आज आपल्याला दिसणारा सह्याद्री म्हणजे महाराष्ट्रासाठी फक्त पर्वत नाही तर शिवरायांच्या पदस्पर्शानं  पावन झालेलं हे भक्तीस्थान आहे. महाराष्ट्रावर आलेली अनेक संकटं याच सह्याद्रीनं छातीवर निडरपणं झेलत ती परतवून लावल्याची अनेक उदाहरणं देता येतात. त्याचबरोबर याच सह्याद्रीनं मौर्य, राष्ट्रकुट, सातवाहन, कदंत, चालुक्य, शिलाहार आणि यादव अशा अनेक राजवटी अगदी जवळून पहिली आहेत. शांततेचा संदेश देणारे अनेक संत तसंच अनेक लेण्यांच्या रुपातील शिल्पकलेचा साज या सह्याद्रीनं  महाराष्ट्राला दिला आहे. कानामागून आलेल्या इंग्रजांनी  तर सह्याद्रीला मजबूत करणाऱ्या किल्लाचा इतका धसका घेतला की त्यांनी दंड-भेद या नीतीचा वापर करून थेट गडकोटांचे  प्रवेशद्वार, तटबंदी, बुरुज आणि आतील इमारतींना  सुरुंग लावून जमीनदोस्त केल्या. कर्त्या पुरुषाचं जसे हात पाय छाटावेत असा हा क्रूर प्रकार होता. इतिहासात ज्या किल्ल्यांनी आपल्याला संरक्षित ठेवलं त्या किल्लाबाबत मात्र भविष्यात आपण कुचकामी ठरतो आहोत. म्हणूनच जास्तीत जास्त दुर्गभ्रमंती करून समाजात किल्ल्यांबाबत जनजागृती करणं काळाची गरज आहे. याच उक्तीतून काळाच्या ओघात दुर्लक्षित झालेले किल्ले पाहणे एक आत्मिक सुख देणारं ठरतं हे नक्की…  

तसं बघायला गेलं तर आम्ही  कर्जतच्याबाजूचे जास्त किल्ले फिरलो आहे.  अगदी मुंबईच्या भाषेत सांगायचं झालं तर मध्य रेल्वेचा प्रवास करून जिथं जिथं जाऊन किल्ले पाहता येतील, अशाच किल्ल्यांवर बहुतांशवेळा गेलो आहोत. पश्चिम रेल्वेनं प्रवास करण्याची कल्पनाही तिथल्या गर्दीमुळे अनेकदा मनात येऊन तिच्याकडे कानाडोळा केला आहे. त्यामुळे त्या बाजूचे किल्ले पाहण्याची इच्छा तर जबर होती परंतु रेल्वेचा तो प्रवास नको वाटत असल्यानं तिथं जायचं अनेकदा टाळलं होतं. परंतु खूप दिवसांपासून मनात तळ करून बसलेला तांदूळवाडी किल्ला काही स्वस्थ बसू देत नव्हता. अखेर हिंमत करून या किल्ल्यावर जायचा प्लॅन आखला…त्याबाबत माझ्याच सारखा फिरस्ता असलेल्या मल्हारशी बोललो आणि १५ डिसेंबर २०११ या दिवशी तांदूळवाडी किल्ल्यावर जाण्याचं नक्की केलं. मल्हारसोबत आजतागायत अनेकदा भटकंती केली आहे. आम्हा दोघांत  उत्तम ताळमेळ असल्यानं कोणते ही ट्रेकिंग हे आमच्यासाठी आनंददायी असतं. परंतु कुठं ही जायचं झालं तर त्याला सकाळी लवकर उठवण्याचं अत्यंत कठीण काम मला करावं लागतं तसंच याही वेळेला ते करावं लागणार असल्याची मनाशी खूणगाठ मारली होती. कारण तो जर आला तर हा ट्रेक मस्त होणार हे नक्की होतं… पण जर तो वेळेवर आला नाही तर मात्र  एक रविवार फुकट गेला याचं दुःख मानत शांत बसावं लागतं… परंतु तांदूळवाडीच्या ट्रेकला हा पठ्ठ्या  पहाटे ५ वाजता  दादर स्टेशनला हजर झाला होता…


