रतनवाडी ते कुमशेत.

फुलांची आवड नसलेली व्यक्ती सापडणं तसं विरळच.. म्हणूनच कास पठारावर फुलणा-या मनमोहक आकाराची, रंगांची फुलं पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येनं पर्यटक जात असतात. परंतु अशा गर्दीच्या ठिकाणी जाण्यापेक्षा जिथं निवांतपणानं निसर्गाशी, झाडांशी, पाना-फुलांशी हितगुज साधण्याची मजा काही निराळीच असते. त्यामुळे गर्दीची ठिकाणं होता होईतोवर टाळण्याकडे कल असतो… म्हणून मग निसर्गाशी गुज साधाता यावं यासाठी रतनगडाला खेटून उभ्या असणाऱ्या कात्राबाईच्या खिंडीची निवड झाली.

रतनवाडीतून दिसणारा रतनगड व बाजूला खुट्टा सुळका

रतनगड, नाशिक जिल्ह्यातील घनचक्कर रांगेतील हा किल्ला. प्रवरा नदीही याच गडावरून उगम पावते. इथला परिसर समृद्ध झाला तो भंडारदर धरणामुळे. रतनगड ते ट्रेकरची पंढरी असलेला हरिश्चंद्रगड हा ट्रेक बरेच भटके आवर्जून करीत असतात. याचा रतनगड ते हरिश्चंद्रगड ट्रेक दरम्यानचा हा मूळ टप्पा. परंतु आम्ही त्याची फोड आमच्या पद्धतीनं केली. रतनवाडी मग कात्राबाई पुढे कुमशेत इतकीच भ्रमंती करू हे पक्कं केलं. (खरे तर पेठेची वाडीपर्यंत जायचं होतं परंतु काही कारणांमुळे ते झालं नाही.) परतीच्या पावसाचा हा काळ असल्यानं हा संपूर्ण परिसर पिवळ्या जर्द रंगाच्या सोनकी फुलांनी भरून गेला होता. जणू काही संपूर्ण धरीत्रीनं पिवळ्या रंगाचा शालूच परिधान केला होता. त्यात आम्ही जात होतो ती कोजागिरीची रात्र होती. हा योग जुळून येणं तसं कठीणच असतो. त्यामुळे हा बेत तडीस न्यायचा हा आमचा अट्टाहास होता. मूळ नियोजनानुसार अभिजित आणि मी जाणार होतो. परंतु आयत्यावेळी अभिजितने कच खाल्ली. मग मी, केदार, विश्राम, संकेत, कैलाश आम्ही कसाऱ्याला जाणारी रात्री उशीरा ट्रेन पकडली. पांडुरंगला आधीच सांगितलं असल्यानं तो कसा-याला दीड वाजता गाडी घेऊन हजर झाला होता. रतनवाडी गावात पोहोचेपर्यंत गाडीत झोप घेता येईल, असा विचार केला परंतु रस्तावरील खड्ड्यांमुळे झोप उडून गेली.  पहाटे चारच्या सुमारास रतनवाडीला पोहोचलो.

अलिकडच्या काळात या गावाचं स्वरूप फार बदलून गेलं आहे. हेमाडपंती अमृतेश्वर मंदिर, रत्नासारखा सदाबहार रतनगड पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्या पाहता हॉटेल, लोकांना राहण्यासाठी मिळणारे रूम, या साऱ्या सुविधांनी गाव व्यापून गेलं आहे. एरवी गावाची शाळा मंदिर झोपण्यासाठी शोधणारे आम्हीसुद्धा या विकासाचे बळी पडलो…आणि आम्ही एका हॉटेलवर विसावलो. शुक्रवारी दिवसभर काम आणि रात्री न मिळालेली झोप यामुळे रुमवर गेल्या गेल्या आम्ही सर्वजण गाद्यांवर जे आडवे झालो ते थेट सकाळी सातचा गजर होईपर्यंत…

सकाळची आन्हिके उरकल्यानंतर चहा-नाश्ता करून अमृतेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेतल्यानंतर आम्ही रतनगडाकडे मोर्चा वळवला. दहा मिनिटांतच धरणाच्या शेजारी पोहोचल्यावर समोर दिसणारी डोंगररांगा, बाजूला असलेला पाण्याचा परिसर पाहून काही वेळ तिथेच थांबण्याचा विचार मनात आला. परंतु मनाला आवर घातला आणि पुढची वाट धरली.

तासाभरात चौक गाठला इथूनच एक मार्ग रतनगडावर तर दुसरा हरिश्चंद्रगडावर तर तिसरा रतनगडाच्या खुटया सुळक्याला वळसा घालत सामद्र गावकडे जाणारा होता. इथं थोडं थांबून गरमागरम मॅगी आणि लिंबू सरबताचे दोन ग्लास रिचवले.

