हरिश्चंद्रगड म्हणजे समस्त ट्रेकरची पंढरी. ट्रेकर जमातीमधील प्रत्येकजण आयुष्यात एकदा तरी या हरिश्‍चंद्रगडावर जाऊन येतोच येतो. गडावरील शिवमंदिर, पुष्पकर्णी,तिथल्या गुहेतील घालवलेली रात्र आणि भास्करच्या हातची झुणका भाकर हे सगळं प्रत्येकानं अनुभवावं असंच…गडावरील कोकणकड्याला जाणं हा तर अद्भूत अनुभव… मात्र अलिकडच्या काळात पावसाळ्यात इथं जत्रेचं स्वरुप प्राप्त येतं… ते असो…

पावसाळ्यामध्ये आठवडाअखेरीस कल्याण डेपोतून माळशेजच्या दिशेने जाणाऱ्या एसटीच्याबसमध्ये बहुतांश हरिश्चंद्र गडाचेच वारकरी असतात. कल्याणहून मुरबाडमार्गे माळजेशच्या रस्त्यावर येणाऱ्या खुबी फाट्याला हे वारकरी उतरतात आणि टोलारखिंडीमार्गे गडाकडे मार्गक्रमण करतात. अगदीच सोपा मार्गाने जायचे तर राजूरचा फेरफटका मारून पाचनईमार्गेही गडाकडे जाता येते. गडाकडे जाताना सगळ्यांचा मनात धडकी भरवते ती नळीची वाट. इतर दिवसांतही अवघड वाटणारी ही वाट पावसाळ्यात पार करण्याचं  पावसात करावी या विचारात होतो. गेल्या वेळी मे महिन्याच्या कडक उन्हात या वाटने आम्हाला चांगलेच दमवले होते. त्यामुळे पावसात ही वाट काय परीक्षा घेते याचा अंदाज मनातल्या मनात घेत आम्ही हरिश्चंद्रगडावर निघालो…

या मोहिमेसाठी लक्ष्मण, दादा, ललित, निरंजन, अक्षय सारखे कसलेले जोडीदार तर होतेच, सोबतीला  जयंती, अश्विनी, दीप्तीदेखील होत्या. मुलांपेक्षा मुलीही कुठंही कमी पडत नाही, हे दाखवून देण्यासाठी त्या उत्सुक होत्या.

गडाच्या पायथ्याशी असलेले बेलपाडा गाठण्यासाठी कल्याण -माळशेज – सावर्णे अशी दरमजल करत तिथंपर्यंत पोहोचलो. याआधी देखील आम्ही या वाटेने गेलो होतो परंतु पावसाळ्यात जाण्याची ही पहिलीच वेळ होती. सकाळी आवरून गावात चहा घेतला आणि गडाच्या दिशेने चालायला सुरुवात केली. पायवाटेने दोन्ही कड्यांच्यामध्ये असलेल्या नळीच्या तोंडाशी आम्ही आलो.

तेव्हा एका दगडपाशी अजगराचे पिल्लू आमच्या स्वागताला होते… त्याचा फोटो काढायचा मोह कसा आवरणार ना? मग ललितला कमरेला दोर बांधून शेवाळं असलेल्या त्या दगडावर अलगद कॅमरासहित सोडलं. फोटोचे कार्य पूर्ण झाल्यावर पुन्हा चालायला सुरुवात केली.

वाटेत पावसाचा जोर कायम होता. दगडावर उगवलेल्या शेवाळ्यामुळे पाय घसरत असल्याने आमचा चालण्याचा वेग मंदावला होता. वाटेवरील साधारण पंधरा फुटी तीन कातळ हे आमच्यासमोरचं मोठं आव्हान होतं. त्यामुळे त्या ठिकाणाहून चालताना विशेष काळजी घ्यावी लागणार होती. कारण पहिल्या कातळाचे रुपांतर धबधब्यात झाले होते त्यामुळे पाय कुठे ठेवावा आणि हात कुठे लावावा हे काहीच समजत नव्हतं. 

