कुकडेश्वर शिवमंदिर – निमगीरी – हनुमंतगड

सकाळच्या  वातावरणातील गारवा अनुभवत आम्ही चावंड किल्ला सोडला. गावात इतक्या सकाळी काही नाश्त्याची सोय होणार नाही हे एव्हाना लक्षात आलं होतं. म्हणून तेथ कुकडेश्वर मंदिर गाठायचे ठरलं. चावंड किल्ल्यापासून ८-९ किमी अंतरावरच हे मंदिर आहे. चावंड वरून घाटघरला जाणाऱ्या मार्गातून चावंड किल्ल्याच्या पुढे ६ किमी एक फाटा फुटतो. तेथून पुढं ३ किमी वर हे मंदिर आहे. गावाचे नाव जरी “पूर” असे असले तरी कुकडेश्वर हेच नाव प्रचलित आहे. मंदिरा शेजारीच नाश्ता आणि जेवणाची उत्तम सोय झाली. त्यात एक भारीवाले रंगीबेरंगी बिस्कीट सुद्धा चाखता आलं. ते खाताना आम्हाला लहानपणीचे दिवस प्रकर्षानं आठवले  

कुकडेश्वर शिवमंदिर हे महाराष्ट्रातील पुरातन काळी बांधलेल्या दगडी मंदिरापैकी एक. अखंड दगडात केलेलं अप्रतिम असं कोरीवकाम आणि स्थापत्य कलेचं उत्कृष्ट उदाहरण असलेलं हे मंदिर तसं फारसं प्रसिद्ध नाही. दुर्लक्षित अशा या पांडवकालीन मंदिरापासून कुकडी नदीचा उगम होतो. पुढं याच नदीवर माणिकडोह धरण बांधण्यात आलं आहे. जुन्नरच्या समृद्धीचं गुपित यातच आहे.  

शिलाहार घराण्यातील असंख्य राजे जुन्नर प्रदेशात राज्य करून गेले. त्यापैकी कपर्दिन, पुलशक्ती, झंझ, वज्जड, चित्तराजा, मुन्मुणी, अनंतदेव , अपरादित्य, केशीदेव व शेवटचा सोमेश्वर हे राजे प्रमुख होते. अशा या शिलाहारांनी अनेक मंदिरे बांधली. अंबरनाथचं कोरीव शिवमंदिर, ठाण्याचं कौपिनेश्वर मुन्मुणी राजाच्या कारकीर्दीत बांधलं गेलं, तर झंझ राजानं पूरचे कुकडेश्वर, हरिश्चंद्रगडावरचे हरिश्चंद्रेश्वर, खिरेश्वरचे नागेश्वर, रतनवाडीचे अमृतेश्वर अशी शिवालये बांधली. साधारण इ. स. ७५० ते ८५० च्या आसपास शिलाहारांनी हे मंदिर बांधलं, असा उल्लेख आढळतो मग यास पांडवकालीन का म्हणत असावेत हे उलगडलं नाही. बहुतेक पांडवकालीन वा पुरातन मंदिरांची या राजांनी आपल्या स्थापत्य कलेच्या आधारे पुनर्बांधणी केली असावी.

गुगलच्या नकाशावर जरी आज मंदिर निळ्या पत्रांनी बहरलेलं दिसले तरी मूळ मंदिर सुरेख आहे. मंदिराची उंची साधारण १५ फूट असावी. प्रत्येक भिंतीवर आतून, बाहेरून पूर्णतः कोरीवकाम केलेलं आढळतं. मंदिराचं प्रवेशद्वार पश्चिमाभिमुख असल्यानं मंदिरात पुरेसा प्रकाश नाही. पुढील बाजूस उजवीकडं गणपती कोरलेला आहे. दारासमोरच एका अखंड दगडात नंदी कोरून काढला आहे. संपूर्ण मंदिरावर सुंदर नक्षीकाम केलेले आहे. दारावरील कोरीव गणेशपट्टी, उंबरठ्याजवळील दोन किर्तीमुखे, दारासमोरचा नंदी आणि गणेश, वेलबुट्टी आणि अलंकारणे, शिवपिंडीची पूजा करणारी पार्वती अशी अनेक शिल्पे लक्ष वेधून घेतात. मंदिराच्या आतील भागातही खूपच भारी नक्षीकाम केलेलं आढळतं. मंदिराच्या पश्चिमेस एका गोमुखातून पाणी पडत आहे. त्या भागातही शिल्पखंड आणि नागशिळा मांडून ठेवल्या आहेत. हे शिव मंदिर फार पुरातन असले तरी त्यावरील शिल्पे आजही सुस्थितीत आहेत. मंदिराचा कळस मात्र सिमेंटच्या मुलाम्यात अगदीच शोभा कमी करतो.

