नुकत्याच पालघर इथं झालेल्या अमानवीय अशा हत्याकांडाचे पडसाद सर्व देशात उमटले आहेत. चोर आल्याच्या अफवेने किती भयाण परिस्थिती उद्भवू शकते याची जाणीव या घटनेतून आपल्या सर्वानाच झाली…काही वर्षांपूर्वी म्हणजे नेमकं सांगायचं तर २०१२ साली आमच्यावरही असाच काहीसा बाक प्रसंग ओढवला होता…

त्याचं झालं असं की…

ऐन गणपतीचे दिवस होतो. छान पाऊस पडत असल्यानं निसर्गानं हिरवा शालू ल्याला होता… मधेच एखादी पावसाची सर बरसत होती. अशा वातावरणात ट्रेकला जायलाच हवे या विचारान सगळ्यांना फोन केले परंतु गणपती असल्यानं सणासुदीला कुणी ट्रेकला यायला फारसं तयार नव्हतं… मग नेहमीचे हक्काचे असलेल्या निरंजन, ललित, लक्ष्मण यांना विचारल्यावर ते लगेचच तय्यार झाले…जाण्याचे ठिकाण पालघर जवळील अशेरी गड असल्याने विसर्जनाच्या आदल्या दिवशी रात्री गाडी घेऊन निघू म्हणजे सकाळी लवकर गड बघून विसर्जनाला घरी येता येईल असा आमचा प्लॅन होता. त्या बोलीवर हे सगळे आले होते… हे सर्वजण मध्य रेल्वेचे चाहते असल्यानं पालघरचा  अशेरीगड हा त्यांच्या दृष्टीने जरा लांबचाच होता.

रात्री थोडे लवकर निघू असे म्हणत निघायला दहा वाजले. लवकर निघण्याच्या नादात बाहेर जेवायचे ठरले त्यामुळे निघाल्यापासूनच पोटात कावळे ओरडत होते. मुंबईमध्ये नको हायवेवर धाब्यावर खाऊ या विचाराने विरारपर्यंत गाडी रेटली. अखेर अहमदाबाद हायवे असणाऱ्या किनार हॉटेलात आम्ही घुसलो. २ भात आणि २ पाणी पाण्याच्या बाटल्याचे बील आमच्या पूर्ण ट्रेकच्या खर्चापेक्षा जास्त होते.   (त्यामुळे नंतरच्या काळात जिथे मोठे ट्रक असतात तिकडेच जेवायचे हा मापदंडच ठरला.)

आता आमचा पुढचा टप्पा होता खोडकोना गाव. म्हणजे आशेरी गडाच्या पायथ्याचे गाव.  पालघर जिल्हा आकाराने फार मोठा आहे. या जिल्ह्याला जसा आदिवासी कला संस्कृतीचा वारसा लाभला आहे तसंच जिल्ह्यातील काही भाग अजूनही अतिशय दुर्गम असून तिथले लोकं मुलभूत सुविधांपासून आजही वंचित आहे. त्यामुळे शिक्षण कमी आणि अंधश्रद्धेच्या विळख्यात ते अडकले आहेत. खोडकोना गावही त्याला अपवाद नव्हते. हे गाव म्हणण्यापेक्षा पाडा म्हणणं योग्य ठरावं. रस्त्याच्या आजूबाजूला माहितीचे कोणतेही फलकही दिसणार नाही आणि जर असला तर तो वाचता येणार नाही हे नक्की. त्यामुळे सगळं भरवसा गुगलच्या मॅपवरच… परंतु नेटवर्कमधेच जात असल्यानं पेट्रोल पंप, हॉटेलमध्ये विचाराव लागतं होतं पण त्याचा ही काहीच उपयोग होत नव्हता. कारण असं गाव इथं आसपास आहे हे लोकांना माहिती नव्हतं… अखेर एका ठिकाणी  हायवेवर थांबून नेटवर्क मिळते का ते पाहत होतो  तितक्यात पोलिसांच्या दोन गाड्या आमचा बाजूने अशा पद्धतीनं येऊन उभ्या राहिल्या की जणू काही आम्ही दरोडखोर आहोत.  अत्यंत उर्मटपणे कुठे जाणार. रात्री का इथे थांबलात अशी प्रश्नांची सरबत्ती सुरू केली… ती सरबत्ती ऐकून आता आपली वरात गडाऐवजी पोलिस स्टेशनला जाते की काय असं वाटू लागलं.

