मला भटकायला आवडते त्याचे पाहिले कारण म्हणजे नक्कीच डोंगर, दऱ्या,किल्ले हे तर आहेच  शिवाय तिथं जाताना होणार प्रवास आणि तिथं गेल्या नंतर भेटणारी विविध प्रकारची, नाना स्वभावाची माणसं… हे देखील त्यामागचं सुप्त आकर्षण असतं.

दोन वर्षांपूर्वी  स्टोक कांगरी Stok Kangri मोहिमच्या वेळी अशाच एका अवलियाची भेट झाली. या अवलियाचं नाव होतं “युथाई”. हा युथाई मूळचा जपानचा Japan . परंतु डोंगर भटकंतीची आवड त्यालाही असल्यामुळे हिमालयात फिरण्याचं वेड त्यालाही होतंच… जपानी लोकांची उंची लहान असली तरी कीर्ती महान असते पण हा याला अपवाद. युथाई हा ताडामाडासारखा उंच आणि आगाखांद्याने मजबूत. त्याच्याशी जेंव्हा बोलणं झालं तेंव्हा त्यालाही रॉक क्लायंबिंगची आवड असल्याचं समजलं. मग त्याच आणि माझं  सुत जुळलायला काही वेळ लागला नाही. अगदी पाहिल्याचे भेटीत गप्पा मस्तच रंगल्या जणू काही आम्ही जुने मित्रचं… आणि मग पाहता पाहता थेट रुममध्ये  बचाव तंत्र आणि रॉक क्लायंबिंगच्या दोरीचे सेटअप लावले गेले आणि आमचा सराव ही सुरू झाला… या काळात त्याच्याकडून खूप काही शिकत आलं. त्याचा नम्रपणा, वयाने ,हुद्याने, अनुभवाने आणि ज्ञानाने सुद्धा तो खूप मोठा पण मोहिमे दरम्यान अगदी मित्र म्हणून वावरला. इतकेच काय तर मोहिमेच्या शेवटी पार्टीला 🍻 गडी इतका रंगला की सकाळी चार वाजेपर्यंत गप्पांचा फड रंगला होता…

या प्रवासात त्याला आम्ही लावणी गाऊन हसवले तर त्यानेही आमच्यासाठी जपानी गाणी गायली. कळले तर त्याला ही नाही आणि मलाही नाही पण आनंद मात्र दोघांनी घेतला. 

प्रवासात जात, धर्म, प्रांत, देश या पलीकडे जाऊन आयुष्य जगण्याची प्रेरणा मिळते म्हणून भटका दिवा सतत भटकत असतो. 😊