पालघर बोईसर मार्गावर जास्त काही फिरणे होत नाही. कारण ग्रुमधले बरेच जण मध्य रेल्वेवर राहत असल्यानं इकडच्या भागांतच बरीच भटकंती झाली होती. मात्र पालघरच्या बाजूचे किल्ले बघणं फारसं होत नव्हतं. अगदीच नाही म्हणायला अशेरी, आसावा या किल्ल्यांची भटकंती झाली होती. परंतु त्यानंतर जाणं झालं नाही. त्यामुळे गंभीरगडाचा विषय निघाल्यावर तिथं जायचं असं ठरवलं. या किल्ल्याचं नावचं त्याचं रूप सांगून जातो. याची प्रचिती किल्ल्यावर, जाऊन आल्यावर आली.

गडावर जायचं ठरल्यानंतर त्याचं प्लॅनिंग सुरू झालं. दादर मध्यवर्ती ठिकाण असल्यानं पहाटे सर्वजण माझ्या घरी आले. दादरहून पालघरला जाणारी मेमू ट्रेन पकडली आणि आम्ही सर्वजण डहाणूमध्ये डेरेदाखल झालो. तिथून मग टमटमचा प्रवास करत कासा – सायवन – असलोन आणि मगपाटीलवाडी पर्यंतचा प्रवास तुकड्यांतच झाला.

त्यातले कासा हे बाजारपेठेचे ठिकाण होते. आम्ही गेलो तो दिवस रविवार होता. रविवारी तिकडे बाजार भरत असल्यानं एरवी शांत असणारे हे गाव आज मात्र गजबजले होते. असलोन ते पाटीलवाडी प्रवास तर गंमतीदार झाला. एका छोट्या रिक्षात आम्ही सातजण कोंबून बसलो होतो. शहरांत राहणा-या आमच्यासाठी हे नवीनच होतं. परंतु तिथल्या लोकांना हे अगदीच सवयीचं होतं. दूरवर वसलेल्या आदिवासी पाड्यांवर जाण्यासाठी वाहतुकीची साधने बेताची होती. त्यामुळे आम्ही ज्या रिक्षानं गेले त्या रिक्षावाल्याला संध्याकाळी घ्यायला येशील ना असं विचारलं असता, ‘पाचच्या आत आलात तर ठीक.  नाही तर रस्त्यावर तुम्हांला चिटपाखरू देखील मिळणार नाही,’ असे ठणकावले. त्यावेळी आपण स्वतःची गाडी घेऊन यायला हवे होते याची प्रकर्षानं जाणीव झाली. गड्याच्या पायथ्याशी पोहोचायला सकाळचे ११ वाजले होते.

समोरच गंभीरगडाचे सुळके मान काढून उभे होते. वाटेत एकही झाड नाही आणि सरळ नाकासमोर जाणारी वाट त्यात डोक्यावर आलेला सूर्य आमची चांगलीच परीक्षा घेणार होता. वाटेत कुठेच पाणी नाही त्यामुळे सोबत आणलेल्या काकडीचा आधार घेत आणि पाणी वाचवत चढाई सुरू होती. काही अंतर  चालले की परत विश्रांतीसाठी थांबत मजल दरमजल करत आम्ही चढाई करत होतो. समोर साधारण १०० फुटाच्या भिंती उभ्या होत्या. याच भिंतीमागे गड दडून बसला आहे. प्रस्तारोहणाची आवड असणाऱ्यांना गंभीरगड नक्कीच आव्हान देणारा आहे.


गडावर आल्यानंतर तिथल्या भिंती मागे एक छोटे उघड्यावर देऊळ आहे. या किल्ल्याचा विक्षिप्तपणा दिसून येतो तो त्याच्या मांडणीतून. गडावर मंदिर एका बाजूला , गडाची डोलकाठी एकीकडे आणि पाण्याचे टाके भलतीकडे. त्यात पाण्याचा टाक्यावर साधारण २५-३० मधमाशाची मोठ्ठाली पोळी होती. गडावर एक भयाण शांतता होती. मधूनच येणार माकडांचा आवाज हि शांतता भेदून जात होता. एखाद्या किल्ला सर केले केल्यावर नेहमी वाटणारी प्रसन्नतेच्या भावनेची जागा भयाण शांततेने घेतली होती. परिस्थितीत बदलेली जाणवत होती त्यामुळे लवकरात लवकर किल्ला पहावा आणि इथून निघून जावे असे सारखे मनात येत होतं. मधमाशामुळे थोडे बिचकतच पाणी भरून मंदिराकडे येऊन पोटाची खळगी भरली. पोटात भुकेने कावळे ओरडत होते.

जेवण झाल्यानंतर राहिलेला किल्ला बघितला आणि वेळ न घालवता परतीच्या मार्गाला लागलो. गड उतरताना मातीचा निसरडेपणा जास्त जाणवत होता. त्यामुळे स्वतःला कसे बसे सांभाळत आम्ही मुख्य मार्गाला आलो.

खरं तर घड्याळात पाच वाजायला अजून दहा मिनिटे बाकी होती. पण तरीही वाहनांचा पत्ता नव्हता.  वाहनाची वाट पाहत आम्ही सर्वांनी रस्त्यावरच ठाण मांडून बसलो होतो. रस्त्यावर चिटपाखरूही नव्हते. ब-याचवेळानं एक रिक्षावाला आला. त्याला खूप विनवणी केल्यानंतर असलोनपर्यंत सोडले. तिथूनही डहाणू स्टेशन खूप लांब होते. परंतु आम्ही वाहने शोधत होतो परंतु सगळीकडून एकच उत्तर मिळत होतं ते म्हणजे आत्ता तुम्हांला कोणतेच वाहन मिळणार नाही. आमच्या सुदैवानं गावात किराणा माल पोहोचवायला आलेले मोठा ट्रक डहाणूला निघाला होता. एरवी आमच्यासाठी ट्रकमधून ट्रेकला जाणं काही नवीन नव्हतं.परंतु या रिकाम्या ट्रकमधून केलेल्या अर्ध्या तासाच्या प्रवासानं आमची हाडं अक्षरशः खिळखिळी झाली होती. ट्रकमधून उतरल्यानंतर उभं ही नीट राहता येत नव्हतं की बसता ही येत नव्हतं.

गंभीरगडाचे नाव का असे असावे या  प्रश्नांचे उत्तर तेव्हा आम्हांला मिळाले होते.  या गडाच्या नावा मागचा इतिहास जरी वेगळा असला तरी माझ्यासाठी या नावाचा उलगडा तिथल्या वातावरणानं आणि तिथं केलेल्या प्रवासामुळे झाला होता…

(सदर ब्लॉग सामना दैनिकात प्रकाशित झाला आहे)