संवाद निसर्गाशी

एव्हाना सूर्य डोक्यावर चांगलाच तळपू लागला होता. वाट जंगलातून असली तरी ऑक्टोबर हिट चांगलीच जाणवत असल्यानं पुढची वाट जीव काढणारी असल्याची अटकळ होती. परंतु तसं झालं नाही. 

अग्निबाण सूळक्याचे मनमोहक रूप

कारण वाटेत पसरलेलं सोनकीच्या पिवळ्या जर्द फुलांचे गालिचे. या फुलांमध्ये असलेला मध गोळा करण्यासाठी येणारे किटक, फुलपाखरांचा मागोवा घेत निसर्गात स्वतःला हरवून गेलो होतो.एरवी घडाळ्यावर विसंबून असणारे आम्ही निसर्गाच्या मोहात पडलो होतो.

सोनकीच्या फुलांचा बहर
वाटेत लागणारे पाण्याचे टाक

कात्राबाईच्या डोक्यावरून दिसणारे डोंगर कापऱ्या, वाटेत लागणारे अग्नी बाणसारखे सुळके स्तब्ध करत होते. हळूहळू सूर्य परतीच्या मार्गाला लागला होता. तेव्हा निसर्गाचा हा पाहुणचार शब्दांच्या पलिकडचा होता. परंतु त्यात हरवून न जाता कुमशेत गाठावे म्हणून आम्ही भराभरा पावले उचलली. तसं हे गाव माझ्या परिचयाचं कारण दोन वर्ष पूर्वी दिवाळीतील “JOY OF GIVING” च्या दरम्यात गावात येणं झालं होतं.

कुमशेत गाव गाठताच पहिलं घर दिसलं ते मामांचं. कुडाच्या मातीच्या भिंती, अंगावर फाटके कपडे, परिस्थिती अगदीच बेतासबात. आम्ही दिसल्यावर चहा घेणार का विचारतच पाण्यानं भरलेला तांब्या हातावर ठेवून मामा घरात शिरले. खरं तर गावात खूप चांगली घर तर होतीच शिवाय मंदिर आणि शाळा ही निवाऱ्यासाठी उत्तम जागा होत्या. तरी देखील आम्ही तिथे राहण्याचा विचार केला. कारण त्या घरात दिसलेली मनाची श्रीमंती तिथं अनुभवायला मिळणार नव्हती. अर्थात त्यावेळी पावसाची चिन्हं दिसत नव्हती. त्यामुळे रात्री बाहेरच झोपायचा बेत आखला होता. तत्पूर्वी जेवणासाठी काय खाणार असा प्रश्न मामांनी विचारला. (खरं तर त्यांचा तो प्रश्न ऐकून आम्ही अचंबित झालो होतो.)  जे काही असेल ते चालेल असं त्यांना सांगितलं. त्यांनीही पोळी-भाजी, डाळ-भात असं साधंस पण पोटभर जेवणं अतिशय प्रेमानं वाढलं. त्यांचे हे आदरातिथ्य पाहून तृप्त मनानं आणि भरल्या पोटानं अंगणात आम्ही पथाऱ्या पसरल्या… परंतु काही वेळानं पाऊस सुरू झाला आणि नाईलाजानं घरात यावं लागलं. खरं तर घरात अजिबातच जागा नव्हती त्यामुळे गोठ्यात झोपण्याशिवाय पर्याय नव्हता. एका बाजूला गाय दुसरीकडे बकरी यांच्याबरोबरच आम्ही झोपलो. परंतु त्याचा त्रास जराही जाणवला नाही. कारण हे आम्ही काही तास तशा परिस्थितीत होतो परंतु हे मामा आणि त्यांचे कुटुंब  कित्येक वर्ष जगत आहेत. असं असूनही कोणतीही अपेक्षा न करता त्यांनी केलेला पाहुणचार माणुसकी शिकवून गेला. आपण छोट्या छोट्या समस्यांचा इतका बाऊ करत आयुष्य जगत असतो. परंतु मामा उदरनिर्वाहासाठी मजुरी करण्यासाठी नारायणगाव पुण्यापर्यंत जातात.  त्यांचं आयुष्य जरी फार कष्टाचं असलं तरी घरी आलेल्या पाहुण्यांचं स्वागत हसतमुखानं करण्याची त्यांची वृत्ती खरोखरच कौतुकास्पद तर होतीच पण ती अनुकरणीय होती. या सगळ्याचा विचार करत त्या गोठ्यातही निवांत झोप लागली. 

कुमशेत गावातील उगवतीचा सूर्य

सकाळी लवकर उठून गावातून एसटीकडून राजूर आणि पुढे कसारा गाठले. परंतु ती रात्र समस्यांचा बाजार न मांडत आयुष्य समाधानी कसं जगावं हे शिकवून गेली.

डोंगरातील सुरक्षा