किल्ले हडसर

खिळ्याच्या वाटेचा थरार

आजवर शिवरायांच्या जन्मानं पावन झालेल्या जुन्नर तालुक्यात अनेकदा भटकण्याचा योग आला आहे. अगदी शाळेतून गेलेली शिवनेरी किल्ल्यावर गेलेली सहल असो वा नाणेघाट, जीवधन परिसरात अनेदा केलेली भ्रमंती असो…इतकंच नाही तर या परिसरात असलेले वानरलिंगी, नानाचा अंगठासारखे सुळके देखील सर केले. एका फिल्मसाठी तब्बल पंधरा दिवस मुक्काम या जंगलात केला होता…तरीही काही तरी राहून गेल्याची हुरहूर सतत मनात होती. त्यामुळेच म्हणून की काय यंदा होळीच्या दरम्यात जुन्नरमधील हडसर, चावंड, निमगिरी, हनुमंतगड सोबत कुकडेश्वर मंदिर बघायला जायचं ठरलं… ठरलं म्हणण्यापेक्षा ठरवलं गेलं असं म्हटलं पाहिजे कारण आमचं मूळ नियोजन प्रस्तारोहण करण्याचं होतं परंतु इथं ही कोरोना आडवा आला. कारण जाण्याच्या अगदी आदल्या दिवशी आमचे नेहमीचे बिनीचे शिलेदार लक्ष्मण आणि विश्रामच्या घरातील एकेका सदस्यांना कोरोना झाल्याचं समजलं. मग प्रस्तारोहणचा प्लॅन आपसूकच बारगळला… आता एवीतेवी जायचं ठरवलं होतं तर ते रद्द न करता मी आणि संतोष दोघांनीच जायचं पक्कं केलं.

कोरोनाची भिती असल्यानं सार्वजनिक वाहनानं जाण्याचा धोका न पत्करता माझ्या गाडीवरून जुन्नरला जायचं ठरवलं. खऱं तर गेल्यावेळी माळशेजच्या बाईक राईडला गेलो होतो तेव्हा संतोषनं यापुढे तुझ्या गाडीवर बसणार नाही असा निश्चय केला होता खरा पण आता मात्र त्याचा अगदीच नाईलाज असल्यानं त्याला माझ्याबरोबरच यावं लागणार होतं…

हडसरकडे…

होळीच्या दिवशीच सकाळीच लवकर निघायचं ठरलं होतं. जेणे करून दुपारचं कडाक्याच्या उन्हाच्या आधी पोहोचता येईल असा हिशोब होता. परंतु ठाण्यातून निघे पर्यंत सात वाजले. आम्ही दोघंचजण असल्यानं सुसाट निघालो… वाटेत जाताना नेहमीचे सवंगडी म्हणजे भैरवगड, शिंदोळा किल्ल्यांना दुरूनच नमस्कार केला आणि पुढे निघालो… माळशेज घाटात थांबण्याचा मोहदेखील उन्हाच्या भीती पोटी आवरता घेतला. त्यामुळे टोकावडेमध्ये पेटपूजा केली आणि थेट जुन्नरपासून १२ किलोमीटरवर असलेल्या हडसरकडे मोर्चा वळवला. जुन्नरजवळ साकारलेल्या माणिकडोह धरणावरून नाणेघाटाच्या दिशेने अंजनावळे, घाटघर गावाकडं जाणाऱ्या रस्त्याला जणू डोंगरांनी कवेत घेतल्याचा भास होतो… या मार्गातील माणिकडोह धरण ओलांडलं, की एका बाजूला धरणाचं निळेशार पाणी आणि दुसऱ्या बाजूला उंच डोंगररांगांमधून होणारा हा प्रवास वेगळ्याच जगात घेऊन जाणारा असतो… वाटेतयेणा-या या प्रत्येक डोंगरांबद्दल अपरिमीत कौतुक आणि आदर आहे. त्यांच्या या भूगोलावर तर आमचा इतिहास रचला गेल्याची जाणीव मनात असते.

हडसर गावात शिरण्याच्या रस्त्यावर किल्ल्याकडे जाणारा मार्ग असं लिहिलं पाहून आम्ही थांबलो.  हडसरची, उंची तब्बल ४६८७ फूट! त्याच्या या दर्शनानं सुरुवातीला तो अवघड, अशक्यच वाटू लागतो. यामुळेच की काय त्याचं दुसरं नाव पर्वतगड हे अगदी सार्थ ठरतं. गावात सुरक्षित ठिकाणी गाडी उभी केली आणि सध्या वाटेची काय स्थिती आहे याची एका घरात चौकशी करून मागोवा घेतला.

