रामटेक | नगरधन | अंबाला तलाव | खिमजी तलाव | ड्रॅगन पॅलेस
डहाणूला काय एकटा फिरून आलो… एकट्याने फिरण्याची झिंग चढली. आपण एकट्याने निघावे तिथलाच एखादा सोबती घ्यावा आणि मनमुराद भटकंती करावि या उद्देशाने नागपूरचे तिकीट काढले. नागपूरला याआधी खूपदा जाणे झाले होते ते ताडोबाला आपल्या वाघोबाला भेटायला! नागपूर स्टेशन आणि आजूबाजूचा भाग सोडला तर कायम नुसती धावती भेटच… असो यावेळी रामटेक आणि नागरधन किल्ले बघायचेच या उद्देशाने नागपूर गाठले.
एकट्याने जाण्याचा जोश इतका होता की B8 च्या डब्या ऐवजी B6 मध्ये जाऊन बसलो. तासाभराने टीसी आला आणि लक्षात आले आपण माती खाल्ली आहे. मग सरळ योग्य डबा गाठला. आणि कानात गाण्याचे सूर छेडत आडवा झालो तर काही वेळात ऐरटेल ने मान टाकली आणि मी सुद्धा…

पहिला दिवस
सकाळचे सात वाजले आणि दरमजल करत दुरंतो एक्सप्रेस नागपुरात दाखल झाली. स्टेशन बाहेर आलो आणि तर्री पोह्याने पोटाला गुड मॉर्निंग केले. याआधी चार पाच वेळा नागपुरात येणे झाले पण आमटेंचे आश्रम आणि वाघोबाची ताडोबातली भेट वगळता फार काही नागपूर फिरण्याचा योग जुळून आला नाही.
एखाद्या शहराचा इतिहास जाणून घेऊन मग ते शहर पाहिले की खऱ्या अर्थाने जाणून घेता येते अर्थात हा इतिहास जाणून घेताना तिथले, किल्ले भटकणे ही गरजेचे. नागपुरात रामटेक, नगरधाम, भिवागड, सीताबर्डी सारखे मोजकेच किल्ले. त्यातील सीताबर्डी स्टेशनच्याजवळ जरी असला तरी वर्षातून तीन वेळा लोकांसाठी खुला असतो त्यामुळे तो बघणे शक्य नव्हते. मग किमान उरलेले तीन किल्ले तरी पाहावेत असे ठरवले. मग नागपूरहुन थेट कामठी गाठले. अंध क्रिकेटसाठी काम करताना भेटलेला अक्षय चौधरीला गाठले. मी येणार असल्याचे त्याला आधीच सांगितले असल्याने तो खुश होऊन माझीच वाट बघत होता…
नागपूर ते कामठी हा साधारण पंधरा किलोमीटरचा प्रवास रिक्षाने केला. हे सांगण्याचे करण म्हणजे इथल्या रिक्षा नऊ आसनी आहेत. फोटो मधून लक्षात येईलच.

अक्षयच्या आईने थेट आग्रहाने जेवणाच्या पानावरच बसवले आणि या भावाने बाईकची किल्ली हातात दिली. अजून काय हवे माझ्या सारख्या भटक्याला…
दुचाकीवर स्वार झालो आणि नागपुर ते जबलपूर मार्ग क्रमांक ७ वरील मनसर गाठले. या गावच्या पश्चिमेला रामटेककडे किंवा तुमसर जिल्हा भंडाराकडे रस्ता वळतो. याचा रस्ताने रामटेक गाठल्यावर पाच सहा किलोमीटरवर नगरधन हे गाव लागते. गावच्या वेशीवर हा किल्ला आहे. किल्याचे रूप पाहतच क्षणी मोहिनी घालते. एखाद्या चित्रपटाचा सेट उभारावा तसे. किल्ल्याने पुरातत्व खात्याचा मदतीने कात टाकली आहे. लालसर रंगाच्या चिऱ्यामुळे याचे सौंदर्य अधिकच खुलून गेले आहे.

किल्ल्याचा संदर्भ इसवी सन ४थ्या शतकाशी जोडला आहे . नंदिवर्धन असे वाकाटक काळातील मूळ नाव याचा पुढे अपभ्रंश होऊन नगरधन नाव झाल्याचे पुरावे सापडतात. गावाच्या पश्चिमेला किल्ल्याचे प्रवेशद्वार येणाऱ्यांचे स्वागत करतो. मध्यभागी गणेशाचे शिल्प, दोन्ही बाजूला यादवकालीन उमलती कमळांची शिल्पे, डाव्या बाजूला द्वारपाल, आतल्या बाजूस आयताकृती कष सारे किल्याची मापने मांडून गोंड राजाची व्याप्ती नमूद करतात. दाराच्या दोन्ही बाजूला द्वारपाल कोरले असून त्याचा खांद्यावर कबुतर आहेत. पूर्वी निरोपासाठी त्यांचा वापर होत असे त्याची निशाणी म्हणे.