इथून पुढे मोर्चा निमगिरी आणि हनुमंत गडाकडे वळवला. यासाठी खांडीपाडा हे किल्ल्याच्या खालचं गाव गाठायचे होतं. परंतु आज होळी त्यामुळे प्रत्येक गावाच्या वेशीवर बच्चेकंपनी रस्ता अडवून पैसे मागणार हे नक्की होते

हे सगळे अनुभवताना मी पण माझ्या बालपणीच्या आठवणीत गेलो.  माझं संपूर्ण बालपण वरळीच्या बीडीडी चाळीत गेलं. इथंली होळी आणि रंगपंचमी अगदीच धम्माल असायची. रंगपंचमीच्या दिवशी चाळीत दारोदारी पत्राचे डबे वाजवत पैसा गोळा करत फिरायचो. आणि हे डबे वाजवत आम्ही गायचो.. (हो...हो गायचो! म्हणजे भसाड्या आवाजात! 
आयना का बायना घेतल्या शिवाय जाई ना,
पेटीकी चावी खुलती है,
हमको पैसा मिलता है,
चोर चोर कामाटी,
उंदराने नेली लंगोटी
उंदराची हाय कवठे खाय
कपाटात पैसे ठेवेल आहेत
पाकिटात पैसे ठेवले आहेत...
या गाण्याने चाळभर उच्छाद मांडत असू... मग जमलेल्या पैशातून संध्याकाळी आम्ही पार्टी करायचो. आईसक्रीम, भेळ, पावभाजी... खाण्याची चांगलीच चंगळ असायची. आज जुन्नर परिसरातील गावात भटकंती करत असताना ही चिल्लीपिल्ली भेटली. या चिलीपिल्ल्यांना पाहून माझ्या डोळ्यासमोर माझं बालपण उभं राहिलं. आम्ही दारोदारी भटकून पैसे गोळा करून जी मजा करायचो ती आठवली...पण या चिल्ल्यापिल्ल्यांनी तर चक्क गावचं रस्ते अडवले होते! अर्थात त्यांना पैसे देताना माझं लहानपण मला आठवलं आणि त्यांच्यात मी स्वतःला पाहिलं... 😊 पुलाखालून किती तरी पाणी वाहून गेलं ना... त्यांनी किती पैसे मागितले आणि मी किती पैसे दिले ते महत्त्वाचं नाही...त्यांच्या चेहऱ्यावर फुलेलं हे हसू आणि आनंद हा लाखमोलाचा होता.

हे विचार करत करत  आम्ही खांडीपाडा हे किल्ला खालचं गाव गाठलं. खरं तर आम्ही कुकडेश्वर पाहून आलो म्हणून लांबचा वळसा नाहीतर माळशेज घाट पार केल्यावर दोन किमीवर खुबी फाटा आहे. त्याच्या पुढे ४ किमी वर वेळखिंड लागते. वेळखिंड संपली की पारगाव नावाचं गाव आहे. या पारगाव वरुन एक रस्ता उजवीकडे जातो. तो बोरवाडी – मढ मार्गे खांडीपाड्यार्पंत जातो. घर गाठताना हा रस्ता फारच जवळचा.

खांडीपाड्यात एका घराबाहेर गाडी लावून वाटेचा मागोवा घेतला. निमगिरी आणि हनुमंतगड किल्ल्याचे दोन डोंगर एका खिंडीनं वेगळे झालेले आहेत. त्यामुळे आमची चढाई दोन्ही डोंगरांमधून करावी लागणार हे लक्षात आले. खांडीपाड्याच्या प्राथमिक शाळेपुढील मैदनातून इलेक्ट्रिक टॉवरच्या दिशेनं चढत जाऊन वाट मिळणार होती. याच किल्ल्याच्या पायथ्याला एका ठिकाणी ४२ विरागळी आहेत हे वाचनात आले होते. त्याही पाहून घ्यावात म्हणून वाटेत एका मामांना आवाज दिला. त्यानुसार पुढे एका पुरातन वृक्षाखाली हनुमंताची मूर्ती आणि समोरच ४२ वीरगळ एका रांगेत ठेवलेल्या पाहायला मिळाल्या. एकाच ठिकाणी इतक्या वीरगळी पाहण्याची ही पहिलीच वेळ होती माझी… त्यामुळे इतका मौल्यवान ठेवा असा उन्हापावसात झिजतो आहे, हे पाहून खंत वाटली.

