‘दिव्याखाली अंधार’, ही उक्ती ठाणे शहराजवळ असलेल्या घोडबंदर किल्ल्याबाबत अगदी तंतोतंत लागू होते. कारण इतक्या मोठ्या शहराजवळ असलेला हा किल्ला अजूनही अपरिचितच राहिला आहे…

हा अपरिचित किल्ला बघून यायलाच, हवा असा विचार मनात आला आणि तातडीनं विश्रामला फोन केला तेव्हा रात्रीचा एक वाजला होता! पठ्ठा नेमका जागाच असल्यानं दुस-या दिवशी किल्लावर जायचा बेत ठरला… ठरल्याप्रमाणे सकाळी सहा वाजता आम्ही दोघंही आपापल्या दुचाकीवरून निघालो. प्रचंड वाहतूक कोंडी आणि आकाशाला गवसणी घालणा-या टोलेजंग इमारतींमुळे घोडबंदरची ओळख झाली आहे. परंतु या घोडबंदर भागाची जुनी ओळखही आहे परंतु कालौघात ती हळूहळू मागं पडली आहे…घोडबंदर म्हणजे उल्हास नदीच्या खाडीवर वसलेलं हे घोडबंदर नावाचं छोटंसं गाव. मोजकीच पण टुमदार घरे, घराबाहेर क्रॉस.(पोर्तुगिजांचा अमल असताना येथील मूळ रहिवाशांचं धर्मांतर झालं असण्याची शक्यता जाणकारांनी वर्तवली आहे.)

ठाण्याहून या किल्ल्याकडे जाण्यासाठी फाऊंटन हॉटेलकडून मुंबईच्या दिशेनं साधारण दोन किलोमीटरवर असलेल्या सिग्नलकडून उजव्या बाजूला जाणा-या रस्त्यानं आम्ही निघालो या रस्त्यानं आम्ही थेट घोडबंदर गावात पोहोचलो. (मुंबईच्या बाजूनं आलात तर हाच रस्ता फाऊंटन हॉटेलच्या अलिकडं डावीकडं वळणार हे विसरू नका). गावात नाश्ता मिळेलच याची शाश्वती नसल्यानं या फाऊंटन हॉटेलमध्ये पोटपूजा करावी हे उत्तम. आम्ही ही तिथंच भरपेट नाश्ता करून पुढं निघालो.

गावातील टोकाला गेल्यानंतर किल्ल्याची सीमा सुरू होते. मिरा-भाईंदर महापालिकेच्या हद्दीत असलेल्या घोडबंदर किल्ला परिसर ‘पर्यटन स्थळ’ म्हणून विकसीत होत आहे. राज्याच्या महसूल विभागानं ही जागा २०१९ मध्ये महाराष्ट्र पर्यटन महामंडळाकडे (एमटीडीसी) हस्तांतरित केली असल्यानं किल्ल्यावर विकास काम सुरू आहे. हे काम करणारे मजूर अगदी सकाळीच किल्ल्यावर दाखल झाले होते. (आणि टिकॉकप्रेमीही…)

किल्ल्यामध्ये आत शिरल्यानंतर पडीक चर्च दिसतं. त्यानंतर किल्ल्याचा पश्चिम बुरुज. इतर गडावरील बुरुजाच्या रचनेपेक्षा हा थोडा वेगळा आहे. कारण सामान्यतः बुरुजावर जाण्यासाठी पाय-या या बुरुजाच्या बाह्य बाजूस असतात परंतु इथं त्या आतल्या बाजूला आहेत. बुरुजाचा दरवाजाही बंद करता येतो. या दरवाजाच्या वरच्या बाजूनं लाकडी अथवा धातूची फळी सरकवता येण्याची व्यवस्था आहे. त्यानंतरही जर कुणी दरवाजा तोडून आत येण्याचा प्रयत्न केला तर त्याला रोखण्यासाठी वरून दरवाजावर गरम तेल अथवा पाणी सोडण्यासाठी खोबण्या आहेत. काळाच्या ओघात त्या दिसेनाशा होऊ लागल्या आहेत. तिथे कुणा महाभागाने विटा भरून ठेवल्या आहेत. आतील पाय-या चढून जेव्हा आम्ही वर गेलो त्यावेळी एक खोली दिसली. आज ती खोली अस्वच्छ, कचऱ्यानं भरलेली असली तरी एकेकाळी त्या खोलीचा वापर धान्य, दारूगोळा ठेवण्यासाठी अथवा पहारेक-यांच्या विश्रांतीसाठी होत असण्याची शक्यता आहे.