दाराच्या आत पहारेकऱ्यांच्या देवड्या आहेत. इथे पूर्वी फार चौकशी होत असावी आता मात्र कुणीच नव्हते.

आत गेल्यावर तटबंदीवर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. पायऱ्या चढून गेल्यास संपूर्ण तटबंदीवर फिरता येते.
गोंड राजाच्या किल्यावर भोसल्यांनी केलेली डागडुजी विटांच्या बांधकामावरून लक्षात येते. किल्ल्याचे सारे रूप त्याच्या तटबंदीत दडले आहे. सहा ते आठ मीटर उंचीचे प्रवेशव्दार, चौकोनी, गोल, अष्टकोनी बुरुज लक्ष वेधून घेतात. किल्ला अगदी प्रशस्त आणि मजबूत बांधणीचा हे पाहातच क्षणी लक्षात येते. मोजेकच घोडेस्वार आणि सैनिक इथे राहत असावं असा एकंदरीत अंदाज बांधता येतो. किल्ल्यावर महाल जरी आज नसले तरी त्याचे दरवाजे आज इतिहासाची साक्ष देत भक्कमपणे उभे आहेत.

किल्ल्यामध्ये तीन मजले खोल विहीर आहे. आता कमानी युक्त खोल्या दिसल्या मात्र तिथपर्यंत जाता नाही आहे. आज त्या कडीकुलूपात बंद आहे. उत्सवाच्या वेळीहे मंदिर खुले केले जाते,असे स्थानिकांनी सांगितले.

नव्याने उत्खनन झालेल्या गोष्टी आणि विभागाच्या कामाच्या मांडणीचा सारा लेखाजोखा इथे छोट्याशा चित्रांच्या प्रदर्शनातून मांडला आहे.

जुन्या आणि नव्याचा संगम असलेला हा किल्ला पाहून मोर्चा रामटेक किल्ल्याकडे वळवला.
रामटेक हे नागपूरच्या ईशान्येस सुमारे ५४ किलोमीटर अंतरावर आहे. मुळात याला किल्ला म्हणावं का हाच प्रश्न. कारण सध्या या किल्ल्याचे मंदिरात रूपांतर झाले आहे. अगदी पहिल्याच नजरेत दूर डोंगरावर मंदिराचे कळस लक्ष वेधून घेतात.

मग नव्या कोऱ्या सिमेंटच्या निमुळत्या रस्त्यावरून गाडी दामटत पायथ्याला पोहोचतो. पण इथे मला रोखले ते सिंदूर बावडी नामक तळ्याने.

वास्तू शिल्पाचा उत्तम नमुना असलेलं हे तळे मात्र मंदिरच्या श्रद्धेपुढे कोमेजून गेलेले दिसते. आजूबाजूला असलेली झाडी, तळ्यातील पाण्याची अवस्था तिथल्या एकूणच दुरावस्थेकडे लक्ष वेधून घेत होती.
राम वनवासात असताना या ठिकाणी काही काळ वास्तव्यास होते. त्यामुळे या ठिकाणाला रामटेक हे नाव ठेवले गेले. इ.स.२५० मध्ये रामटेकचा परिसर मौर्य शासकांच्या अधिपत्याखाली होता.सातवाहनांच्या कालात प्रवरपूर (सध्याचे मनसर) हे एक महत्त्वाचे ठिकाण होते. इ.स. ३५० मध्ये त्यांचा पडाव करून वाकाटकांनी सत्ता काबीज केली. त्याच काळात कालिदास झाले असा समज आहे. संस्कृत काव्यातील एक अभिजात कलाकृती म्हणजे ‘मेघदूत’. कविकुलगुरू कालिदासाने हे काव्य याच रामटेक परिसरात लिहिले आहे. सन १९७०-१९७१ मध्ये, रामटेक गडमंदिर परिसरात, महाराष्ट्र शासनाने ‘कालिदास स्मारकाची’ निर्मिती केली. आज या कालिदासांच्या नावाने येथे संस्कृत विद्यापीठ सुरू आहे.या ठिकाणी दरवर्षी ‘कालिदास महोत्सव’ साजरा होत असतो. मला मात्र स्मारकापेक्षा बागच जास्त छान वाटली.

