सह्याद्रीतल्या अनेक मोहिमा करताना किंबहुना ट्रेकर म्हणून मिरवताना नेहमीच स्वत:चा अभिमान वाटतो.  परंतु एक रात्र अशीही होती ज्यावेळी स्वत:ला ट्रेकर म्हणून घेताना खरोखरच लाज वाटू लागली. ती रात्र होती ढाक बहिरीच्या गुहेतील…

लोणावळा- कर्जत दोन्ही बाजूने पोहचता येणारा आणि सह्याद्रीतील काही अवघड गडकोटांच्या पंगतीत दिमाखात मिरवणारा ढाकचा किल्ला. त्‍या डोंगरात वसलेला देव बहिरी. त्‍याच्‍या नावावरून तो किल्‍ला ‘ ढाकचा बहिरी’ या नावाने ओळखला जातो. आग्नेय- वायव्य पसरलेला अजस्त्र डोंगर आणि त्याचा पोटात खोदलेल्‍या दक्षिणाभिमुख गुहा हेच याचं वैभव. त्याच्या बाजूला उभा असलेला ‘कळकरायाचा सुळका’ आणि माथ्यावरून डोकावणारा ‘सून सुळका’ हे कसलेल्या ट्रेकरसाठी पर्वणीचे ठिकाण. याच सुळक्याच्या मोहिमेच्या पूर्वतयारीसाठी एकदा ढाकला जाऊन यावे असे लक्ष्मणनं आणि मी ठरवलं. किल्ल्यावर जाताना कर्जतहून सांडशी गावातून तर परतीच्यावेळी वधपमार्गे उतरून कर्जतला उतरण्याचं ठरवलं. यामुळे हे दोन्ही मार्ग पाहता येतील असा आमचा विचार होता. सर्व तयारी झाल्यानंतर धाकच्या दिशेने आमचा प्रवास सुरू झाला.  यावेळी आम्ही दोघंच असल्यानं बऱ्यापैकी उसंत होती.  या ट्रेकला कोणतीही घाईगडबड नसल्यानं रात्रीचा मुक्काम  २०० फूट उंचीवरील कातळात खोदलेल्या गुहेत करावा असा विचार मनात होता. केवळ मनात न ठेवता तो प्रत्यक्षात आणण्याचंही आम्ही ठरवलं.

त्यामुळे सकाळी सुरू झालेला आमचा प्रवास दुपारी गुहेत जाऊन थांबला. पोटाची खळगी भरून सुळक्याच्या पाहणीचे काम पूर्ण केले. त्यानंतर मस्त सूप, चहा आणि खिचडी भात असा साधासाच पण फक्कड बेत होता. एरवी मुंबईमध्ये संध्याकाळी सात-आठ वाजेपर्यंत कामात व्यस्त असलेले आम्ही आज मात्र आकाशातील तारे मोजत अगदी निवांतपणं बसलो होतो… गुहेबाहेर असलेली खोल दरीही काळोखानं भरून गेली होती… त्याबरोबर एक निरव शांतताही दाटून आली होती…ही निरव शांतता अनुभवत… तारे न्याहळत कधी डोळा लागला हे कळलंच नाही…

काही वेळानंतर लोकांचे आवाज ऐकू आले म्हणून जाग आली. लोणावळामार्गे आलेला पुण्याचा एक ग्रुप रात्रीच्या अंधारातच ढाकच्या गुहेकडे येत होता. खरं सांगू तर त्यावेळी आनंदच झाला. आपल्यासारखे ट्रेकर सोबतीला असणार म्हणजे गप्पा आणि अनुभवांचे आज रात्री फड रंगणार हे नक्की. त्यामुळे त्याच्या स्वागतासाठी उठून बसलो. ११ जण वर पोहोचले देखील. सोबत कोंबडी शिजवायचा बेत आखूनच. (मुंबईत उभे आडवे कोंबडीवर ताव मारणारे आम्ही गडकोटांवर मात्र शाकाहारीच असतो पण यावर मतभेद असू शकतात असो…) आम्ही चूल आधीच पेटवली होती त्यामुळे तिच चूल वापरा सांगून आम्ही झोपी गेलो कारण त्यांच्या जेवणाला अवकाश होता.

