मुक्काम पोस्ट किल्ले लळिंग

आमच्या सारख्या कोकणाशी नाळ जुळलेल्यांना धुळे म्हटले की डोळ्यासमोर येतं ते रखरखीत उन्हं, झाडं नसलेलं ओसाड माळरान… दिवसभर आग ओकणारा सूर्य त्यामुळे दिवसाचं तापमान ४० पर्यंत…तर रात्री १५ अंश होणारं तापमान… इतका विरोधाभास असला तरी एक गोष्ट माझ्यासाठी खास होती ती म्हणजे तिथले गडकोट.

सह्याद्रीच्या माझ्या भटकंतीमध्ये इथं जाण्याचं काही ना काही कारणानं राहूनच गेलं होतं. त्यामुळे या वर्षीच्या माझ्या बकेट लिस्ट मध्ये धुळ्याची मोहीम आखणी करून ठेवली होती पण मुहूर्त काही केल्या लागत नव्हता तो या वेळी लागला आणि तो देखील शिवजयंतीचा! हा मुहूर्त सत्कारणी लावायचा यावेळी निश्चय केला. पुष्करच्या कानावर मनात आखलेल्या या मोहिमेचा आराखडा सांगितला. ते ऐकल्यानंतर तो पठ्ठा एका पायावर माझ्याबरोबर येण्यासाठी तयार झाला. त्यानंतर धुळ्याला मोटरसायकल घेऊन जाण्याचा किडा त्यानं सोडला आणि त्या किड्यानं माझ्या मनात घर केलं. तीन दिवसांची बाईक राईड करत ५ किल्ले! हे सगळं ऐकायला खूपच भारी वाटत होतं.

दरम्यान, मी जिथं राहतो तिथं सार्वजनिक माघी गणपतीचं विसर्जन असल्यानं मोहिमेच्या आदल्या दिवशी झोपायला चांगलाच उशीर झाला. परंतु मोहिमेला जायची प्रचंड उत्सुकता असल्यानं उशीरा झोपूनही सकाळी आपसूक लवकर जाग आली. गणपती बाप्पा मोरया म्हणत त्याच्या आशिर्वादानं बाईक स्टार्ट केली…

पहाटेचे पाच वाजलेले असूनही उजाडलेलं नसल्यानं काळोखातूनच आमचा प्रवास सुरू झाला. कसारा घाटाच्या अलिकडे नाश्त्यासाठी म्हणून थांबलो. चहा आणि पोहे असा भरभक्कम नाश्ता करून पुन्हा एकदा आम्ही सर्वांनी बाईकला किक मारली. नाशिकचे पूल ओलांडत परत एक चहासाठी हॉल्ट घेत ठरवल्या प्रमाणं बारा वाजता लळींग गावात पोहोचलो.

महाराष्ट्रातील ऐतिहासिक घराण्यांमध्ये खानदेशातील ‘फारूकी’ घराणे एक मोठे. या घराण्यानं या प्रदेशावर तब्बल ५०० वर्षे राज्य केलं. धुळ्याच्या अलिकडे नऊ किलोमीटरवर हा किल्ला आहे . किल्ल्याची उंची समुद्रसपाटीपासून ५९३ मीटर! सह्याद्रीच्या ऐन धारेवरील किल्ल्यांच्या मानानं ही उंची लहान. लळींग गावातील घर हेरून इथं बाईक आणि सोबतचे सामान ठेवायची परवानगी घेतली आणि मुख्य रस्ताच्या कडेच्या पायऱ्यांनी किल्ल्याकडे कूच केलं. २०२० साली या किल्याच्या पायऱ्यांची डागडुजी करण्यात आली आहे.

१० मिनिटं पायऱ्या चढून आम्ही आता वाटेवर चालू लागलो होते. दुपारचं रणरणतं ऊन, त्यात नाकासमोरचे उभे चढण आणि वाटेत एकही सावलीसाठी झाड नाही अशी आमची किल्ले चढाई सुरू होती. वाटेत काही ठिकाणी पायऱ्यांचे अवशेष पाहत दोन ठिकाणी दगड रचलेल्या तटबंदीच्या भिंतीही आडव्या ओलांडल्या. जणू प्रवेशद्वाराचीही ती रचनाच आहे. साधारण तासाभरात आम्ही गडमाथ्याजवळ पोहोचतो. गडाजवळ आलो, की खोदीव पायऱ्या समोर स्वागताला सज्ज होत्या.

पुढे कड्यांत काही खोदकामेही पहिली. ही खोदकामे पाण्याच्या टाक्या आहेत, की लेण्या हे मात्र समजलं नाही. पण ही अशी खोदकामे गडाचे प्राचीनत्व सिद्ध करतात.

लळींगचा घेर आटोपशीर. मध्यभागी एक छोटीशी टेकडी, तिच्यावरच गडाचा बालेकिल्ला आणि उर्वरित सपाटीचा भाग तटाकडेने पसरलेला. या तटाकडेच्या फेरीसाठी मुख्य प्रवेशद्वारापासून डावी-उजवीकडे दोन वाटा फुटतात. गडाच्या उत्तर अंगास खाली एक खोदीव, बांधीव स्वरुपाचा तलाव आहे आणि त्याच्या काठावर एक घुमटवजा मनोरा उभा आहे. त्याच तलावाच्या मागं गावात नव्यानं उभारले रिसॉर्ट म्हणजे नव्या जुन्याची जणू सांगडच होती.
या वाटेवरच पुढे एक बुलंद बुरुज आणि त्यावर तोफेसाठीचा गोल कट्टा दिसला. लळींगच्या टेकडीभोवती दक्षिण अंगास काही टाक्या खोदलेल्या आहेत. पण गडावरील साऱ्याच हौदातील पाणी पिण्याच्या योग्यतेचं नाही हे त्यांच्या रंगावरूनच जाणवलं… कारण हौदांतील पाण्याला हिरवा, पिवळा, काळा असे विविध रंग होते. गडाच्या मधोमध असलेली टेकडी म्हणजे लळींगचा बालेकिल्ला. वाड्यांची जोती, घरांचे अवशेष, दुर्गामातेचे मंदिर, धान्य कोठाराची इमारत, त्या भोवतीचे पाण्याचे हौद ही सारी या बालेकिल्ल्याची संपत्ती!