हे सगळे मनात आणि कॅमेरात साठवून रामेटेक किल्ला किंवा स्थानिक भाषेत गडमंदिरकडे मोर्चा वळवला.

दोन्ही बाजूला हारफुलांची दुकाने अगदी मंदिराला साजेशा अशा थाटात स्वागताला उभी होती. सोबत चिप्स, फ्रुटीमुळे माकडांचा सुळसुळाट आहेच. नागपूरचा रघूजी पहिला याच्या हातून देवळाच्या बाहेरच्या मजबूत तटबंदीचे काम झाले असे म्हटले जाते.

मुख्य दरवाजा म्हणजे वराह दरवाजा. कारण लगेच आत वराह या विष्णूच्या अवताराची मोठी मूर्ती आहे. इतकी मोठी वराहाची मूर्ती मी पहिल्यांदाच पाहत होतो.
त्यापलीकडे आणखी तीन दरवाजे आहेत. सिंधपूर दरवाजा या रेषेतील दुसरा दरवाजातून आतल्या तटबंदीत प्रवेश केला तर भैरव दरवाजातून आतल्या आणि शेवटच्या तटबंदीत प्रवेश केला.

आत राजा दशरथ व वसिष्ठ मुनी यांची देवळे आहेत. लक्ष्मणाचे मंदिर समोरच आहे व त्यामागे राम व सीतेचे मोठे देऊळ उभे दिसते. मुख्य वास्तूच्या सभोवार इतर अनेक देवतांची मंदिरे आहेत.

नागपूरची खास वास्तुशैली रामटेकलाही दिसून येते. उत्तर व पूर्वेकडील भिंती, शिखरे, उपशिखरे, कलश व खांबाच्या बांधणीचे बारकावे या वास्तुत रममाण करतात. छोट्या छत्र्या, उलट्या कमलकळीची नक्षी, जाळीदार खिडक्या, सज्जे व उथळ देवळ्या यांमुळे देवळावर उजेड व सावल्यांचा नयनमनोहर खेळ दिसतो.

मध्यमयुगीन ब्राह्मणी प्रकारचे वास्तुशिल्प येथे दिसते. गोकुळ दरवाजा व लक्ष्मण मंदिरावरील कोरीवकाम खास उल्लेखनीय आहे. प्रभू श्रीरामांचे सुमारे ६०० वर्षे जुने मंदिर आहे. येथून आजूबाजूच्या परिसराचे अतिशय विहंगम दृश्य दिसते.

हे पाहून प्रसिद्ध खिमजी तलावाकडे मोर्चा वळवला. पण रस्ताच्या बाजूला मोठे तलाव आणि त्याचा घाटावर मंदिराची शृंखला दिसली. सुरुवातीला हाच तर तो खिमजी तलाव की काय म्हणून गाडी वळवली. पण नाव होते अंबाला तलाव. मंदिर पहात यावेत म्हणून मोठ्या कमानी मधून आत शिरलो.

मग उपरती झाली हे तर प्रति त्रंबकेश्वर… पिंडदान आणि सो कॉल पूजेचे माहेरघर. आजूबाजुची घर म्हणजे या विधीसाठी आलेल्या लोकांची पिढ्यान पिढ्या सेवा करणाऱ्या लोकांची हॉटेलच.
जास्त काळ तिकडे न दवडता मी काढता पाय घेतला आणि खिमजी तलाव गाठले. बोटिंग आणि जोडगोळीने येण्यासाठी नागपूरकरांची पसंतीची जागा.

परतीच्या प्रवासात कामठी जवळ ड्रॅगन पॅलेस म्हणून इंडो-जपान मिळून एक बौद्ध मंदिर बांधल्याचे वाचले होते. खूप आधी रोषणाईचे फोटो पाहिले होते.

तशीही आता संध्याकाळ होईल आणि मला ही पाहता येईल म्हणून आत शिरलो पण डागडुजीचे काम सुरू असल्यामुळे माझा हिरमोड झाला. आणि आजचा मुक्काम गाठला.
(क्रमशः)…
khoop chhan varnan. muddesood. gharbasalya Nagpurchi safar zali.
सुंदर लिखाण.. वर्णन अप्रतिम केले आहे…
भटक्याला असे मोकळे रान मिळाले की जो आनंद मिळतो तो आनंद ह्या ब्लॉग मध्ये सतत जाणवतो. सादरीकरण पण उत्तम आहे. पुढील लिखाणासाठी शुभेच्छा 💐