रात्री दोन वाजता अचानक खूप मोठा गोंगाट झाला आणि जाग आली. पाहतो तर एका मुलाला पाच-सहाजण मिळून बेदम मारत होते. एकाने त्याला उचलून देवीच्या लोखंडी गजावर नेऊन आपटला. हे सगळंच खूप विचित्र होतं. आजूबाजूला दारूच्या बाटल्या पडलेल्या दिसत होत्या… जेवणाचं पातेलंही पालथं पडून अन्न इतस्त: विखुरलेलंलं होतं…तिथं असलेल्या मंडळींना कसलीच शुद्ध नव्हती…कोण कोणाला काळोखात मारत होती हे देखील कळतच नव्हतं… आम्ही दोघे एका बाजूला अंग चोरून हे सगळं पहात होतो. हे सर्वजण दारू पिऊन तर्र झालेले असल्यानं त्यांना जाऊन थांबवण्याचा विचार करणंही वेडेपणाचं होतं. ‘अरे आपण ट्रेकिंगला आलो आहोत एन्जॉय करू या,’ असं समजावणारे महाभागदेखील त्यात होते.  ते वाक्य ऐकून खरं तर खूप राग आला होता… स्वत:ला ट्रेकर म्हणायची लाज वाटू लागली होती. असं जर ट्रेकिंग असेल तर मी या पंगतीमध्ये नक्कीच नाही. किंबहुना मी ट्रेकरच नाही. सकाळी उजाडेपर्यंत त्यांचा गोंधळ सुरूच होता. जशी सकाळ झाली तशी ही मंडळी अगदी साळसूदपणानं दारूच्या बाटल्या बाजूला सारून एकत्र बसली होती… जणू काही काल रात्री काहीच घडलं नव्हतं…

आम्ही ही सकाळी लवकरच उठून वडापच्या मार्गाला लागलो होतो. धाक गावापर्यंत लक्ष्मण आणि मी गप्पच होतो. कालच्या रात्री झालेल्या प्रकारची खंत मनाला खात होती कारण मूक साक्षीदार होण्यापलीकडे आमच्या हाती काहीच नव्हतं. एकीकडे धाक देवाला स्त्रियांची सावलीही चालत नाही म्हणून ती इतक्या अवगड ठिकाणी येऊन विसावली आहे असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. परंतु अशा लोकांमुळे तिचे पवित्र कसं अबाधित राहणार… हा विचार खूप अस्वस्थ करत होता. म्हणून धाकच्या गावकऱ्यांची भेट घेतली आणि घडाला प्रकार सांगितला…‘तुमच्या पैकी कुणीतरी येऊन खिळे लावून तो मार्ग सोप्पा केलात नं… त्यामुळे अशा लोकांचे फावतंय… आम्ही तरी काय करणारं?’ असं बोल आम्हांला गावकऱ्यांनीच सुनावले…

हे फक्त याच ठिकाणी आहे असे नाही नाणेघाट, राजमाची सारख्या ठिकाणी हे प्रकार सर्रास चालतात. ट्रेकिंगची मूळ व्याख्याच बदलत गेली आहे. आठवडाभर काम करून सुट्टीच्या दिवशी मजा करण्याचं साधन म्हणून आज ट्रेककडे पाहिलं जाऊ लागले आहे. अभ्यासूवृत्ती गायबच झाली आहे. अशा घटनांकडे पाहता निव्वळ चंगळवादच दिसून येतो. पुढल्या काळात जर ट्रेकिंग अशाच होणार असेल मला स्वत:ला ट्रेकर म्हणून घेणे मान्य नाही हे नक्की…