी कपारीत स्वत:साठी कशीबशी जागा केली आणि माझी जीवन दोरी स्वतःकडे घेतली. विश्राममागे उभा राहून सूचना देता होता. हातांचा बोटांच्या जोरावर हा टप्पा पार झाला आणि सगळ्यांनी हुश्श केले. मग वर दोरी बांधली गेली आणि आम्ही तिघंजणं वर आले.

किल्ला तसा छोटाच होता.  गडावर पाण्याच्या चारपाच टाक्या आहेत. खडकात खोदलेला दरवाजा आहे इतकेच काय ते अवशेष. हे सगळे पाहत असतान लक्ष्मणच्या चेहऱ्यावर चिंतेचे भाव दिसत होते. कारण येताना वर तर आलो…पण खरे दिव्य खाली जाताना होते. न राहून त्याने विचारले,“ खाली जायचा काही विचार केले आहेस का रे दिवा…” मग मी एखादी जादूची पेटी काढावी तसा बॅगेतून पीटोन (दगडाच्या चिरेत ठोकता येणारे साधन. ज्यात दोर अडकून रॅप्लिंग करत खाली येऊ शकतो ) बाहेर काढून दाखवला. कोणताही सुळका असो किवा किल्ला करताना परतीच्या मार्गाचे नियोजन हे आधीच करावे लागते. हे इतक्या वर्षाच्या अनुभवातून नक्कीच शिकलो आहे. पीटोनच्या सहाय्याने दोर बांधून खाली सोडण्यात आला पहिला लक्ष्मन मग विश्राम असे आम्ही पायथ्याला पोहोचलो. यावेळी विश्रामसाठी खास दोराच्या ‘हार्नेस’चा वापर केला. पावसात इथं जाणं नक्कीच धोकादायक आहे यात शंकाच नाही. प्रस्तरारोहणबाबतचे ज्ञान आणि सराव याठिकाणी कामी आला म्हणून ही भटकंती सुरक्षीत आणि रोमांचक झाली.