Kaira pinnacle climbing

गोष्ट स्फूर्तीदायक प्रस्तारोहणाची !

२०१३ साली ‘बाण’ हायकर्सचे प्रस्तारोहण सुरू होऊन अवघे एक वर्षच झाले होते. सराव आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर नवनवीन मोहिमा डोक्यात येत होत्या. पहिल्या वर्षात लक्ष्मणची आणि माझी जोडी चांगलीच जमल्याने आमच्या दोघांचाही प्रस्तारोहण करण्याचा आत्मविश्वास बळावला होता. खूप मोठे नाही परंतु झेपतील अशाच सुळक्यांवर प्रस्तारोहणाच्या मोहिमा आखू या असे आम्ही ठरवले. आणि आम्हाला प्रतिक्षा होती ती पुढल्यावर्षी येणाऱ्या दसऱ्याची!!

नाशिक विभाग म्हणजे प्रस्तारोहाकांची पंढरीच. त्यात अंजनेरी किल्लाला खेटून उभे असणारे नवरा-नवरी आणि घोड्याचा कडा सुळके एकाच दिवशी सर केल्याने मारुतीरायाच पाठीशी उभा असल्याचा भास होत होता.  एकाच दिवसात तीन सुळके सर केल्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. एरवी पायथ्याला चूल मांडून खिचडीभात आणि सोबत आणलेले गुलाबजाम खाऊन आनंद साजरे करतो. परंतु आम्ही आज मात्र हॉटेलच्या शोधात निघालो कारण तीन सुळके आरोहणाचा थकवा आणि हा जल्लोष साजरा करण्याचा मूड वेगळाच होता. जेवण आटोपले आता पुढे काय करायचे हा प्रश्न होताच. कारण तीन सुळके दोन दिवसांत करू या विचारने आम्ही निघालो होते परंतु दोन दिवसांची आमची मोहिम एका दिवसात आटोपल्याने अजूनही एक दिवस आमच्याकडे होता.  अजून एखादा सुळका करावा का… असा मनात विचार आला यावर विश्राम आणि अक्षय होकार दर्शवला. परंतु लक्ष्मण हसतहसत मला म्हणाला, ‘’खरं सांग दिवा, हे सगळेच आधीच ठरवून आला होतास ना तू?’’ इतकी वर्ष सोबत असल्याने त्याने माझी नस ओळखली होती हे मात्र नक्की… आणि त्यानंतर आमची गाडी कैरा सुळक्याच्या पायथ्याला वळली.

एका आश्रमाच्या बाहेर आम्ही ताडपत्री पसरली. आज ना कोणाला तारे दिसत होते ना आकाशात उमटलेल्या छटा कारण सगळेचजण पडल्या पडल्या निद्रादेवीच्या आधीन झाले. विश्रामच्या डरकाळ्या तर गाडीतच सुरू झाल्या होत्या. सकाळी थोडे आरामात उठून सगळे आवरले. नऊच्या सुमार नाश्ता करून कैरा सुळक्याकडे निघालो खरे पण त्यातच एक मोठा घोळ झाला… आमच्या गाडीची चावी आतमध्येच राहिली आणि दरवाजे लॉक झाले होते. झाले इकडेच सगळे फसले की काय अशी  परिस्थिती निर्माण झाली. आता दरवाजा कसा उघडायचा हा यक्ष प्रश्न समोर होता. काहीच नाही तर काच फोडायची आणि दरवाजा उघडायचा हा शेवटचा पर्याय होताच.  त्यातच विश्रामने पट्टी घालून गाडीचा दरवाजा कसा उघडायचा याचा व्हिडीओ इंटरनेटवर पाहू लागला आणि तसे काही तरी करू असे ठरवले. गावातून लक्ष्मण एक पत्रा घेऊन आला त्याला पट्टीप्रमाणे कापले आणि दरवाजा उघडला. परंतु या सगळ्यात आमचा एक तास वाया गेला होता. त्यामुळे आज प्रस्तारोहण करताना  चांगलेच भाजून निघणार हे लक्षात आले होते. बरोबर बाराच्या ठोक्याला सुळक्याचा पायथ्याशी आम्ही आलो.

Rockclimbing preparation
मी आणि लक्ष्मण साधनांची तपासणी करताना

ठरल्याप्रमाणे मी प्रस्तारोहाणाला सुरवात केली माझी सुरक्षा दोरी यावेळी लक्ष्मणच्या हाती होती. विश्रामचे मार्गदर्शन सुरू होते. अत्यंत ठिसूळ दगड असल्याने प्रत्येक पाऊल हे जपून  टाकावे लागत होते. समोर येईल तो दगड हात थोपटून पहावा लागत होता.

Rockclimbing start by me
चढाईला सुरवात झाली

त्यात डोक्यावर सूर्य आग ओकत होता. दगड अगदी तव्याप्रमाणे गरम झाले होता. चटके बसत असल्याने हात लालबुंद झाले होते. पायातले घट्ट शूजमुळे आता पायदेखील दुखू लागले होते तरी मोहिम पूर्ण करायची ही जिद्द मनात कायम होती. पहिला टप्पा गाठण्यात यश आले तिकडे नव्याने मेख ठोकली आली लक्ष्मण आणि विश्राम तिथंपर्यंत आले.

Last patch of pinnacle climbing
पहिला टप्पा पार करून शेवटच्या टप्पाकडे वाटचाल

परत एकदा आरोहणाला सुरुवात झाली. अक्षय गावातून हे सगळे पाहत होता. त्याच्यासोबत बरीच गावातील मंडळी हे सगळे पाहण्यासाठी जमा झाली होती. दुसरा टप्पा तसा सोप्पा पण मातीच्या घासाऱ्याचा तो अगदी सहज पार झाला. आणि माथ्यावर पाऊल ठेवले. गावातून आमच्यासाठी वाजवलेल्या टाळ्या हेच आमच्यासाठी मोठे कौतुक होते.

अजून एक सुळका ‘बाण’च्या आरोहाकांनी सर केला होता. आजवर इतका आनंद कधीच झाला नसेल कारण एका दिवसात तीन सुळके आणि दोन दिवसांत चार सुळके सर झाले होते. या मोहिमेमुळे वर्षभरापूर्वी सुरू झालेल्या ‘बाण’चे प्रस्तरारोहण हुरूप वाढणारे ठरले. आणि आजही ती आठवण आमच्यासाठी स्फूर्तीदायक आहे.