इसवी सन १३७० मध्ये राजा मलिकने या फारूकी घराण्याच्या राज्याची स्थापना केली. इसवी सन १३९९ मध्ये त्याचा मृत्यू झाल्यावर त्याचा मुलगा नसीर खान कडे लळींग आणि भोवतालचा प्रदेश आला. त्यानेच लळींगला राजधानीचा दर्जा दिला. त्याने फारूकी राजवटीचा विस्तार बऱ्हाणपूपर्यंत केला. परंतु इसवी सन १४३६ मध्ये बहमनी सरदार मलिक-उल-तुजारबरोबर झालेल्या युद्धात या नसीर खानचा लळींग किल्ल्या खालीच पराभव झाला. पराभवाच्या या अपमानातच १७ सप्टेंबर १४३७ मध्ये त्याचा गडावर मृत्यू झाला. फारूकींची सत्ता बुडाल्यावर पुढे बराच काळ हा किल्ला मुघलांकडे होता. इसवी सन १७५२ मध्ये झालेल्या भालकीच्या लढाईतून खान्देशातील अनेक गडांबरोबर लळींगच्या प्रवेशद्वारावर मराठी जरीपटका फडकू लागला. तो १८१८ च्या शेवटच्या मराठे-इंग्रज लढाईपर्यंत होता. इतिहासाचा हा एवढा मोठा कालखंड आज जणू इथे लुप्त झाला आहे

बालेकिल्ला पाहत पुन्हा उत्तर दिशेकडील त्या कमानींच्या बुरुजावर उतरलो. त्या कमानीतून खालचा तलाव आणि त्या काठचा तो मनोरा पुन्हा खुणावत होता. अष्टकोनी हा तलाव साधाच, पण त्याच्या एका कोनावर उभारलेल्या त्या घुमटवजा मनोऱ्यानं त्याला वेगळीच उंची दिली आहे. स्थापत्याला आगळे सौंदर्य प्राप्त झालं आहे. कसं असेल त्यावेळचं दृश्य..पाण्यानं भरलेला जलाशय, त्यामध्ये फुललेले कमळं, विहार करणाऱ्या बदकांच्या काही जोड्या आणि या साऱ्यांतील सौंदर्य अनुभवत, पश्चिमेच्या वाऱ्याशी हितगुज करत त्या तिथे मनोऱ्यात बसलेला कुणी शाही परिवार!

या साऱ्या स्वप्नांच्या दुनियेत बाहेर येण्यासाठी पोटातील कावळ्यांनी आठवण केली आणि परतीची वाट धरली. धुळ्याच्या अलिकडे पुढला पडाव म्हणजे रायकोट किल्ल्याकडे जाणारा रस्ता . पुढे जेवण मिळेल की नाही हे माहिती नसल्यानं इथंच जेवणं उरकून आम्ही पुढे निघालो. संध्याकाळी बाईक चालवताना मावळतीची आकाशात केलेली रंगाची उधळण पाहून पहाटे पाच पासून सुरू केलल्या प्रवासाचा शीण नाहीसा झाला.

लळींग ते रायकोट शंभर किलोमीटरचं अंतर काळोख पडायचा आता गाठायचं होते. कारण तिथं राहणं, खाण्यापिण्याची सोय करायची होती. गावातील डांबरी रस्ता सोडला आणि कच्च्या रस्त्यांवरून आमची ‘घोडदौड’ सुरू होती. ही घोडदौड एका झोपडीवजा घरापाशी थांबली. कारण इथे पुढे काही नाही हे लक्षात आलं. आता पुढं कसं होणार हा विचार मनात आला अन् त्याचक्षणी डोळ्यासमोर एक झोपडीवजा घर दिसलं. त्या. घरात दोन आज्ज्या आणि साधारण पन्नाशीच्या उंबरठ्यावरील एक गृहस्थ दिसले. त्यांच्याशी गप्पा मारत मारत आम्ही तुमच्या घरी जेवायला आलेलो पाहुणे आहोत हे सांगून मोकळे झालो…अचानक उगवलेल्या आम्हा आगंतुकांचं त्यांनी मोठ्या प्रेमानं आदरातिथ्य केलं. अन् रात्रीच्या जेवणात वाटाण्याची भाजी आणि गरम गरम भात दिला. त्याबरोबर त्यांचं प्रेम आणि आदरातिथ्य पाहून पोट तुडुंब भरलं. त्यांचं हे प्रेम पाहून डोळ्याच्या कडा आपसूक ओलावल्या होत्या. त्यांच्या घरापासून काही अंतरावर झोपण्यासाठी तंबू लावायला सुरुवात केली. पण त्या काकांनी आम्ही जमिनीवर झोपू नये म्हणून त्यांनी नायलॉनं विणलेली खाट आणून दिली. त्यामुळे बांधलेल्या तंबूत सामान ठेवून आम्ही सुद्धा मोकळ्या आभाळाखाली पाठ टेकली. आकाशात चमचमणाऱ्या चांदण्यां बघत एकमेकांशी गप्पा मारत कधी गाढ झोप लागली कळलंच नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *