सह्याद्रीतील अनेक डोंगर सुळक्यांना नवरा, नवरी, वऱ्हाड अशी नावं असल्यानं तिथं गेल्यावर एखाद्या लग्नमंडपात गेल्यासारखं वाटतं. कारण प्रत्येक ठिकाणी नवरा-नवरी हे आहेतच काही ठिकाणी करवली आणि भटोबाही आहेत. आसनगाव नजीक माहुली परिसरात संपूर्ण व-हाडी मंडळीच उपस्थित आहेत. सह्याद्रीमध्ये अनेक सुळक्यांची अनेक चमत्कारीक अशी नावे आहेत. अशा चमत्कारी नावांचे हे सुळके आम्हा गिर्यारोहकांना कायमच आव्हान देत आकर्षित करतात.

पुणे जिल्ह्यातील लोणावळ्याजवळील भांबुर्डे गावाला खेटून असलेले काही सुळके अनेक दिवसांपासून आम्हांला खुणावत होते. या गावानजीक असलेल्या नव-याच्या मोहिमेवर जाण्याचे आम्ही निश्चित केले. सर्वांची वेळ जुळून आली ती  १ डिसेंबर २०१४ रोजी… आणि आम्ही मिशन भांबुर्डे हाती घेतलं.

डावीकडून नवरी , नवरा आणि करवली सुळके

लोणावळापासून काही किलोमीटरच्या अंतरावर आंबीवली हे सुखसोयींनी सज्ज शहर असलं तरी त्याच्या थोडं पुढं मुळशी भागाच्या कुशीत वसलेल्या भांबुर्डे गावात आजही मुलभूत सोयीसुविधांची वानवा आहे. याच गावाच्या माथ्यावर असलेले नवरी, नवरा आणि करवली हे तीन सुळके प्रस्तरारोहकांना नेहमीच खुणावतात. मधला सुळका पाहिल्यावर राकड देहाचा नवरा उभा असल्याचा भास होत असल्यानं अर्थातच हा सुळका झाला नवरा. त्याचा डाव्या बाजूला ऐन तारुण्यात असलेली नाजूक बांध्याची अशी नवरी, आणि उजवीकडे लहान मुलीचा डोक्यावर केस बांधावे असे डोक्यावर टोक असलेली करवली. यातील नवरा सुळक्यावर आरोहण करण्याचा आमचा मानस होता. 

केदार,लक्ष्मण,विश्राम,स्वाती,सोनाली आणि मी असे आम्ही रात्रीच या मोहिमेला निघालो. लोणावळा ते आंबिवलीपर्यंत रस्ता चांगला असला तरी त्यापुढचा प्रवास आमचा आणि गाडीचा परीक्षा घेणारा होता. कसाबसा तो प्रवास संपवून आम्ही गावात पोहोचलो.

गावातील मंदिराच्या आवारात मुक्कामाची जागा

रात्री पोहोचल्यावर गावातील एका देवळाबाहेर तंबू बांधून सर्वांनी मस्त पथारी पसरली. प्रवासामुळे दमछाक झालेली असल्यानं जमिनीला पाठ टेकताच झोपेच्या आधीन झालो.

सकाळी उठल्यानंतर सर्व आन्हिके आटोपून नाश्ता करून सुळक्याचा पायथा गाठण्यासाठी निघालो.

गावातून सुळक्यासाठीचे प्रस्थान

भांबुर्डे गावाच्या अगदी डोक्यावर असणाऱ्या या सुळक्याचा पायथा गाठणं सोपं नव्हतं. कारण तिथं जाण्यासाठी रुळलेली पायवाट नव्हती. त्यामुळे लक्ष्मण, स्वाती, सोनाली आणि केदार एका ठिकाणी वाट शोधण्यासाठी गेले तर दुसरीकडे मी आणि विश्राम निघालो.

सुळक्याच्या पायथ्याशी पोहोचण्यासाठीचा मार्ग

सोबतीला विश्राम असल्यानं कोणतीही वाट आपल्याला अडवू शकत नाही, याची पक्की खात्री होती. त्यामुळे सरळ एका घसरड्या मातीवर चढायला सुरुवात केली. मजलदरमजल करत सुळक्याचा पायथ्याला पोहोचलो आणि त्यानंतर दोर बांधून सगळ्यांना वर घेतलं. आता पुढं खरं आव्हान होतं ते नवऱ्याच्या आरोहणाचं.

