मनुष्य सतत आनंदाच्या शोधात भटकत असतो प्रत्येकाच्या आनंदाच्या व्याख्या वेगळ्या असू शकतात माझ्यासाठी भटकंती हीच सर्वस्वी आनंदाची गुरूकिल्ली आहे असेच म्हटलं पाहिजे…त्यामुळे जेव्हा केंव्हा  सवड मिळावी की मी भटकायला निघतो. निसर्गाच्या प्रेमात मी आकंठ बुडालेला असल्याने अर्थातच भटकंती देखील  निसर्गा जवळ घेऊन जाणाऱ्या ठिकाणांचीच असते….

आपल्या जाण्यामुळे चुकूनही डोंगरमाथ्यावरील गावागावात करोना रोग पसरू नये या विचाराने यावेळी डोंगर लांबून पाहावे लागत आहेत. खरं तर गावातून प्रेमानं बोलवणी येऊ लागलीत पण सध्या तरी संयम हाच महत्त्वाचा आहे. म्हणूनच  बाईक राईडचा प्लॅन आखला… तो  ही माळशेजचा!

पावसाळ्याच्या काळात माळशेजच्या घाटातील  सौंदर्य अप्रतिम असं असतं! याच वर्णन करायला शब्द ही अपुरे पडावे असं इथला नजरा असतो… म्हणून मग इथंच बाईक राईडचा प्लॅन विश्रामने  आखला मग हक्कचा गडी मी, अभी, संतोष तर होतोच पण या वेळी काही खास बाईक सुद्धा सोबतीला येणार होत्या. गेल्या राईडला ट्रामहची ७०० CC च्या बाईकसोबत येणाऱ्या कौस्तुभने सोबतीला आणखीन दोन गडी आणले होते. त्यात एक म्हणजे ट्रामह टायगर ही ऑफ रोड बायकिंगच्या प्रेमात असणाऱ्यांची ड्रीम बाईक. त्यामुळे या वेळी धम्माल येणार हे नक्की होते. कल्याण – शहाड-मुरबाड करत आम्ही माळशेज गाठले. माळशेजमध्ये मुख्य पॉईंट वर गर्दी होती म्हणून आम्ही त्याला बगल देत MTDC च्या मागच्या बाजूला जाऊन निसर्गाचा मनमुराद आनंद लुटला.

(फोटोसेशन तिथलेच बरं का!) 

मग येताना थोडी ऑफरोडच्या धमाल सोबत परतीचा प्रवास केला. एरव्ही सगळे काही नीट सुरू असताना विश्रामच्या बाईकच्या पंक्चरमुळे मात्र वेळेचं गणित पुरते बिघडले परंतु तरीही चहुबाजूला पसरलेला हिरवा गालिचा त्याच्यातून मार्ग काढत जाणारे वळणावळणाचे रस्ते. समोर उभ्या ठाकलेल्या सह्याद्रीच्या खडतर डोंगर रांगा… रस्त्याच्या एक बाजूला हजारो फूट खोल दऱ्या…जुन्या प्रस्तारोहण मोहिमच्या आठवणी जाग्या करणारे फंट्या आणि माळशेज लिंगी सुळके आज नव्याने अजिंक्य वाटले… तुम्हांला भेटायला पुन्हा येईन हे सांगूनच आलो आहे.

माळशेज जसा निसर्गाने समृद्ध आहे तसाच तोऐतिहासिक वारशानेसुद्धा तितकाच समृद्ध आहे. पुरातन अशा महत्त्वाच्या घाटवाटामध्ये प्रामुख्याने घेता येईल असे याचे नाव. सातवाहन काळात पैठण (प्रतिष्ठान) ही राजधानी भरभराटीस आली. आणि बाहेरील देशांसोबत व्यापारही वाढू लागला. पश्चिमेकडुन रोम भूमध्य समुद्रातुन आपली व्यापारी जहाजे भारताच्या पश्चिम समुद्र किनाऱ्यावर म्हणजे चौल, सौफळा, कल्याण, दाभोळ आणि वरच्या बाजूस भडोच इथं उतरवू लागला. आणि मग देशात हा माल पोहचवण्यासाठी कोकणातून देशात उतरायला अशा घाटमार्गाची निर्मिती करण्यात आली. आजही याचा वापर होतो पण आता त्या काळातील बैल आणि घोड्याची जागा  टेम्पो आणि ट्रक यांनी घेतली. महाराजांचे जन्मस्थान देखील याच मार्गावर. त्यामुळे त्यांचा पदस्पर्शाने पावन झालेलं हा घाट….

प्रत्येकाने इथं नक्कीच जायला हवे.. मग तुम्ही कधी जाताय?