दुपारचं जेवण जुन्नरमध्ये करून आम्ही साधारण तीनच्या सुमारास चावंडकडे मोर्चा वळवला. जुन्नर ते चावंड साधारण १५ किलोमीटर होतं. चावंडवाडी हे गाव म्हणजे गडाचा पायथा. आज मुक्काम या  किल्ल्यावर करायचा होता. त्यामुळे गाडी एका घराच्या अंगणात सुरक्षितपणं पार्क केली आणि किल्ल्याच्या दिशेनं निघालो…

चावंड किल्याची जुजबी ओळख करून तुम्हाला द्यायची म्हटलं तरी किल्ले चावंड उर्फ प्रसन्नगड (Chavand Fort) खूप मोठी होईल… या गडाची अनेक नावे आहेत. चामुंड, चाऊंड, चावंड ही नावे चामुंडा या शब्दाचा अपभ्रंश होऊन चावंड हा प्रचलित झाला.  चावंड हा चामुंडा नावाचा अपभ्रंश असल्याने गडावरील एकाच ठिकाणी असलेल्या सात पाण्याच्या टाक्यांचा संबंध सप्तमातृकांशी जोडला जातो. चुंड हे निजामशाही आमदानीतील नाव आहे तर प्रसन्नगड हे नाव शिवाजी महाराजांनी ठेवलेलं आहे.  

गावातून किल्ल्याकडे जाणारी वाट अगदी ठळक आहे. त्याचं  मुख्य कारण म्हणजे वनविभागानं बांधलेला टेहळणी मनोरा आणि शेजारी पर्यटकांसाठी बांधलेला प्रशस्त असा निवारा.  दुर्गम असलेला हा किल्ला चढण्यासाठी दोराचा वापर करायला लागायचा. परंतु आज वनविभागानं या किल्ल्याचा मूळ गाभ्याला धक्का न लावता त्याला नवीन साज चढवल्यानं तो अधिक आकर्षक झाला आहे.  वनखात्यानं नव्यानं बांधलेल्या पाय-यांवरून आम्ही चढाईस सरुवात केली. साधारण ३०० पायऱ्या चढून गेल्यावर आपल्याला खडकात खोदलेल्या अरुंद लहान पायऱ्या लागल्या . या पायऱ्यांना लोखंडी कठडे बसवले आहेत त्यामुळे आज गड चढाईसाठी अगदीच सुरक्षित झाला आहे.  पाय-या जरी सोप्या असल्या तरी आकाशात तळपणारा सूर्यदेव आमची चांगलीच परीक्षा घेत होता. आपण खरं तर आम्हीच चुकीच्या वेळी गड चढायला सुरुवात केली असल्याचं सातत्यानं जाणवत होत.. परंतु असा वेडेपणा आम्ही  करणार नाही तर कोण करणार ना…


इंग्रजांनी १ मे १८१८ रोजी चावंडवर हल्ला करून येथील पायऱ्या उद्ध्वस्त केल्या होत्या. त्यासाठी जागोजागी सुरुंग लावल्याच्या खुणा आजही गडावर दिसतात. यावरून त्यांना गडांची  वाटणारी भीती लक्षात येते. मी ब-याच ठिकाणी एका खोबणीत आधारासाठी पुरलेली निकामी तोफ आहे असं वाचलं होतं. पूर्वी या तोफेला दोर बांधून लोक वरखाली ये-जा करायचे. आता मात्र गडाचं संवर्धन करून  या तोफेला किल्लावर तोफगाडा लावून मानाचं स्थान दिलं आहे.  

१० फूट लांबीच्या व दीड फूट उंचीच्या ५०-६० कोरीव व बांधीव छाती फुलवणाऱ्या पायऱ्या चढून गेल्यावर गडाची तटबंदी समोर आली . उभ्या कड्यातील ही वाट चारी बाजूंनी ताशीवकडे असल्याने एका नाळेतून खोदून काढली आहे. दरवाजाच्या आधी उजवीकडे एक पाण्याचं छोट टाकं आहे ते पाहून घेतलं. गडाचा हा प्रवेशमार्ग पहाताना हडसर, जीवधन गडाचा प्रवेशमार्ग यात साम्य दिसून येतं यावरून हे तिन्ही किल्ले सातवाहन कालखंडात एकाच राजवटीत बांधल्याचं अगदी प्रकर्षानं लक्षात येतं. गडाचा दरवाजा तटबंदीत पायऱ्यांच्या काटकोनात बांधलेला असून वाटेच्या उजव्या बाजूस दरवाजाच्या रक्षणासाठी बुरूज आहे. त्यामुळे खालून वा पायऱ्या चढून वर आलो तरी गडाचा दरवाजा दिसत नाही. दरवाजाची उजवी बाजू म्हणजे एक अखंड तासलेला कातळ आहे त्यावर एक तसेच दरवाजाच्या दगडी कमानीवर एक असे दोन गणपती कोरलेले आहेत. दरवाज्यावरील गणपतीला हात जोडून आम्ही किल्ल्यात प्रवेश केला.