सोनाली पहिल्यांदाच झुमारिंगचा अनुभव घेताना

नवरी आणि नवरा यांच्यामधून जाणाऱ्या घळीमधून नवऱ्याच्या प्रस्तरारोहणाचा मार्ग होता. समोर उभी असलेली वीस फुटी कातळ भेग मग त्यानंतर ७० फुटांचा आडवा पट्टा आणि मग मातीमिश्रीत काही भाग असा मार्ग खालून दिसत होता. या आडव्या टप्प्यात अपघात झालाच तर मोठं नुकसान होऊ शकतं,याची जाणीव असल्यामुळे ते टाळण्यासाठी काय करता येईल, यावर चर्चा सुरू झाली. ७० फुटांच्या टप्पात कुठंच सुरक्षा दोरी अडकवता येतील, असा आधार नव्हता आणि बनवताही येणार नव्हता. त्यामुळे पडल्यास लोलकाप्रमाणे स्थिती होऊन बाजूच्या कातळ भिंतीवर जाऊन आदळण्याची भिती असल्याचे लक्ष्मण वारंवार सांगत होता. ते लक्षात ठेवून आरोहणाचे नियोजन केले.

आरोहणासाठीची तयारी

लक्ष्मणनं सगळं ठीक आहे ना याची खातरजमा केली आणि माझा सुरक्षा दोर हातात घेतला आणि गणपती बाप्पा मोरया म्हणत मी कातळाला हात घातला.

सुरुवातीला भेगेत फ्रेंड नावाचे सुरक्षा साधन नीट लावले. २० फुटांवर एक जुना खिळा दिसत होता. त्याची अवस्था फारच वाईट असल्यानं त्यावर अवलंबून राहणे योग्य नव्हते. त्यामुळे तिथं एक मेख लावून सुरक्षित केले. आता खरी कसोटी लागणार होती कारण ७० फुटांचा वळसा पार करायचा होता. जिथं हात लावत होतो तिथून माती, दगड खाली पडत असल्यानं स्वतःला सुरक्षित ठेवणे अवघड होतं. परंतु एका ठिकाणी एका खळग्यात मेख लावून स्वतःला सुरक्षित केल्यानंतर माझ्या जीवात जीव आला. लक्ष्मणच्या हातात माझी सुरक्षा दोरी असल्यानं मला काळजी नव्हती. कारण प्रस्तरारोहणात आरोहाकांचा एकमेकांसोबतच ताळमेळ असणं हे फारच महत्त्वाचं असतं. कुठं सुरक्षा दोरी सैल सोडायला हवी आणि कधी घट्ट हे समजणं गरजेचं असतं.

अंग दगडावर झोकून देऊन अलगदपणे टप्पा पार करताना
लक्ष्मण पहिल्या टप्प्या पर्यंत पोहोचण्याच्या प्रयत्नात
एका छोट्याश्या खळग्यात सामावलेलं आम्ही

मातीचा टप्पा पार झाला आणि आम्ही खाली उभे असणाऱ्यांच्या दृष्टीआड गेलो. इथून पुढे मार्गाबाबतच्या सूचना मिळणार नव्हत्या. जे काही निर्णय आहे ते माझे आणि लक्ष्मणचे असणार होते. पुढे कातळावर चढाई असल्यानं प्रस्तरारोहणातला खरा रोमांच अनुभवता येणार होता. वाटेत लागणाऱ्या भेगेत फ्रेंड उत्तम बसत होते. या आरोहणाचे वैशिष्ठ्य म्हणजे कोणत्याही खिळ्यांचा यामध्ये वापर आम्ही केला नाही. जेणेकरून दगडाला कोणत्याही प्रकारे इजा न होता पुढे येणाऱ्या इतर टीमला तोच रोमांच अनुभवता येईल. आणि आम्हांला क्लिन क्लायबिंगचा मूलमंत्र ही पाळता आला. 

सुळक्याचा माथा आणि माथ्यावरील आधारसाठीचे भक्कम झाड
नवऱ्याच्या माथ्यावरून दिसणारा नवरी सूळक्याचा माथा
माथा गाठल्याचा चेहऱ्यावरील आनंद

अशा प्रकारे पुढली शंभर फुटांची चढाई पार करून आम्ही माथा गाठला. सकाळी पायथा गाठण्यासाठी लागलेला वेळ आणि आडव्या चढाईच्या वेळी गेलेला वेळ यामुळे आमचे वेळेचे गणित पूर्णच बिघडले होते.  पुन्हा गाव गाठून लोणावळा ते मुंबईचा प्रवास करायचा होता त्यामुळे जास्त वेळ न दवडता परतीच्या तयारीला लागलो. माथ्यावर असणाऱ्या झाडाला वळसा मारून आणि खाली अजून एका झाडाचा आधार घेत दोन टप्पांत परतीचा मार्ग पूर्ण केला.

अशा अनुभवातूनच बरंच काही शिकता येत, खरा रोमांच अनुभवता येतो. मानसिक व शारीरिक कसोटीमुळे निर्णय घेण्याची क्षमता विकसित होते हे खरं.

शारीरिक उर्जेसाठी एल्क्ट्रोल

खाली जोडलेला दुवा १६ ऑक्टोबर २०१५ रोजी लोकसत्ता वृत्तपत्रात आरोहणा बाबत प्रसिद्ध झालेल्या लेखाचा आहे. 

https://www.loksatta.com/trekit-news/article-of-diwakar-statham-1150932