मग काय विरार आणि त्यानंतर सफाळेसाठी शटल पडून आमचा प्रवास सफाळे स्थानकावर संपला. सफाळे म्हणजे आता उदयास येणारं शहर म्हणता येईल. रेल्वेमुळे सफाळे इथं  काही इमारती आज दिसू लागल्या आहेत. रेल्वेफाटकाजवळच  एक एसटी बस थांबलेली दिसली ड्रायव्हर काकांना हाक मारूच विचारले तांदूळवाडी जाणार का? काकांनी मान डोलावली आणि आम्ही गाडीत प्रवेश केला. पण नंतर कळले की ती तांदूळवाडीची बस नव्हती. तांदूळवाडीकडे जाणारी बस स्थानकापासून पाच मिनिटांच्या अंतरावर असलेल्या एका पारा शेजारी मिळते. जसा पार आला तसा  ड्रायव्हर काकांनी आवाज दिला “पोरोंनो इथे येईल बघा आता बस ” तेव्हा कळलं आम्हाला चालायला नको म्हणून काकांनी ही आमच्यासाठी मदत केली होती.  तांदूळवाडीला जाण्यासाठी बसचा पर्याय जर निवडायचा नसेल तर पायी पाच किलोमीटरवर असलेल्या रोडखड नावाच्या आदिवासी पड्यातून किल्ल्यावर जाता येतं. पण तरीही तांदूळवाडी किल्ल्याची सुरुवात तांदूळवाडी गावातून करायचे हे निश्चित होतं. बसनं तांदूळवाडी गावात पायउतार होण्यासाठी अवघी १० मिनिटं पुरे होतात. तांदूळवाडी फलकाच्या विरुद्ध दिशेस आपल्या स्वागतासाठी तांदूळवाडी किल्ला उभा दिसतो.

साधारण ३०० लोकांचा वस्तीचं हे गाव. गावात असणारी शाळा, दवाखाना हे गावाची समृद्धतेची निशाणी असते. त्यामुळे गावात वाटाड्या शोधणं फार कठीण  नाही.  जर किल्ला, त्याच्या परिसरातील पक्षी, झाडांची तोंडओळख करून घ्यायची असेत तर गावातील  जाणकार व्यक्तीला सोबत घेणे केव्हाही चांगलेच. गावच्या शाळेजवळ काही गावकरी भेटले आणि त्यातील एक दादाला आम्ही तयार केला. त्याच्यासोबत त्याचा मुलगा येणार होता. हे पाहून खरंच खूप समाधान वाटलं कारण ही सुरुवात होती नवीन पिढीला आपल्या गावातील  वैभवाची ओळख करून देण्याची.

वैतरणा नदीच्या काढावर वसलेल्या या किल्ल्याची उंची साधारण १९०० फूट. किल्ला सर करण्यासाठी साधारण दीड तास पुरेसा होतो पण ते पावसात. मात्र  भर उन्हात यात फरक पडणार हे नक्की होते. वाट सुरू होण्यासाठी एक खूण मात्र कायम लक्षात ठेवा, असे दादा सांगत होता ती खूण म्हणजे गावाच्या शेजारी असलेला हातपंप त्याच्या बाजूने जंगलातून जाणा-या वाटेनं आम्ही थेट एका पठारापाशी येऊन पोहोचलो.