या पायऱ्या चढून  गडमाथ्यावर प्रवेश होतो. पायऱ्याच्या डावीकडे तटबंदीकडे जाणारी वाट असून उजव्या बाजूची वाट किल्ल्याच्या मध्यभागी असलेल्या गोलाकार टेकडीच्या दिशेने जाते.  चावंड किल्ला समुद्र सपाटीपासून ३५०० फूट उंचावर असून ८५ एकर परिसरावर दक्षिणोत्तर पसरला आहे. किल्ल्यावर आजही सहा बुरुज शिल्लक असून किल्ल्याची तटबंदी बांधताना कातळात चर खोदून त्यावर ती बांधली आहे.आमचा मुक्काम किल्ल्यावर असलेल्या एका गुहेत होता. गडावरच मुक्काम असल्यानं आमच्याकडे बराच वेळ होता म्हणून गडावर फेरी मारायला सुरुवात केली.

किल्ल्यावर पाण्याचा मुबलक साठा आणि भग्न वाड्यांचे अवशेष होते. ते पाहून असं वाटलं की  या  किल्ल्यावर कधी काळी अनेक माणसाचा राबता असणार. कारण या एप्रिलच्या उन्हातही पाण्याची तिथं कमतरत नव्हती. सप्तमातृका कुंडांकडे जाताना त्यावेळेची दगडी शौचालयं दिसली.  

पुढं गेलो तर सप्तमातृका कुंड पाहून आम्ही धन्य झालो. या गडावर तुम्ही कधी गेलात तर आवर्जून बघा.  पाण्याची सात टाकी एकाच ठिकाणी आढळून येतात. सप्तमातृका म्हणजे- ब्राम्ही, महेश्र्वरी, कौमारी, वैष्णवी, वाराही, इन्द्राणी आणि चामुंडा. या सर्वांमध्ये चामुंडा श्रेष्ठ मानली जाते. या कुंडाच्या पहिल्या टाक्याला प्रवेद्वार आहे आणि त्या प्रवेशद्वारावरही  गणपतीचं सुंदर शिल्प कोरलं आहे. पुढे तळ्याकाठी असलेले एक भग्न मंदिरावरील नक्षीकाम आपलं मन मोहित करतं.  परंतु सध्या याची जी दूरवस्था झाली आहे ती पाहून वाईट वाटलं.  त्याचवेळी गड जागता असताना  हे मंदिर कसं असू शकेल याचं  चित्र डोळ्यासमोर उभं राहिलं.  

गडावरील सर्वोच ठिकाणी चामुंडा देवीचं मंदिर आहे.  परंतु तिचं दर्शन दुस-या दिवशी सकाळी जाऊन घ्यायचं ठरवलं  आणि कुंडाच्या समोरील बाजूच्या वाटेनं खाली गुहेकडं जिथं आम्ही राहणार होतो तिथं आलो. जिथं आम्ही राहणार होतो ती गुहा म्हणजे  खरं तर ही धान्य किंवा दारूगोळा ठेवण्याची  कोठारे होती. परंतु इथं  राहण्याची मजा काही औरच. दूरवर पसरलेले डोंगर, माणिकडोहचा विस्तृत पसलेले पाणी आणि त्याच्या कुशीत वसलेली गाव पाहताना आम्ही हरवून गेलो आणि तिथली शांतता अनुभवत होतो….  

अर्थात काही वेळानं पोटातल्या कावळ्यांनी त्या शांततेचा भंग केला. त्यामुळे संतोषनं आणि मी आसपासची सुकलेली लाकडं गोळा करून चूल पेटवली. चूल पेटवल्यावर सर्वात आधी चहाची तल्लफ भागवली… तुम्ही किती पैसा खर्चून सुद्धा असा निसर्गाचा सुंदर नजारा बघत चहा पिण्याचं सुख अनुभवायला कोणत्या तरी गडावर मुक्काम करायलाच हवा….  चहा पिताना निसर्गानं रेखाटलेलं हे सुंदर दृश्य पहात होतो.  

होळीची रात्र असल्यानं चंद्राच प्रकाशानं सारा गड न्हाऊन निघाला होता. त्यामुळे  वेगळी विजेरी लावण्याची अजिबात गरज वाटली नाही.  चंद्रा लख्ख प्रकाशानं वातावरण आल्हाददायक केलं होतं.  चंद्राच्या  प्रकाशात संतोष सोबत निवांत गप्पाचा फड रंगला. गप्पा मारत मारत  सूप आणि मस्त पुलाव केला आणि त्याला पोटात योग्य स्थान देत  गुहेच्या बाहेरच पथारी पसरली आणि निद्रादेवीच्या कुशीत गुडूप झालो…

सकाळी जाग आली तेव्हा सूर्य उगवतीला आला होता.

सोबत नवीन सवंगडी देखील गडावर आले होते.

त्यांच्यासोबत मजा मस्करी करत आम्ही आमचं समान आवरलं टाक्याजवळ जाऊन फ्रेश होऊन चामुंडा देवीच्या दर्शनाला निघालो . मंदिराची बांधणी आता नव्या पद्धतीनं केली असली तरी मंदिर हे खूप जुनं आहे .आजुबाजूला जुन्या मंदिराचे अवशेष विखुरलेले दिसतात. अशाच काही अवशेषामधील एक दीपमाळ लक्ष वेधून घेते. देवीचे दर्शन घेऊन प्रसन्न मनानं गड उतरायला सुरुवात केली.  

काल उन्हात चढताना दमछाक करण्या-या पाय-या आज अगदीच सोप्या वाटत होत्या. वातावरणातील गारवा अनुभवत आम्ही अवघ्या पंधरा मिनिटांत गाव गाठलं.

कारण अजून पुढं जाऊन  निमगिरी, हनुमंतगड सोबत कुकडेश्वर मंदिर पहायचं होतं…

क्रमशः