वाघबीळ. या शब्दातूनच याबद्दल कळतं. वाघाच्या अस्तित्वाची खूण सांगणारी अशी ही वाघबीळ अनेक ठिकाणी आहेत. मग, बदलापूर तरी कसं अपवाद असणार ना! 

कोंडेश्वरला जाताना उमेशने या ठिकाणापासून काही अंतरावर असलेल्या वाघबीळबद्दल सांगितलं… आणि सहाजिकच मनात तिथं जाण्याची इच्छा निर्माण झाली… लगेचच उमेशला आपण तिथं जाऊ या का असा विचारलं असता माझ्यासारखीच भटकण्यासाठी सदैव तयार असलेल्या या गड्याने लगेच तयारी दाखवली…

या ठिकाणाबद्दल समजल्यावर तिथं जाण्यासाठी मी कमालीचा उत्सुक होतो मग या ठिकाणाचे  व्हिडिओ आणि फोटो चाळले आणि सरत्या वर्षाच्या शेवटच्या दिवशीच जाऊन येऊ अशी गळ उमेशला घातली…तो ही तय्यार झाला… या ठिकाणी जायचं कसं याचा शोध घेतला तेंव्हा इथं जाण्यासाठी कोंडेश्वरकडे जाताना सवरोली गावातून तिथं जात येते अशी जुजबी माहिती मिळाली…

पहाटे ६.३० वाजता मी, उमेश, मंदार आणि सिद्धार्थ असे चौघे मिळून बाईक घेऊन गावाकडे निघालो. पहाटे असलेल्या थंडीमुळे गावात शांतता होती…. पण या बोचऱ्या थंडीमध्ये लवकर उठलेल्या एका दादाला हेरेल आणि त्याला विचारून गावात सुरक्षीत आशा ठिकाणी बाईक नीट लावून आम्ही पुढे कूच केलं…. खर तर पुढचा रस्ता नीट माहिती नव्हता. GPS कॉर्डिनेट मिळाले होते पण ज्या अप्लिकेशन मधून ते पाहता येणार होते ते पेड होते….त्यामुळे ते सरळ बंद केलं. पण एक फायदा झाला जायचं  ठिकाण गुगल मॅप वर कळलं. आता आपण वाट शोधू या भरवशावर आम्ही चौघे निघालो. दिशा आणि उंची यांचा अंदाज घेत पुढे सरकत होतो. वाटते येणारे छोटे मोठे ओढे ओलांडताना वाट मधेच हरवत होती…मग परत नवीन वाटेचा शोध घ्यायचा अशी आमची वाटचाल सुरू होती….हा अनुभवही शिकवणारा होता…

एका मोठ्या ओढ्याचा पात्रात आम्ही जास्त वर आलो  मग पुन्हा ओढ्यातून खाली उतरलो. असे सगळे करत नेमके कुठे जायचे हे गवसले. वाघबीळच्या उजवीकडून न येता आम्ही डाव्या बाजूने आत शिरलो. कातळ कोरडे असल्याने भिंतीचा आधार घेत वाघबीळ गाठले. 

साधारण ५ फूट उंचीची ही गुहा ३० फुटनंतर अरुंद होत जाते. यातून येणारा पाण्याच्या थेंबाचा आवाज मात्र इथला जिवंतपणा राखून ठेवतो. पावसात इथले निसर्ग सौंदर्य खऱ्या अर्थाने खुलून येत असणार. डोक्यावरून पडणारी पाण्याची धार वाघबीळ मध्ये बसून पाहण्याचं सुख शब्दात मांडणं खरंच शक्य नाही कारण तो अनुभव प्रत्येकानं घ्यायला हवा हे नक्की!

तिथली निरव शांतता, अधूनमधून येणारे पक्षांचे आवाज ऐकत तिथं बसून राहणं आणि स्वतःला निसर्गात एकरूप करून घेणं यासारखं सुख नाही…. पण पोटात ओरडणारे कावळे या सुखात असडसर निर्माण करत होते सोबत आणलेला खाऊ खाल्ला

आणि परतीचा मार्गाला लागलो.

परतीच्यावेळी  योग्य वाट गवसली. येताना तुडवलेल्या वाटेच्या तुलनेत ही वाट म्हणजे राजमार्गच होता….