गडाकडे जाणाऱ्या प्रमुख तीन वाटा आहेत. त्यातील एक शेजारच्या डोंगराला वळसा घालतच वर चढते. हा शेजारचा डोंगरदेखील हडसरचाच एक भाग आहे. या डोंगरात खोदलेल्या पाण्याच्या टाक्या याचाच एक भाग आहे. या छोट्आ डोंगराचा आकारही अगदी कुणीतरी तासल्याप्रमाणे सरळ-गुळगुळीत. या डोंगराला वळसा घेत उत्तर दिशेस आलो, की गडावर जाणारा पायऱ्यांचा राजमार्ग दिसतो. आणि तिसरी वाट म्हणजे  आमच्या सारख्या आव्हानवीरांसाठी! दक्षिणेकडील ऐन कड्यात स्थानिक गावकऱ्यांनी लोखंडी मेखा ठोकत आणि खोबण्यांचा आधार देत एक कड्यातली वाट तयार केली आहे. गवतकाडी आणि देवदर्शनासाठी वरखाली करणारे गावकरी या वाटेने दहा-वीस मिनिटांत गडावर ये-जा करतात. हिच ती हडसरची प्रसिद्ध अशी खिळ्यांची वाट.

हडसर गावातून अवघ्या १० मिनिटांत आम्ही एका कातळभिंतीपाशी आलो तिथून सुरू होते खरा थरार… परंतु मुळात मजबूत दगडांत ठोकलेल्या खिळ्यांमुळे ही वाट सोप्पी वाटू लागली आहे. (अर्थात पावसाळ्यातया वाटेनं जाताना काळजी घेणे आवश्यक असतं…) पहिल्या टप्पात साधारण तीस फूटांची चढाई करून आम्ही एका गुहेपाशी आम्ही पोहोचलो तिथून अजून पुढे वीस फूट डावीकडे जाऊन गडाचा माथा गाठला.

तेथून डावीकडे असलेल्या तळ्याच्या काठावर महादेवाचं एक मंदिर आहे. गडावर मुक्कामाची वेळ आली तर ही उत्तम जागा.

महादेवाच्या या राऊळात गणपती,  हनुमान आणि विष्णुभक्त गरुडही मुक्कामी आहेत. या तिन्ही देवतांच्या मूर्ती अतिशय रेखीव असून पाहण्यासारख्या आहेत.

तिथून एक वाट गडाच्या पूर्व टोकापर्यंत जाते. या टोकावर बांधलेला एक बुरुज निष्ठेने या दिशेचं संरक्षण करत असतो. महादेव मंदिराला लागूनच एक छोटी टेकडी आहे. आम्ही गेलो तेव्हा ती गवतानं झाकलेली होती. ही टेकडी म्हणजे जणू गडाचा बालेकिल्ला! पण स्थानिक देवतांचे शेंदूर लावलेले चार दगड वगळता बालेकिल्ला म्हणावा अशा कुठल्याही खाणाखुणा इथे नाहीत. हा गड हिंडताना किल्लेदाराच्या वाड्याचे अवशेष, मंदिरे, पाण्याची तळी पाहत होतो.

गडाला नैसर्गिकरित्या त्रिकोणी आकार लाभला आहे आणि सगळ्या बाजूंनी कातळकडे आहेत. फक्त पश्चिमेला तटबंदीची आहे. इथून थोडं पुढं गेलो की एक जमिनीत खोदलेला मार्ग दिसला. कुतुहलानं आत गेलो तर तिथं तीन लेण्या दिसल्या. विशेष म्हणजे प्रत्येक लेण्याच्या प्रवेशद्वारावर गणेशपट्टी आहे. त्याच्या आतमध्ये काही अंधाऱ्या खोल्या दिसल्या यावरून  ती धान्याची कोठारे असावीत हे लक्षात आले.

किल्याचा इतिहासाबद्दल थोडे बोलयाचे तर जुन्नर म्हणजे सातवाहनांची बाजारपेठ आणि नाणेघाट हा व्यापारी मार्ग. या मार्गाच्या संरक्षणासाठी जीवधन, हडसर,चावंड,शिवनेरी किल्यांची निर्मिती करण्यात आली. हडसरवर मोठ्या प्रमाणात राबता होता. सातवाहन, यादव यांनी या गडावर राज्य केलं. पुढे १६३७ मध्ये शहाजी राजांनी मोगलांशी केलेल्या तहात हडसरचा समावेश होता असा इतिहासात उल्लेख आहे.

किल्ल्याचं उरलंसुरलं वैभव  मनात आणि जितकं जमलं तितकं कॅमे-यात साठवून आम्ही परतीच्या वाटेला निघालो.

क्रमशः 

One thought on “किल्ले हडसर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *