नुकतेच कामा निम्मित चिखलदरा येथे जाणे झाले. अमरावती तालुक्यात सातपुडा पर्वतरांगेच्या सात पर्वतरांगांपैकी मेळघाट रांगेत चिखलदरा वसले आहे.  समुद्रसपाटीपासूनची ३५६४  उंचीवर  वसलेले हा तालुका. थंड हवेचे ठिकाण म्हणून महाबळेश्वर सोबत याचीही ख्याती सर्वदूर पसरली आहे. राज्यात कॉफीचे उत्पन घेणारे एकमेव ठिकाण म्हणून असलेली ओळख. कॉफीला लागणारे ७० ते ८० फॅरनहाइट तापमान येथे असते त्यामुळे सध्या कॉफी सोबत स्ट्रॉबेरी देखील येथे पिकवली जाते. तसेच मेळघाट रांग ही व्याघ्रप्रकल्प म्हणून घोषित केल्यामुळे येथे प्राण्यांना अभय आहे. या जंगलात वाघा सोबत मोर, रानकोंबडा, अस्वले यांचा वावर मोठ्या प्रमाणात आहेत.

स्ट्रॉबेरीची बाग

चिखलदऱ्या बाबत एक आख्यायिक सांगितली जाते पांडवांनी वनवासातील काही काळ चिखलदर्‍यात घालवला होता असे म्हणतात. येथे असलेल्या विराटनगरीतील जुलमी आणि भोगी राजा कीचक याचा वध भीमाने केला आणि त्याला विराटनगरीहून जवळ असलेल्या एका दरीत फेकून दिले. ती दरी म्हणजेच कीचकदरा. अपभ्रंश होत त्याचे नाव चिखलदरा झाले. ज्या दरीत भीमाने कीचकाला फेकून दिले, ती दरी आणि वरच्या अंगाला ज्या झर्‍यात भीमाने आंघोळ केली ते भीमकुंड.

देवी पॉइंट

अश्या या चिखलदर्यामध्ये पहिल्यादिवशीचे काम आटपून संध्याकाळी देवी पॉइंटला भेट दिली चिखलदरा गावापासून एक किलोमीटरवर असलेला हा पॉइंट म्हणेज चंद्रभागा नदीचे उगमस्तान. काही पायरया उतरून खाली गेले कि एका मोठ्या गुहेत हि देवी वसली आहे. संपूर्ण गुहेत आताच्या मोसमात हि पाणी डोक्यावर पडत राहते. डाव्या बाजूला नदीचे उगमस्तान आहे. दोन मोठ्या दगड शिला एकावर एक ठेवल्यासारख्या दिसतात व त्या खालुन एक छोटा झरा निघुन चंद्रभागा नदी बनते व लांब दरीत कोसळते. तेथेच दगडांखाली चंद्रभागा देवीचे मंदीर आहे. समोर असलेल्या कुंडात पाणी जमा होते आणि मग थेट दरीत कोसळते असे गावकर्यांनी सांगितले पण आत्ता कुंडात पाणी होते पण नदी पात्र मात्र कोरडे होते. या ठिकाण वरून दिसणारे चिखलद-याच्या दरीचे दृष्य थक्क करणारे आहे.

दुसर्या दिवशी सकाळीच मेळघाटला भेट द्यायचे ठरले.  सकाळी पाच वाजता शासकीय विश्राम गृहातून सिमाडोहसाठी निघालो.  चिखलदरा ते सिमाडोह म्हणजे मेळघाट जंगल सफारीचा गेट पर्यंत पोहोचण्यासाठी साधारण ३० किलोमीटरचा घाटरस् पार करावा लागतो. यातील २० किलोमीटरचा पट्टा वनक्षेत्रात येत असल्यामुळे सायंकाळी सह ते सकाळी सहा पर्यंत हा रस्ता बंद असतो. त्यामुळे सकाळी लवकर पोहोचून सहा वाजताच जंगलात जातात येईल म्हणून पाच वाजता जाण्याचे कष्ट घेतले.

इंग्रजांच्या काळात उभारण्यात आलेले सरकारी विश्रामगृह

पण चिखलदर्या निघाल्या पासून १० मिनीटाच पूर्ण वाढ झालेल्या रान गव्याने आमचा रस्ता अडवला. संपूर्ण किर्र काळोखात आम्ही गाडी मध्ये तिघेच आणि १० फुटावर वाट अडवलेला गवा.

आजूबाजूला पहिले तर अजून एक गवा थोडा लांब उभा हो बहुदा ती मादी असावी आम्हाला . पुढे जाण्यासाठी त्याला बाजूला होणे गरजेचे होते. इथे हॉर्न वाजवून चालण्यासारखे न्हवते कारण त्यामुळे तो बिथरू शकतो आणि तो बिथरलाच तर मात्र खर नाही. कारण पूर्ण वाढ झालेल्या गव्याची ताकद इतकी असते कि तो सहज गाडीच पलटी करून देऊ शकतो. पाठीमागे बसलेल्या मित्राने फोटो काढण्यासाठी गाडीचा दरवाजा उघडायचा पर्यंत केला पण आम्ही रोखले कारण या जनावराचा काही नेम नाही. त्याचा हालचाली वरून त्याचा मनात नेमके काय चालू आहे हे समजून घेणे गरजेचे होते. त्याने रस्ताच्या बाजूला असलेला झाडाला डोके घासायला सुरवात केली आणि ताकतीने तो झाड वाकवू लागला. यावरून त्याची चीड लक्षात येत होती किंबहुना तो आम्हाला येथून जाण्याची सूचनाच देत होता. हे नेमके हेरले आणि त्याच्या या सूचनेला मान देत आम्ही निघालो. सिमाडोहला गेल्यावर जेव्हा हा प्रकार आम्ही आमच्या सफारीचा गाईडला सागितलं त्या वेळी अर्धी सफारी वाटेतच केली अशी त्याने प्रतिक्रिया दिली.

मेळघाटातील जंगल छोट्या मोठ्या डोंगर रांगांनी पसरलेलं आहे त्यामुळे प्रामुख्याने वाघ दिसण्याचे प्रमाण फारच कमी असले तरी वाटते ताजे बिबट्याच्या पंजांचे ठसे मात्र नक्की पाहता आले.

पण नवीन जंगल फिरण्याचा आनंद मनात ठेऊन पुन्हा आम्ही चिखलदर्याचा रस्ता धरला.