पाण्याच्या प्रवाहामुळे दगडावरील शेवाळे इतके जाणवले नाही आणि एका मागोमाग आम्ही हा टप्पा सहज पार केला. सकाळी सात वाजल्यापासून सुरू असलेले आमची वाटचाल  एका रॉकपॅच पर्यंतच आली होती.  अजून बराच पल्ला बाकी होता. घडाळ्याचा काटा चारवर येऊन ठेपला होता. एका ठिकाणी नळी सोडून उजवीकडे आरोहण करावे लागते तेपावसाळ्यात खरोखरच कठीण होतं. खाली उभं राहण्यास नीट जागा नाही, त्यात वरून सातत्यानं  दगड खाली येत होते. अगदी अलगद कमीत कमी दगडावर जोर देत हा टप्पापार केला. इथं दोर लावूनच वर घ्यावे लागले. कारण पाय ठेवावा आणि दगड निसटावा असं सतत घडत होतं.

हा टप्पा पार झाला. मात्र या पुढचा टप्पा कुठून आहे हे लक्षात येत नव्हतं. गेल्यावेळी सोपे वाटणारे हे कातळ  काही केल्या मार्ग दाखवत नव्हते. त्यामुळे मी  बाकींच्यांना एका ठिकाणी थांबून उजवीकडे जाऊन  पाहून येतो म्हणून निघालो. कसाबसा करत मी वर चढत होतो. वर पोहोचणार तितक्यात साधारण चार फूट उभा आणि सहा फूट रुंद असा एक दगड निसटून खाली सरकला. अगदी माझ्या बाजूनं… माझ्या पायाला घासून तो खाली गेला… नशीबाने  ही सर्व मंडळी वर आली होती… त्यामुळे काही अप्रिय घडलं नाही. मात्र त्या दगडाचा आवाज इतका मोठा की माझ्यासह सर्वांची बोबडीच वळली. दगडासोबत मी पण गडगडत खाली गेलो की काय या भितीनं लक्ष्मण धावतच तिकडं आला.  मला सुखरूप पाहिल्यावर त्यानं सुटकेचा निश्वास सोडला. पुढे एके ठिकाणी वाटेची खुण गवसली  आणि सगळे दोराच्या मदतीनं वर आले. वर आल्यावरहीसगळ्यांना त्या दगडचा आवाजच आठवत होता… ती भीती डोळ्यांतही दिसत होती…

पाऊस पडतच होता आता धुक्याची चादरही  हळूहळू पसरू लागली होती. त्यामुळे लवकरात लवकर माथा गाठणे गरजेचे होते. अन्यथा काळोखात चालणे अशक्यच होतं.शेवटच्या कातळाचा  टप्पा पार करतेवेळी अंधाराने आम्हांला गाठलंच. वर आल्यावरदाट धुकं असल्यानं बाजूला नेमकं कोण आहे हे ओळखताही येत नव्हतं तर  गुहा नेमकी कोणत्या दिशेला आहे, हे ही कळणे केवळ अशक्यच होतं. त्यामुळं  एकमेकांचे हात धरून चालत होतो. कुठे दिशा दाखवणारा बाण दिसतोय का, हे बघत चालत होतो. उजव्या हाताला कोकणकड्याची तीन हजार फुटांची खोल दरी असल्यानं चालताना कुणी जास्त उजव्या दिशेला जात नाही ना हे डोळ्यात तेल घालून बघावं लागत होतं. थोड्या वेळातच एका ठिकाणी उजेड दिसला आणि जीवात जीव आला… तिथं गेलो तर तिथंभास्कर दिसला. आम्ही गडावर या मार्गानं येणार याची त्याला कल्पना दिली होती.ठरल्यावेळेपेक्षा आम्हांला यायला उशीर झालाय हे लक्षात आल्यावर तो आम्हांलाच शोधायला निघला होता. दिवसभराचा क्षीण भास्करला भेटल्यावर गायब झाला…

मात्र, या वाटेने आमचीच चांगलीच परीक्षा घेतली होती. सकाळी सात ते संद्याकाळी सात अशी एकूण बारा तासांची ही चढाई मन आणि शरीराला चांगलीच थकवणारी होती. मात्र आजही लक्षात राहते तो त्या दगडाचा आवाज…