पूर्वार्ध

बदलापूरपासून काही किलोमीटर अंतरावर असलेले मुळगाव अनेकांना माहिती आहे…तिथला डोंगर, डोंगरावर असलेलं खंडोबाचं मंदिर आणि महत्त्वाचं म्हणजे या डोंगरावरून बदलापूर शहराचं दिसणार विहंगम असं दृश्य… ते पाहून डोळ्याचं पारणं जसं फिटत तसं मुळगावाचा झणझणीत असा वडापाव खाऊन आणि चहा पिऊन केली जाणारी क्षुधा शांती देखील तितकीच प्रसिद्ध आहे….

बदलापूरला अनेकदा जाणं होतं पण मुळगावला जाणं मात्र राहून जात होतं. त्यामुळे अनेक दिवसांपासून मनातील ही इच्छा पूर्ण करण्याचा योग आज आला.. जायचं ठरवलं तेंव्हा तिथं जाऊन डोंगर माथ्यावरून दिसणारे बदलापूर विहंगम दृश्य पाहावे, निरव शांततेचा अनुभव घ्यावा आणि खंडेराय पुढे नतमस्तक व्हावे असं ठरवलं होतं.

खरं तर गेल्या वेळी मंदिर बंद म्हणून गावकऱ्यांनी परत पाठवलं होतं. त्यामुळे यावेळी चौकशी करून निघालो. मंदिर पायथ्याला असणाऱ्या गाड्यांची संख्या पाहून वर काय असेल याचा साधारण अंदाज आला होताच पण, तरीही पाहून यावे म्हणून झपाझप करत पायऱ्या चढत वर आलो आणि पुरता भ्रमनिरास झाला…. इथं आल्यावर वरची एकूण स्थिती पाहता खंडेरायाला आपण घातलेलं साकडं काही ऐकू येणार नाही हे लक्षात आले. कारण स्वतःला खंडोबाचे भक्त समजत असलेल्या तथाकथित भाविकांनी आपलं देवावरचं प्रेम त्याच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सोबत आणलेल्या लाऊडस्पीकरवर गाण्यांचा आधार घेतला होता. या कर्णकटु आवाजाने तिथल्या वातावरणाची पार लया गेली होती…

.पण ठीक आहे दोष माझाच आहे कारण चुकीच्या वेळी मी आलो होतो. म्हणजे एन रविवारी पण पुढल्या वेळी निवांत येईन आणि तुला नको असलेलं काही तरी घेऊन जाईन…

खंडेरायाच्या नावाने चांगभलं

यळकोट यळकोट जय मल्हार!!

उत्तरार्ध

काल, रविवारी संध्याकाळी मुळगावच्या खंडोबाच्या मंदिरामध्ये जाऊन आल्यापासून खूपच अस्वस्थ होतो.. तिथं आलेल्या तथाकथित भक्त मंडळीनी जो काही उच्छाद घातला होता अनो जो काही कचरा केला होता ते पाहून माझ्यातील सच्चा गिरीप्रेमी आणि निसर्गप्रेमी खूपच अस्वस्थ झाला होता… नुसतं अस्वस्थ होऊन चालणार नाही याची जाणीव तितक्याच प्रकर्षाने झाली होती. त्यामुळे आपणच जे शक्य होईल ते करायला हवं असं विचार मनात आला आणि लगेच बदलापूरमधला हक्काचा शिलेदार असलेल्या उमेशला साद घातली आणि सोमवारी सकाळी मुळगावच्या मंदीर परिसरात जाऊन जितकी शक्य होईल तितकी स्वच्छता करायची आहे असं सांगितलं… वाढदिवस असूनही हा गडी आनंदाने तयार झाला याबद्दल त्याचं खरंच मनापासून कौतुक!!

उमेशरावांची मनापासून साथ मिळल्याने आज सकाळी पुन्हा मुळगावला जाण्यासाठी पहाटे साडेपाचलाच निघालो.. बोचऱ्या थंडीचा मारा झेलत मंदिराचा पायथा गाठला. भर काळोखात पायऱ्या चढून वर पोहोचलो. आज डोंगरावर खंडोबा, मी आणि उमेश असे तिघेच जण निवांत होतो. वर येईस्तोवर तांबडे उगवायला सुरुवात झाली होती. मोबाइलच्या कॅमेऱ्यामधून उगवतीच्या सूर्याचे देखणं रूप मनाचे समाधान होइपर्यंत निवांतपणे टिपलं… मग त्यानंतर मंदिराशेजारी पडलेल्या प्लास्टिक बाटल्या, पिशव्या आणि काचा पडलेल्या होत्या त्या गोळा केल्या आणि उतरताना ही जिथे अशाप्रकारचा कचरा होता तो गोळा करत करत पायथा गाठला

आणि पाहता पाहता दोन गोणी कचरा गोळा झाला. हा कचरा स्टेशनजवळील कचरा कुंडीत टाकला. वास्तविक बदलापूरला इतका धार्मिक आणि नैसर्गिक वारसा लाभला आहे. त्याची निगा राखणे हे इथे येणाऱ्या आणि प्रत्येक निसर्गप्रेमीचे कर्तव्य आहे असं मला वाटते..

तुम्हांला काय वाटतं? नक्की सांगा!