या बुरुजावरून मिरा-भाईंदरमधील टोलेजंग इमारती, उल्हास खाडी, बाजूला असलेली कांदळवनं तर दिसतातच शिवाय एका छोट्या नाल्यातून गटार गंगा वाहात येऊन खाडीला मिळत असल्याचं दुर्दैवी दृश्यही नजरेस पडतं. (यामुळे  विकासाचं आभासी चित्र उभं करत निसर्गाचा -हास करणा-या माणसाचा स्वार्थी चेहरा ही दिसतो.) पूर्वेकडे पाहिले असता वसईचा भाग नजरेस पडतो. म्हणून भौगोलिक दृष्ट्या घोडबंदरच्या किल्ल्याला इतिहासात महत्त्वाचे स्थान होतं.

पूर्वीच्या काळी ठाणे, भिवंडी, कल्याण ही महत्त्वाची व्यापारी केंद्रे होती. इथं युरोपातूनही माल येत असल्याच्या नोंदी आढळतात. अरबस्थानातून घोडे घेऊन येणारी जहाज इथंच उतरवली जायची. त्यावरून या गावाला घोडबंदर नाव मिळाल्याचं कळतं. तरी काहींच्या मते या भागाचा आकार घोड्यासारखा आहे म्हणून याला घोडबंदर म्हटलं जात असावं. (मला पहिला संदर्भ अधिक योग्य वाटतो.)

आमची भटकंती सुरू करण्याआधी या किल्ल्याची माहिती विविध पुस्तकांतून आवर्जून वाचली. त्यानुसार १५३० कालखंडात पोतुगीजांनी जेव्हा वसईचा किल्ला उभारला त्यावेळी त्याचा संरक्षणासोबत खाडीतील व्यापारीमार्ग सुरक्षित रहावा म्हणून दुर्गाडी, ठाणे, गायमुख, नागाला बंदर अशा अनेक किल्ल्यांचं जाळं विणलं. १५७० मध्ये घोडबंदर किल्ल्याचा पाया रचला आणि किल्लासोबत चर्चच्या उभारणीला सुरुवात केली. मुस्लीम राजवटीत सागरी मार्गावर कोणी जास्त लक्ष दिलं नाही त्यामुळे सिद्धी आणि फिरंगी यांचेच या सागरावर अधिराज्य होतं. शिवरायांनी १६७७ च्या कालखंडात कल्याण आणि भिवंडी जिंकून घेतलं. सह्याद्रीच्या डोंगर द-यांसोबत राजांना समुद्राचं महत्त्व माहित होतं. म्हणूनच कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्याशेजारी मराठ्यांच्या नौदलाच्या उभारणीची सुरुवात झाली. याची चाहूल वसईच्या किल्ल्याच्या किल्लेदारास लागतच त्यानं याला विरोध केला. हेच नाही तर गोव्याच्या तत्कालीन व्हाईसरॉयनंही याला कडाडून विरोध केला होता. कारण याचा उल्हास नदीतून होणा-या व्यापा-यावर पोर्तुगीज  दख्खन प्रांतावर दबाव ठेवून होते. परंतु राजांनी या कुणाच्याही विरोधाला  जुमानलं नाही. “ज्याचे आरमार त्याचा समुद्र” हे त्यांना पक्के ठावूक होतं. याच किल्ल्यानं मराठा आरामार समुद्रात जाताना पहिल्यांदा पहिलं असणार. काय तो क्षण असेल विचारानं देखील अभिमानानं छाती फुलून येते.

शिवरायांनी हा प्रांत जिंकण्यासाठी मोहीम आखली परंतु त्यांना मात्र यात यश आलं नाही. पुढे संभाजी महाराजांनी पालघरचा भाग स्वराज्यात आणला. तेव्हा हा किल्ला मात्र पोर्तुगीजांच्या ताब्यात होता. व्यापारासाठी आलेल्या पौर्तुगीजांनी हळूहळू धर्मप्रचारात उडी घेतली होती. जोर जबरदस्तीनं आणि कपटी मार्गानं धर्मांतर केलं जात होतं. याच अन्यायाला थांबवण्यासाठी ठाण्याच्या आंजूर गावातील गंगाजी आंजूरकर यांनी शाहूमहाराज आणि नाना फडणवीस यांना पत्र लिहले. त्यात ते म्हणतात: “आम्ही भ्रष्ट तर झालो आहोतच नष्ट होऊ नये हीच विनंती” महाराष्ट्र धर्म वाचविण्यास मदत करावी.

