मोरोशीच भैरवगड म्हणजे निसर्गाच्या आगळ्यावेगळ्या कलाकृतीपैकी एक. अनेक शतकांपूर्वी उफाळून आलेल्या ज्वालामुखीच्या उद्रेकातून तयार झालेल्या डाईक रचनेची ही कमाल. अवकाशाला भेदणारी ३०० फुटी उभी कातळ भिंतीला माळशेज घाटाच्या आधी प्रवास करताना पाहणे म्हणजे एक सुखद आनंद असतो. प्रत्येक वळणावर भैरवगडाचे वेगवेगळे रूप बघायला मिळते… कधी लांबून एक सुळका भासावा तर कधी साबणाच्या वडीच्या आकाराची भिंत दिसावी. परंतु याच कातळातच्या पोटात पायऱ्या आणि पाण्याची टाके कोरून हा गड नावारूपाला आला आहे.

अशा या भैरवगडावर जाण्याचा मानस व्यक्त झाला आणि ‘बाण हायकर्स’चे तब्बल वीस शिलेदारांनी या मोहिमेत सहभागी झाले. यावेळी मोहिमेत प्रस्तरारोहणासोबतच रॅपलिंग देखील करावे लागणार होते. त्यामुळे सांघिक जबाबदारी जास्त होती. रात्री निघून भैरवगडाच्या पायथ्याला असलेल्या पठारावर पोहोचायचे आणि सकाळी लवकर भैरवगडावर चढाई सुरू करायचे असे ठरले. त्याप्रमाणे सगळे कल्याण एसटी स्थानकात दाखल झाले. आज पाठीवर दोर आणि इतर चढाईची सामुग्री अधिक होती. त्यामुळे पाठीवरची भरलेली सॅक डोक्यावरून आमच्यावर देखरेख करत होती…

माळशेजकडे जाणारी एसटी पकडली आणि मोरोशीमध्ये दाखल झालो. एरवी या रस्ताला वेगवान गाड्या सोडल्या तर चिटपाखरूही नसते. परंतु काही दिवसांपूर्वी माळशेजमध्ये झालेल्या लुटमारीच्या प्रकारांमुळे मोरोशी येथे कायमस्वरूपी पोलीस चौकी लावण्यात आली आहे. त्यामुळे सगळेच आलबेल होते. आम्ही तिथे गेल्यावर पोलिसांनी कुठून आलात? कुटे जाणार? अशी विचारपूस केली. त्यांना आमच्या येण्याचे कारण सांगितल्यावर “ सावकाश जा रे पोरानो” म्हणून आपुलकीही दाखवली… त्यानंतर आम्ही रस्ता सोडून जंगलाकडे वळलो.  भैरवगडाच्या पायथ्याला पोहोचण्यासाठी दोन तासांची चढाई करावी लागणार होती ती देखील किर्रSSS अशा काळोखात. प्रत्येक पाऊल चाचपून टाकावे लागणार होते, कारण रात्रीच्या वेळी साप आणि इतर जनावरे आक्रमक असतात. वाटेत असलेल्या आजूबाजूंच्या झाडांत एखादा साप असू शकतो आणि वाटेवर विंचू ठाण मांडून असणार याची शाश्वती असल्याने जपून पावले टाकावी लागत होती. या मोहिमेत ही आघाडी लक्ष्मणने सांभाळली होती. पठारावर पोहोचेपर्यंत एक साप आणि दोन विंचू त्याने बाजूला सारले होते.

रात्री दोनच्या सुमारास गडाच्या पायथ्याच्या कातळी पठारावर आम्ही दाखल झालो. आत्ता कोणाला उसंत नव्हती जिथे थोडी सपाट जागा मिळाली तिकडे आम्ही पथारी पसरली आणि निद्रेच्या आधीन झालो.

सकाळी उठून नाश्ता बनवण्यासाठी मांडणी सुरू झाली. पाण्यासाठी एक टीम गेली आणि बाकीच्यांनी कांदेपोहे बनवायला सुरुवात केली.

भरपेट नाश्ता झाला आणि आम्ही काही लोक पुढे दोर बांधायला निघालो. बाकीच्यांनी मागेचे सगळे आवरून तिथे पोहोचायचे असे ठरले. किल्याचा डाव्या बाजुच्या भिंतीवर पायऱ्यांची माळच आहे. पण त्यातील काही पाय-या सुरुंग लाऊन फोडल्यामुळे प्रस्तरारोहणाशिवाय तिथे पर्याय नाही. एक पुण्याचा संस्थेने कायम स्वरूपी खिळे लावल्याने चढाई थोडी सुरक्षित झाली आहे. सुरक्षित जरी असली तरी सोप्पी नक्कीच नाही. म्हणून चढाईची खरा थरार कायम टिकून आहे. दोर बांधला गेला आणि एका मागून एक सगळे वर यायला सुरवात झाली.

एका वेळी एकच वक्ती पायरीवर उभी राहू शकतो इतकीच जागा आहे. कारण एका बाजूला काळात भिंत तर दुसरीकडे एखादी चूक झालीच तर आ वाजून उभी असणारी खोल दरी.

त्यातही एकमेकांना आधार देत सगळे किल्ल्याच्या माथ्यावर दाखल झाले. वरून दिसणारे ३६० अंशाचे दृश्य मन थक्क करून टाकते.

रस्त्यावरच्या गाड्या ठिपक्याप्रमाणे भासू लागतात. माथ्यावर बघण्यासारखे काहीच नसल्याने तिथे जास्त वेळ न दवडता आम्ही परतीचा वाटेवर निघालो. पण खाली उतरणे सोपे नव्हते. कारण यावेळी रॅपलिंग पद्धतीचा अवलंब करावा लागणर होता. दोराच्या मदतीने एक एक जण खाली उतरत होता आणि खाली उतरल्यावर सुटकेचा श्वास घेत होता.

पण खाली आल्यावर जेव्हा वळून भैरवगडाकडे नजर फिरवली त्यावेळी आपण आज हे सर केले याची चमक प्रत्येकाच्या डोळ्यांत होती. आणि संध्याकाळच्या लालसर आसमंतात न्हावून निघालेला भैरवगड आपली एक वेगळीच छाप मनात सोडून गेला होता. 

(सदर ब्लॉग सामना दैनिकात प्रकाशित झाला आहे)