या पठारावर  छोट्या छोट्या दगडांचा ढीग जमा झाला होता. दादा म्हणाला तुम्ही पण एक-एक दगड उचलून या ढिगा-यावर टाका. कारण या किल्ल्यावर जाताना अशी हजेरी लावण्याची पूर्वी पासूनची प्रथा आहे. असं का यावर मात्र काही मला समाधानकारक उत्तर  मिळालं नाही. गडावर जाणारी वाट अगदी सोपी कारण किल्ला नजरेच्या क्षेत्रात असल्यामुळे  दिशा भरकटण्याचा संबंध येत नाही. वाटेत काही ठिकाणी खोल दरी काही ठिकाणी जंगलातून जाणारी वाट त्यामुळे उनंसावलीचा खेळ खेळत आम्ही दरमजल करत किल्ला गाठला.

गडाचा पसारा ब-यापैकी मोठा होता. जवळ जवळ २० एक पाण्याची टाकी या किल्ल्यावर आम्हाला दिसली. किल्ल्याची वैभवता आणि किल्ल्यावरील लोकांचा वावर हे त्याच्या पाण्याच्या उपलब्धतेवरून लक्षात येतं. परंतु गडावर खरं पाहण्यासारखे आहे ते म्हणजे बालेकिल्ला सदृश बांधकाम. चहूबाजूनं तटबंदीनं वेढलेला असा हा बालेकिल्ला म्हणजे उत्तम वास्तुकलेचा नमुना म्हणता येईल. किल्ल्याच्या दरवाजातून आता गेल्यास इमारतीचं जोतं पाहून जणू हा एक राजवाडा असल्याचं चित्र डोळ्यासमोर उभं राहतं. पण खरं पाहण्यासारखी गोष्ट आहे ती म्हणजे याच ठिकाणी असणारी चौकोनी आकाराची विहीर.  आज जरी तिला गळती लागली असली तरी तिचं  बांधकाम म्हणजे किल्लाच्या समृद्धतेचं  प्रतिक म्हणावे लागेल. अशा या समृद्ध वास्तूची आजची स्थिती पाहून वाईट वाटतं हेच खरं…

या किल्ल्याचा इतिहास जरी मोठं नसला तरी इतिहास जाणून न घेता किल्ला पाहणं म्हणजे ओझी वहाण्याचे काम म्हणता येईल.  हा किल्ला माहीमपासून सोळा किलोमीटर वर आग्नेय दिशेला वसला आहे. इतिहासात वैभवशाली असणारे शूर्पारक म्हणजे आताचं नालासोपारा आणि महिकावती म्हणेज माहीम या नगरांवर १३ व्या शतकात राजा भीमदेव यादव यांचं राज्य होतं. त्या नंतर १९४५ साली अहमदाबादच्या सुलतानानं महिवती सर केल्यामुळे या भागात त्याचा अंमल सुरू झाला या त्यापैकी एका बहादूरशहानं  वसईत बहादुरपूर गाव वसविलं आणि मलिक अल्लाउंद्दिन नावाच्या सरदाराला विसामागड आणि तांदूळवाडी किल्लाची किल्लेदारी देण्यात आली. त्यानंतर या भागात पोर्तुगीज लोकांचं वर्चस्व राहिलं होतं . मग पुढे चिमाजी अप्पाच्या कोकण मोहिमेत माहीम व वसईचा परिसत आपल्या ताब्यात घेऊन या ठिकाणी मराठ्याचं वर्चस्व प्रस्थपित केलं. असा हा किल्लाचा लढवैय्या म्हणून उल्लेख नसला तरी त्या काळात माहीमची बाजारपेठ पाहता मोक्याचा ठिकाणी वसला आहे हे निश्चित .

आज जरी किल्ला भग्नावस्थेत असला तरी या किल्ल्यानं  मोठा इतिहास आपल्या कवेत सामावून घेतला आहे. कारण किल्ल्याचं बांधकाम  हे अगदी उत्तम वास्तुकलेचा नमुना असणारे आहे. तरही हा किल्ला अजूनही दुर्लक्षित आहे. त्यामुळे गरज आहे अशा किल्ल्याला प्रकाश झोतात आणण्याची.