आम्ही सर्वजण ट्रेकला जात आहोत खोडकोना गाव शोधत आहोत हे सांगितलं पण पोलिस ऎकायला तयार नव्हते. दरम्यानच्या काळात गाडीची झडती घेऊन झाली, कागदपत्रही तपासून झाली,  आमची ओळख परेड झाली. कौटुंबिक विचारपूस झाली. हे सगळे  सोपस्कार झाल्यानंतर आम्ही खरोखरंच गिर्यारोहक असल्याची खात्री पटली. मग हसूनच नरमाईने ते सांगू लागले की, खूप दिवस या भागात  चोरांची टोळी कार्यरत आहे. असेच गाडी घेऊन येतात आणि सगळे गाव लुटून जातात. त्यामुळे या भागात आम्ही गस्त वाढवली आहे. जाताना मात्र समज देऊन गेले इतक्या रात्री गावात जाऊ नका आम्ही विचारपूस करून सोडून दिले पण गावातले लोकं तुम्हांला चोर समजून जीवपण घेतील…

यातून आमची सुटका तर झाली पण आता कुठे जायचे याचा सगळेच विचार करू लागलो आणि तितक्यातच मोबाईलने खोड्कोनाचा रस्ता दाखवला. जे होईल ते पाहून घेऊन या विचाराने आम्ही खोडकोना गावाकडे मोर्चा वळवला. रात्री थेट गावात न घुसता नदीच्या बाजूला गाडी लै आणि तिथेच पथारी पसरली.

 पोलिसाची सूचना कानांत सतत ऐकू येत असल्यानं झोप येणं शक्यच नव्हतं. रात्रभर डोळ्यासमोर मशाली घेऊ फिरणारे गावातले लोकच दिसत होते.  कधी नव्हे ते आम्ही सूर्योदय होण्याची वाट बघत होतो… एकदाचे सूर्यनारायण उगवले आणि आम्ही गावात गेलो…

तिथं जाऊन जर ओळख काढून आमच्या येण्याचा हेतू सांगितला. मग अवांतर गप्पा मारत असताना गावकऱ्यांच्या बोलण्यातून चोरांची दहशत सतत जाणवत होती. रात्रीचा प्रसंग त्यांना सांगितला असता एक काका  म्हणाले, ” बर झाले तुम्ही रात्री गावात शिरला नाहीते पोरानो!!! कारण पहारा देणारे तुम्हा काय समजले असते याचा काही नेम नाही. कारण गावात खरच रात्र भर जागता पहारा होता.”

कालची पालघरची बातमी वाचली आणि हा प्रसंग लख्ख आठवला… ट्रेक आणि प्रस्तरोहण मोहिमा करताना अनेकदा रात्री निघायला उशीर होतो.. त्यामुळे अगदी बेरात्री अनेकदा गावात जातो…पण तिथे येणार असल्याचे संबंधित व्यक्तीला सांगितलं असल्यानं कधी अडचण वाटत नाही. पण नवीन ठिकाणी, नवीन गावांत जाताना योग्य ती खबरदारी प्रत्येकाने घ्यायला हवी हे या घटनेवरून पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे…

यावर तुम्हांला काय वाटतं, तुमचा एखादा असा अनुभव आहे का… तर तो नक्की सांगा… जेणे करून याचा फायदा सर्वांनाच होईल ना…

(सदर ब्लॉग सामना दैनिकात प्रकाशीत झाला आहे)