थोडा वेळ थांबून किल्ल्याच्या दिशेने मोर्चा वळवला. पायथ्याला वनविभागाने मनोरा आणि बसण्यासाठी एक चौकी बांधली आहे. तेथून खिंडीच्या दिशेनं अर्धातास चढून गेल्यावर उजवीकडच्या डोंगराच्या कातळात गुहा दिसल्या. इथून पुढे जाणारी वाट कातळात खोदलेल्या पायर्‍यांची आहे. पूर्वी या पाय-या चढावयास कठीण समजल्या जायच्या.  कारण बरीच वर्षे मातीत त्या गाडल्या गेल्या होत्या. परंतु आता मात्र त्यांचं संवर्धन करून सुंदर रूपात त्या दिसत आहेत.

जाताना पाय-यांच्या वाटेनं जाऊन आणि परताना बाजूलाच असलेल्या वळणा वळणाच्या वाटेनं गड उतार होऊ असं ठरवलं. पाय-यांच्या वाटेनं १५ मिनिटांत खिंडीत पोहोचलो.  खिंडीच्या उजव्या बाजूला निमगिरी तर डाव्या बाजूला हनुमंतगड आहे. डाव्या बाजूला असलेली गुहा ही नुकतीच मातीतून मोकळा श्वास घेत असल्याची जाणीव होत होती.  कारण खालच्या बाजूला झालेल्या पडझडीमुळे गुहेतून वर जाणाऱ्या पाय-या आज अधांतरीत झालेल्या दिसत होत्या. उजव्या बाजूला असलेल्या कातळ कोरीव या पायर्‍यांच्या साहाय्यानं आपण १० मिनिटांत निमगिरीच्या गडमाथ्यावर आम्ही पोहोचलो.

गडमाथ्यावरून उजव्या बाजूच्या वाटेनं आम्ही निघालो. दोन पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांनी आमचं स्वागत केलं. येथून पुढं अजून दोन पाण्याच्या टाक्या पाहून. समोर गजलक्ष्मीचं मंदिर गाठलं. मंदिरासमोरही दोन पाण्याचा टाक्या आहेत. या टाक्यांपासून वरच्या दिशेला चढत गेल्यावर तीन समाध्या पाहायला मिळाल्या. पुढे पाच गुहा ज्याचा शेवटच्या गुहेत पाण्याचं टाक आणि आत एक छोटी खोली. हे पाहून आम्ही गडाची वरची टेकडी चढायला सुरुवात केली. या टेकडीवर घराचे जुने अवशेष सोडले तर फार काही नाही पण इथून दिसणारा चावंड किल्ला एका बाजूला गिर्यारोहकांची पंढरी असणारा हरिश्चंद्रगडाचा बालेकिल्ला आणि टोलारखिंड दिसते.

गजलक्ष्मीचं मंदिर

पुन्हा दोन्ही किल्ल्यांच्यामधील घळ गाठून समोर दिसणाऱ्या हनुमंत गडावरील पाय-या चढत १० मिनिटांत गडमाथ्यावर पोहोचलो. हनुमंतगडाचे प्रवेशद्वार आणि त्याच्या बाजूचे बुरूज शाबूत आहेत. येथून पुढे उजव्या बाजूस गेल्यास एक मोठ टाक आहे. येथून पुढे गडावरील टेकडी वरील जुन्या घराचे अवशेष आम्ही पहिले.

याच पठारावर तीन पाण्याची टाकी देखील आहेत. ते पाहून आम्ही गडफेरी पूर्ण केली. गड पहाताना इतके मंत्रमुग्ध झालो होतो की उन्हाच्या झळा लागत नव्हत्या. पण जसे परतीच्या मार्गाला लागलो तसे उन्हाचे चटके जाणवू लागले. पुढे काय करावे हे मनात सुरु होतं.
निघोजला जावून खळगे पाहावे हा विचार मनात आला पण संतोष  मागं बसून पार पकला होता आला होता, हे लक्षात आलं होतं. त्यामुळे स्वतःला आवरलं आणि थेट घरचा रस्ता धरला.  

हा लेख माझ्या दोन दिवसाच्या भटकंतीचा शेवटचा भाग आहे. मागील भागाच्या लिंक खाली दिल्या आहेत.

वाचून आपले अभिप्राय नक्की कळवा.