सह्याद्रीतील भटकंतीचा पर्वणीचा हंगाम म्हणजे पावसाळा.  भटकंतीच्या प्रेमात आकंठ बुडालेलो आम्ही प्रत्येक शनिवार, रविवारी डोंगरदऱ्यामध्ये मनसोक्त भटकायचो. दिनांक २८ जुलै २०१३, रविवारी संस्थेचा ट्रेक ठरला होता. त्याला बगल देऊन दोन दिवसाची मोहीम आखणे शक्य नव्हते पण शनिवारचा दिवस मात्र वाया जाऊ नये म्हणून मी आणि लक्ष्मणने  मिळून आडवाटेवरच्या ताहुली किल्लावर आखली. 


ताहुलीला जाण्यासाठी दोन मार्ग एक म्हणजे अंबरनाथच्या काकुली तलावाच्या कडेने जाणार तर दुसरा कल्याण मलंगड रस्त्यावर येणाऱ्या कुशिवली मधून जाणारा… आम्ही कुशिवलीचा मार्ग निवडला कारण तो थोडा जवळचा. (कारण आजच्या ट्रेकमुळे उद्याचा संस्थेचा ट्रेक चुकवायचा नव्हता.) 


ताहुलीला किल्ला म्हणणे योग्य नाही ठरणार कारण किल्लेसदृश्य असे तिथे काही दिसले नाही.  वाटेत गाडगेबाबांचा मठ आणि दोन छोटे आश्रम लागले. डोंगरमाथ्यावर एक छोटी झोपडी, जवळच पाच पीर आणि ढगांशी लापछपी खेळणारे ‘दाऊद’ आणि ‘बामण’ नामक दोन सुळके. त्यामुळचे की काय डोंगर भटकेसुद्धा जास्त या आडवाटेला फिरकत नाहीत.


गावातून बैलगाडीच्या रस्त्याने आम्ही ताहुलीकडे कूच केले. सुरुवातीला सोप्पी वाटणारी वाट पुढे ढोरवाटेमध्ये हरवून गेली. धुके आणि पावसाचा खेळ सुरूच होता त्यामुळे डोंगरावरून अंदाज येत नव्हता. नकाशा आणि दिशा याचा ताळमेळ बसवत आम्ही डोंगरात वाट काढत पुढे चालत होतो.

ताहुली वरून दिसणारे मलंग गडाचे नेढे

मध्ये वाहणारे पाण्याचे झरे अचानक येणाऱ्या पावसाच्या जोराने रुद्र रूप धारण करत होत. दोन डोंगराच्या बेचक्यामधून आम्ही तब्बल तीन तासाच्या चढाईने ताहुलीच्या पठारावर पोहोचलो. आणि वरती  एक रुळलेलली वाट आम्हाला एका झोपडीपाशी घेऊन गेली.

झोपडीत एक बाबा बसले होते. पुढला रस्ता त्यांना विचारून वाट धरली. ढगांच्या आड दडलेले डोंगराचे सुळके मधूनच डोकावून आम्हाला पहात होते.

एका कड्यावर निसर्गाचा हा अदभुत चमत्कार पाहून आम्ही खिळून बसलो होतो. हवेच्या जोरामुळे जमिनीकडे झोकावणारे धबधब्याचे पाणी आकाशाकडे उडून एक उलटा धबधबा आम्ही पाहत होतो.

त्यावेळी हे सारे कॅमेरात कैद करून निघालो वाटते परत जाताना झोपडीतल्या बाबांना जवळचे दोन बिस्कीटचे पुडे दिले आणि त्यांनीही चहाचा आग्रह केला.

खरे सांगायचे तर पावसात भिजून ट्रेक केल्यावर असा चुलीवरचा चहाला कोण नाही म्हणणार. बाबांनी अगदी झाडपाला टाकून मस्त चहा दिला. आणि आम्हीही आवडीने तो घेतला. पण काही वेळातच लक्षात आले की चहामध्ये ‘काही तरी’होते. खूप नाही पण थोडी फार झिंग जाणवत होती.

तेव्हा चहामध्ये काही गौडबंगाल असल्याचे जाणवले.  गावात पोहोचल्यावर याबाबत बोलणे झाले तेव्हा कळले चहात गांजा बाबा सर्रास घालून पितात… म्हणे शिवशंभोचा आशीर्वाद !🙏