या सा-याचा विचार करून बाजीराव पेशव्यांनी चिमाजी अप्पांना वसईच्या मोहिमेची जबाबदारी दिली. १७३८ ते १७३९ च्या काळात या वर्षांत या भागात ब-याच लढाया झाल्या आणि त्यातून ठाणे, गायमुख, मालजी पडा, कामणदुर्ग या भागातील किल्ल्यांसोबत घोडबंदर किल्ला देखील मराठ्यांनी जिंकला. कालांतरानं वसईच्या लढाईत या किल्यानं धान्य, दारुगोळा पुरविण्याचा कार्यात खूप मदत केली. १७८० मध्ये इंग्रजानी पुन्हा हा किल्ला काबीज केला. जेव्हा सालबाईचा तह झाला त्यावेळी महादजी शिंदे आणि नाना फडणवीस यांनी पुन्हा हा किल्ला मागून घेतला. पुढे १८१८ च्या काळात सगळ्या किल्ल्यांप्रमाणे हा किल्लाही इंग्रजांच्या ताब्यात गेला.  मग या किल्यात इंग्रजांनी ठाणे जिल्हा कलेक्टरची कचेरी स्थापन केली. त्यावेळीच ठाणे जिल्हा म्हणजे आजचं पालघर, वसई, मुंबई, मुंबई उपनगर आणि ठाणेसोबतच काही रायगड जिल्ह्यांतील काही भाग. म्हणजे या संपूर्ण भागाचा कार्यभार याच किल्ल्यात बसून कलेक्टर करायचा.

बुरुजावर उभं राहिलं असता एका मशिदीसारखं दिसणारं बांधकाम पूर्वेकडील टेकडीवरून सतत लक्ष आकर्षित करत होतं. ते पाहण्यासाठी आम्ही ३० पाय-या चढून तिथं गेलो. तिथं गेल्यावर लक्षात आलं की ती मशीद नसून कलेक्टरचं निवासस्थान होतं. त्यानंतरच्या काळात हे गेस्ट हाऊस म्हणून वापरलं जायचं, असं गावातील लोक सांगतात. परंतु आता या इमारतीची अवस्था अतिशय वाईट असून तिथं माकडांचं वास्तव्य आहे. गेस्ट हाऊसमध्ये नंतर केलेल्या डागडुजीमुळे त्याचं मूळचं रूप हरवलं आहे. या इमारतीच्या घुमटाला आतल्याबाजूनं छप्पर तयार करून त्याचं विद्रुपीकरण झालं आहे. तरीदेखील ही  वास्तू आपले अस्तित्व टिकवण्यासाठी झगडत आहे. खरं तर याठिकाणी सुंदर वस्तुसंग्रहालय बांधणं आवश्यक आहे.

किल्ल्याच्या एका बाजूला खाडी आहे. तिथं नैसर्गिक दगडी भिंत असल्यानं भरतीच्यावेळी खाडीचं पाणी किल्ल्यात शिरत नाही. या भिंतीवरून आम्ही चालत किल्ल्याचं पश्चिम टोक गाठलं. इथून संपूर्ण खाडीचं विहंगम नजरा दृष्टीस पडला. इथून चालताना थोडी काळजी घेणं गरजेचं आहे कारण भिंतीच्या  दगडांना मोठ्या भेगा पडल्या असून त्यांचा काही भाग खचला आहे. किल्ल्याच्या पूर्वेस एका जीर्ण धोकादायक अशा स्थितीतील इमारत आहे. त्याच्या डावीकडे गावच्या बाजूनं गेल्यास अजून एक बुरुज नजरेस पडतो.  अशा पद्धतीनं संपूर्ण किल्ल्याची भ्रमंती सुरू होती.

वेळ कमी होता घरी लवकर येतो सांगून निघालेलो आम्ही पुन्हा येऊ हे सांगूनच इथून रस्ता गाठला. इतक्या वर्षांच्या किल्ले भटकंतीमध्ये हा किल्ला कसा निसटला हा विचार सतत मनात येत होता. कदाचित पुढल्या वर्षातच किल्ल्याचा कायापालट होईल. मग भिंतीवर चढलेल्या सिमेंटच्या पुटांमधूनहा किल्ला आपल्याल्या सोबत कितपत सवांद साधेल माहित नाही. त्यामुळे वेळ दवडू नका एखाद्या सकाळी घोडबंदर किल्ल्याला नक्की भेट द्या.

लेख आवडल्यास शेयर नक्की करा आणि हो अशाच भटक्या दिवाच्या भन्नाट गोष्टी वाचण्यासाठी माझा ब्लॉग सबस्क्राईब करायला विसरू नका.